आशुतोष बापट
पैठणजवळच्या खांबपिंपरी या निसर्गरम्य गावात वास्तुकलेचा एक उत्तम नमुना उपेक्षित स्थितीत आढळतो. देशाच्या विविध भागांतल्या शिल्पसमृद्ध विहिरी पर्यटनाच्या नकाशावर झळाळत असताना, खांबपिंपरीतील अशाच एका विहिरीकडे अद्याप फारसं कोणाचंच लक्ष गेलेलं नाही, हे पाहून आश्चर्य वाटतं. विहीर, मंदिर आणि सभामंडपाचे अवशेष आजही आपलं सौंदर्य टिकवून आहेत. शेगाव तालुक्यातील भटकंतीत चुकवू नये, अशा खांबपिंपरीविषयी..
‘चराति चरतो भग:’ असं ‘ऐतरेय ब्राह्मणग्रंथा’त लिहिलेलं आहे. याचा अर्थ जो चालतो त्याचं नशीबसुद्धा चालतं. सतत फिरणाऱ्या भटक्यांचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्र देशी हिंडताना अकस्मात कुठलातरी खजिना समोर येतो आणि आपले पाय तिथे थबकतात. आनंदाला पारावार राहात नाही. नगर जिल्ह्य़ातल्या शेवगाव परिसरात भटकताना असाच एक सुंदर मानवनिर्मित खजिना सामोरा आला.
नगरपासून शेवगावमार्गे ८९ किमी वर आणि पैठणपासून फक्त १७ किमी वर काटकडी नदीच्या काठी वसलेलं खांबपिंपरी हे गाव आणि तिथे असलेली शिल्पसमृद्ध बारव पाहून स्तिमित व्हायला होतं. अगदी नावापासूनच या गावाबद्दलचं कुतूहल चाळवलं जातं. खांब पिंपरी हे काय प्रकरण असेल हे गावात गेल्यावर समजतं. पिंपरी नावाची अनेक गावं असतात. या पिंपरी गावात एक मोठा दगडी खांब उभा आहे त्यामुळे हे झालं खांबपिंपरी. पण आता मात्र बोलीभाषेत त्याचा उल्लेख खामपिंपरी असा केला जातो.
गावातील तो खांब म्हणजे एका प्राचीन मंदिराच्या बहुधा सभामंडपाचा खांब असावा. अंदाजे १० फूट उंचीचा दगडी खांब, त्याच्या माथ्यावर हंसांची नक्षी आहे, तो एका चौथऱ्यावर ठेवलेला आहे. ज्या अर्थी हा खांब इथे आहे, त्याअर्थी इथे एखादं मोठं मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचं काहीही अस्तित्व आज इथे दिसत नाही. नाही म्हणायला काही मूर्तीचे अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. असाच आणखी एक खांब जवळच्या गावात असल्याचं गावकरी सांगतात. जवळच एक शिवमंदिर असून गाभाऱ्यात शिवपिंड आहे. सभागृहात नंदीची मूर्ती दिसते. मंदिरच्या खांबांवर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. खांबांच्या वरती उलटे नाग कोरलेले दिसतात. याच शिवमंदिराला लागून असलेली शिल्पसमृद्ध बारव हे या गावाचं वैभव म्हणावं लागेल.
बारव चौरसाकृती आहे. या बारवेचं वैशिष्टय़ असं की यात तीनही बाजूंनी मूर्ती कोरलेल्या दिसतात. काही स्त्री तर काही पुरुष देवतांच्या अशा एकूण ४९ मूर्ती आहेत. या मूर्ती ओळखणं मात्र काहीसं अवघड आहे. प्रत्येक मूर्तीच्या हातात पाश, त्रिशूळ, फळ अशी विविध आयुधं दिसतात. प्रत्येक मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नर्तिका नाहीतर वादक आहेत. अत्यंत रेखीव मूर्तीचा जणू पटच इथे दिसतो. बारवेत सध्या पाणी नाही. बाजूने माती पडून ती बुजली आहे आणि त्यावर रान उगवलं आहे.
बारवेच्या दोन कोपऱ्यां दोन लहान दालनं आहेत. बारवेच्या दोन भिंती आणि बाजूला दोन खांब उभारून अंदाजे ६ फूट उंचीचे चौरसाकृती मंडप दिसतात. मंडपातसुद्धा मूर्ती कोरलेल्या आहेत. गणपती, भैरव अशा सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळतात. इतकी मूर्तीनी मढलेली बारव हे खरे तर महाराष्ट्राचं वैभव मानायला हवं. महाराष्ट्रात बारवा बऱ्याच दिसतात. त्या बारवांमध्ये देवकोष्ठे केलेली दिसतात. त्या कोष्ठांमध्ये कधी मूर्ती असतात तर बऱ्याचदा ती रिकामी असतात. परंतु खांबपिंपरी इथल्या या बारवेचं वैशिष्टय़ हेच की इथे भरभरून मूर्तिकला पाहायला मिळते.
‘पिकतं तिथे विकत नाही’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. अगदी त्यानुसारच या बारवेचं महत्त्व आणि कौतुक स्थानिकांना फारसं नाही. बारवेच्या एका बाजूचे दगड वापरून मारुतीचं मंदिर बांधलं गेलं. जुनं मंदिर पडलं होतं, कशाला उगाच लांबून दगड आणा, त्यापेक्षा या बारवेच्या एका बाजूला मूर्ती नसल्यामुळे तिथले दगड वापरून हे मंदिर उभारलं गेलं. इथल्या काही मूर्ती कोणी ‘संशोधकांनी’ मागितल्या म्हणून ग्रामस्थांनी त्यांना देऊन टाकल्या. गावाने एवढं औदार्य दाखवलं की त्या कुणाला दिल्या हेदेखील मंडळींना माहिती नाही. सध्या तरी ही बारव पंचमहाभूतांचे प्रहार सहन करत उभी आहे. बाजूला जे मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या बारवेलासुद्धा काही प्रमाणात सिमेंट लागलेलं दिसतं.
या गावाचं पुरातत्त्वीयदृष्टय़ा आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे गाव पांढरीच्या टेकाडावर वसलेलं आहे. शेतात विहीर खणायला लागलं, की अनेक प्राचीन वस्तू जसं की खापरं, मोठय़ा आकाराच्या विटा सापडतात, आणि अर्थातच त्या फेकून दिल्या जातात. जेव्हा या गावकऱ्यांना गावाबद्दल ही माहिती सांगितली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. गावात २-३ जुन्या विहिरी आहेत. कापसाची शेती मोठय़ा प्रमाणावर केली जाते, तसेच बोराची झाडसुद्धा भरपूर आहेत. पैठणपासून जवळ असलेल्या या ठिकाणाला मुद्दाम वाट वाकडी करू भेट दिली पाहिजे. या गावचा हा सांस्कृतिक इतिहास जगापुढे आला पाहिजे. आव्हाणे इथला निद्रिस्त गणपती आणि घोटण इथले मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा याच परिसरात वसलेले आहेत. नगर जिल्ह्य़ातल्या शेवगाव तालुक्यातली ही भटकंती स्मरणीय होण्यासाठी खांबपिंपरीला भेट देणं अनिवार्य आहे.
vidyashriputra@gmail.com