अमित सामंत
अरकू व्हॅली विशाखापट्टणमहून ११५ किलोमीटरवर आहे. व्हॅलीच्या दिशेने प्रवास सुरू केला की हळूहळू आजूबाजूचे दृश्य बदलत जाते. हिरवाई अधिकच गर्द होते. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर धुके दिसू लागते. थंड हवेमुळे भूक चाळवते. अशा वेळी तिथल्या स्टॉलवर बोंगू चिकन अर्थात बांबू चिकन हा स्थानिक पदार्थ खायलाच हवा. बांबूच्या कांबीची हिरवी पेर कापून स्टॉलवर लटकवलेली दिसतात. आपल्या समोरच मॅरीनेट केलेलं चिकन हिरव्या बांबूच्या नळकांडय़ात भरलं जातं. ते पानांनीच झाकून समोरच पेटवलेल्या लाकडांच्या निखाऱ्यांवर ते चिकन भरलेले बांबू ठेवले जातात. बांबू सर्व बाजूंनी काळे होईपर्यंत आगीत भाजतात. त्यानंतर ते आगीतून बाहेर काढून त्यावरचे पान काढून डिशमध्ये ओततात. त्यामुळे बांबू आणि चिकनचा मिश्र सुगंध दरवळतो. आधीच थंड वातावरण, त्यात कडाडून भूक आणि समोर गरमागरम चिकन अशा वेळी त्यावर तुटून पडण्यात वेगळाच आनंद मिळतो.
अरकू व्हॅलीत कॉफीचे मळे आहेत. तिथली कॉफी प्रसिद्ध आहे. तिथे कॉफी म्युझियमही आहे. या संग्रहालयात कॉफीचा इतिहास जाणून घेता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीची चव घेता येते आणि त्या खरेदी करता येतात. कॉफी चॉकलेट्स, बीन्स आणि इतर पदार्थही या ठिकाणी चाखायला मिळतात.