डॉ. एकनाथ पवार ,अस्थिरोग विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय
सतत खुर्चीत बसून काम करणे, रेडी टू इट फूडचा अतिवापर, शारीरिक हालचाली मंदावणे, शरीरावर थेट सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वातानुकू लित वातावरणात अधिक वावर आदी बदलत्या जीवनशैलीमुळे हाडे ठिसूळ होण्याचे वयोमान आता चाळिशीवरून तिशीपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे प्रौढांसह किशोर आणि तरुण वयातील मुलामुलींनी वेळीच आपल्या हाडांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणताही त्रास नसताना ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजेच हाडे ठिसूळ होण्याचा आजार झाल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाल्याचे प्रसंग तुमच्या अवतीभवती घडले असतील. त्यामुळे हाडांच्या या आजाराबाबत मनात भीती न बाळगता योग्य रीतीने समजून घेणे आवश्यक आहे.
हाडे ठिसूळ का होतात?
तिशीनंतर जरी शारीरिक वाढ थांबली तरी हाडाच्या गाभ्यातील जुनी सारणी नष्ट करून नवीन सारणी भरून स्वत:चे रिमॉडेलिंग, पुनर्निमाण करीत असतात. हाडांमध्ये भक्षक म्हणजे सारणी नष्ट करणाऱ्या आणि सर्जक म्हणजे नवी सारणी बनवणाऱ्या पेशी असतात. या प्रक्रियेत कॅल्शियम अत्यावश्यक असते. शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाचीही आवश्यकता असते. हाडांमध्ये जेव्हा रिमॉडेलिंगची प्रक्रिया हळूहळू कमी होते आणि मात्र जुनी सारणी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू राहते, त्या वेळी हाडांची घनता कमी व्हायला लागते आणि हाडे ठिसूळ बनतात. या आजारालाच ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होणे असे म्हणतात.
हाडे ठिसूळ होण्याची लक्षणे
बहुतांश वेळा हाडे ठिसूळ झाल्याची कोणतीही लक्षणे बाहेरून दिसून येत नाहीत. हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया संथ असल्याने हळूहळू शरीरात घडत असते. त्यामुळे याची लक्षणेही बऱ्याचदा आजार झाल्यानंतरच आढळून येतात असे नाही. काही व्यक्तींमध्ये मात्र धावपळ केल्यानंतर हाडांचे सांधे दुखणे, थकवा येणे अशी लक्षणे दिसायला लागतात. हाडे ठिसूळ झाल्याने छोटासा जरी अपघात झाला तरी अस्थिभंग होण्याची शक्यता असते. काही रुग्णांमध्ये अशा अपघातानंतरच आजाराचे निदान होते.
हाडांची वाढ
वीस वर्षांपर्यंत सर्वसाधारणपणे मुला-मुलींच्या हाडांची वाढ झपाटय़ाने होत असते. त्यामुळे या वयातच हाडांची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तिशीनंतर हाडांची घनता आणि बळकटी ही आधी झालेल्या हाडांच्या वाढीवर अवलंबून असते.
बदलती जीवनशैली कारणीभूत
पूर्वी सर्वसाधारणपणे चाळीस वर्षांनंतर या आजाराची बाधा होत असे. शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तिशी गाठलेल्या व्यक्तींचीही हाडे ठिसूळ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने सातत्याने खुर्चीत बसून काम करत असल्याने हाडांवर ताण देणारी प्रक्रिया कमी वेळा होते, तसेच आहारात जंकफूडचा समावेश आणि मुख्यत: ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळेही कॅल्शियमची कमतरता भासते. घर आणि कार्यालयात नेहमी वातानुकूलित वातावरणामध्ये वास्तव्य असल्याने सूर्यप्रकाशाचा थेट शरीराशी संबध येत नाही. आहारात मीठ, कॉफी, शीतपेये यांचा अंतर्भाव हाडांना अत्यंत मारक ठरतो.
