आशुतोष बापट
शनिवार
हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडला जावे. हे पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन बंदर आहे. देवगडच्या उत्तरेला २५ कि.मी.वर विजयदुर्ग किल्ला पाहावा. हेलियम वायूचा शोध इथे लागल्याचे सांगतात. तिथे साहेबाचे कट्टे आहेत. छत्रपती शिवराय तसेच कान्होजी आंग्रे यांनी याच किल्ल्याच्या मदतीने समुद्रावर आपला दरारा निर्माण केला होता. विजयदुर्गच्या अलीकडे असलेल्या गिर्ये गावी जावे. तिथे रामेश्वर हे प्राचीन शिवालय आहे. खडकातून खोदलेल्या मार्गाने देवळात प्रवेश होतो. देवळात वसईचे विजयचिन्ह असलेली घंटा आहे. परतताना वाडा गावातील विमलेश्वर मंदिर पाहावे. बाहेर अनेक वीरगळ मांडून ठेवलेले आहेत.
रविवार
मीठमुंबरी पुलावरून कुणकेश्वरला जावे. समुद्रावर असलेले हे शिव मंदिर देखणे आहे. सागराच्या लाटा मंदिरापर्यंत येतात. छोटय़ा देवळीत विष्णूची प्राचीन मूर्ती पाहावी. तिथून मिठबावला जावे. शांत रमणीय सागरकिनारा आहे. कोटकामते गावी जावे. इथे असलेले भगवती देवीचे प्राचीन मंदिर मुद्दाम पाहण्यासारखे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार कान्होजी आंग्रे यांनी केला होता. तसा शिलालेख आहे. मंदिराबाहेर दोन तोफा आहेत. इथूनच जवळ असलेल्या बुधवळला जावे. इथे बोंबाडेश्वर महादेव मंदिर आहे. इथे मंदिराच्या आवारात असलेल्या तळ्यातून सतत बुडबुडे येत असतात. हा निसर्गचमत्कार अवश्य पाहावा.
ashutosh.treks@gmail.com