कॅल्शियमच्या गोळ्यांचा सर्रास वापर
हात, पाय किंवा सांधेदुखीसाठी कोणत्याही वैद्यकीय चाचण्या न करता कॅल्शियमच्या कमतरतेने दुखत असल्याचे मानून सर्रास कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या जातात. खरंतर अशा रीतीने आवश्यक नसतानाही कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढून दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त तहान आणि वारंवार लघवी, पोटदुखी आणि पचन समस्या, हाडांच्या वेदना आणि स्नायूची कमतरता, सुस्ती व थकवा, चिंता आणि निराशा, उच्च रक्तदाब आणि असामान्य हृदयाचे ठोके आदी धोके संभवू शकतात.
ऑस्टिओपोरोसिसचे निदान
ज्या हाडांना ऑस्टिओपोरोसिसची शक्यता दिसत आहे, त्या भागाचा ‘एक्स-रे’ काढल्यास निदान होऊ शकते. ‘बीएमडी’ किंवा ‘डेक्झा स्कॅन’ या चाचण्यांद्वारे आजाराचे निदान करता येते.
संतुलित आहार आणि व्यायाम
व्यायाम ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करते. हे हाडांवर ताण ठेवते आणि यामुळे हाडांच्या वाढीस उत्तेजन मिळते. संतुलित आहार आपल्याला लहान वयापासून मजबूत हाडे तयार करण्यास मदत करते. शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडे मजबूत करण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आवश्यक आहे. प्रौढांना दररोज ७०० मिलीगॅ्रम कॅल्शियमची गरज असते, तर वीस वर्षांपर्यंतच्या मुलामुलींमध्ये १००० ते १२०० मिलीगॅ्रमपर्यंतची आवश्यकता असते. संतुलित आहारातील घटक हे कॅल्शियम मिळवण्यास सक्षम असावेत.
कॅल्शियमचे स्रोत
दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या, जसे ब्रोकोली, कोबी इत्यादी. (पालेभाज्यांमध्येही कॅल्शियम असते, पण ते तेवढे मोठय़ा प्रमाणात शोषले जात नाही), सोयाबीन, टोफू , सोया पेय, दाणे, ब्रेड, मासे इत्यादी.
‘ड’ जीवनसत्त्वाचे स्रोत
सूर्यप्रकाशाच्या किरणांमधून बहुतांश ‘ड’ जीवनसत्त्व प्राप्त होते. यासाठी दिवसभरातील काही वेळ सनस्क्रीनशिवाय थेट सूर्यप्रकाशाची किरणे त्वचेवर पडतील अशा रीतीने बाहेर वावरणे आवश्यक आहे. सॅल्मनसारखे तेलकट मासे, अंडी, काही प्रकारच्या दूध पावडर यामधूनही ‘ड’ जीवनसत्त्वे मोठय़ा प्रमाणात प्राप्त होतात.
सर्वसाधारणपणे हल्ली वयाच्या ३०-३५ नंतर ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असल्याने तो टाळण्यासाठी योग्य त्या वैद्यकीय तपासण्या आणि जीवनशैलीचे नियमन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणपणातच संतुलित आहारासह व्यायामावर भर देणेही तितकेच गरजेचे आहे.
हाडे ठिसूळ होण्याची कारणे
* हाडे ठिसूळ करणारे काही जोखमीचे घटक असून यातील काही अपरिहार्य आहेत तर काही सुधारणे शक्य आहे.
* महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजनचा साठा कमी होतो परिणामी अस्थिघनताही कमी होते. थायरॉइड ग्रंथीच्या विकारामध्येही हाडे ठिसूळ होऊ शकतात. काही विकारांमध्ये स्टिरॉइड देणे आवश्यक असते. स्टिरॉइडमुळेही हाडे ठिसूळ होतात. म्हणूनच मग काही औषधांसोबत कॅल्शियमच्या गोळ्याही देतात. ऑस्टिओपोरोसिस आनुवंशिक आजार असून घरामध्ये मागच्या पिढीमध्ये कोणाला असल्यास पुढील पिढीलाही होण्याचा अधिक संभव असतो.
शब्दांकन – शैलजा तिवले