भक्ती परब
अलीकडे एक व्यक्ती असते नि पलीकडे एक. काय नातं असतं त्या दोघांमध्ये. तसं म्हटलं तर काहीच नाही, आणि म्हटलं तर बरंच काही. हे जे बरंच काही असतं ना, ते शुद्ध जाणिवेतूनच जन्माला येतं. रक्ताच्या नात्यांनी मिळून तयार झालेल्या कुटुंबाची आज ‘न्यूक्लीयर फॅमिली’ झालीय. अगदी सारे जण दूर दूर टोकावर राहात आहेत. पण जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्तानं आठवण काढावी, अशी बरीच कुटुंबे आज जाणिवेच्या पुलाने जोडली गेली आहेत.
काय गं नव्या ठिकाणी कामावर जाते आहेस, कसं आहे ऑफिस, असं विचारल्यावर, एकीने पटकन सांगितलं. काही विचारू नकोस. हे ऑफिस नसून बिग बॉसचं घरच वाटतं. कोण कधी काही गेम करेल, सांगता येत नाही. तर दुसरी तिला थांबवत म्हणाली, आमच्या ऑफिसमध्ये अगदी घरच्यासारखं वातावरण असतं. तिचे हे वाक्य ऐकून लेडीज स्पेशलमधील मुलींचा घोळका तिच्याकडे पाहू लागला. असे काहीसे संवाद आपल्या आजुबाजूला सहज कानावर पडतात. व्यवसाय, नोकरी निमित्ताने घरापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये असतो. त्यामुळे अलीकडे बऱ्याच ठिकाणी नोकरदारांना, काम करणाऱ्या प्रत्येकाला ताणरहित काम करता यावं, यासाठी अनेक संस्था उपक्रम राबवताना दिसतात. घरचं वातावरण ऑफिसात राखलं जाईल, याची काळजी घेतली जाते. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मृदुला पुजारी हिने सांगितलं.
‘आमच्या कार्यालयात अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं. आम्ही नवरात्र, दिवाळी आणि काही विशेष सण एकत्र साजरे करतो. कुणाचा वाढदिवस असेल तर त्याला भेटवस्तू दिल्या जातात, त्याच्यासाठी ‘सरप्राईज पार्टी’ही होते. कधी सगळे मिळून एकत्र चित्रपट बघायला जातो. इतकंच नव्हे तर माझी निघायची वेळ झाली आणि एखादं तातडीने करायचं काम आलं तर माझे सहकारी ते पूर्ण करतात. कुणाला काही अडी-अडचणी असतील तर एकमेकांशी बोलून त्यावर मार्ग काढला जातो, असं मृदुलाने सांगितलं.
व्यवसायाच्या, शिक्षणाच्या निमित्ताने गाव वा शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. कलाक्षेत्रात काम करणारी मंडळी बहुतेकदा पुणे, नाशिक आणि आसपासच्या परिसरातून मुंबईत येतात. अशा वेळी त्यांना काम मिळालेलं असतं. पण राहण्याच्या जागेचा संघर्ष असतो. काही वर्षांपासूनचं चित्र पाहिलं तर गोरेगाव, मालाड, अंधेरी आणि आसपासच्या भागांत एकाच खोलीत सात-आठ जण एकत्र राहणारी कलाक्षेत्रातील अनेक मंडळी आहेत. गोरेगावच्या वनराई सोसायटीसारख्या जागा यासाठीच परिचित आहेत. जयेश शिवलकर आणि त्याच्या मित्रांची अशीच भेट झाली. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, छायाचित्रकार अशा कला क्षेत्राशी निगडित या मित्रांचा गट कामानिमित्त मुंबईत आला आणि राहत्या जागेच्या निकडीने ते भेटले. त्यामुळे घरच्यांसारखं त्यांचं नातं जुळलं. कलेशी संबंधित विविध विषयांवर त्यांच्यात चर्चा होते. घरातील जबाबदाऱ्या ते एकमेकांत वाटून घेतात. दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका आपण पाहिली आहे. असंच वातावरण यांच्या घरी असतं. पण यांच्याहीपेक्षा वेगळं कुटुंब जो निगुतीने सांभाळतोय, तो मनोज पांचाळ हा सामाजिक कार्यात रमलेला तरुण आहे.
डोंबिवलीतील ‘जाणीवाश्रम’ हे अनेक आजी-आजोबांचं हक्काचं घर झालं आहे. सध्या २३ आजी-आजोबा येथे मुक्कामाला आहेत. त्याच्यासाठी त्याचं हे कुटुंब आहे. आयुष्याच्या सायंकाळी काहींना चांगले अनुभव येत नाहीत. अशांना त्यांच्या घरातून काढून त्यांच्या हक्काचं घर देणारा हा अवलिया घरात ज्येष्ठ मंडळी का असायला हवीत, याचं महत्त्वसुद्धा तरुणाईला पटवून देतो.
एकीकडे मनोजची अशी सामाजिक जाणीव आणि दुसरीकडे आपल्या जाणिवेतून कल्पनाशक्तीचे पंख लावून साहित्याच्या आभाळात भरारी घेणारा कथा क्लब हा चमू आहे. ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे आणि चारुशीला ओक यांनी मिळून याची स्थापना केली. लेखन करणाऱ्या चारचौघी नाहीत तर सध्या १४ जणींनी एकमेकांच्या साथीने लेखन चळवळच उभी केली आहे.
लिहिण्याची आवड असलेल्या या सगळ्याजणी भेटतात, कोण काय लिहितं यावर चर्चा करतात. यातल्या बहुतेक जणी कथालेखन करतात. कथालेखन केल्यावर महिन्यातून एकदा जमायचं. लिहिलेल्या कथा वाचून दाखवायच्या त्यावर चर्चा करायची. यामुळे त्यांच्यात संवादाचा पूल बांधला गेला. यातील काहींच्या कथा दिवाळी अंक, मासिकांत वा साप्ताहिकात छापून येतात. त्यांच्यातील राजश्री नावाच्या सखीने एकच कथा विनोदी, रहस्यमय, कौटुंबिक, शोकात्म अशा चार वेगळ्या प्रकारे लिहिली. आणि ती वेगवेगळ्या चार दिवाळी अंकात छापून आली. यातल्या काहीजणींची स्वतंत्र पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. लेखनाच्या निमित्ताने त्यांच्यात निर्माण झालेलं कुटुंबबंधन हे त्यांच्यासाठी एक वेगळं विश्व आहे. लेखनाच्या व्यक्तिरिक्त एकमेकींच्या घरात एकत्र जमतात, कधी एकत्र फिरायला जाणं होतं. पण लेखन सोडून इतर विषयांवर अघळपघळ गप्पा मारायला इथे बंदी आहे. या सगळ्याजणी भेटल्यावर लेखनावर चर्चा करायची, असा दंडक आहे.
जसं आपलं कुटुंब, तसंच मालिकांमधली काही कुटुंबंही आपल्याला जवळची वाटतात. सोनी मराठी वाहिनीवरील ‘हम बने, तुम बने’ या मालिकेतील बने कुटुंबाने वर्षभरापासून रसिकांना आपलंसं करायला सुरुवात केली आहे. यात मल्हार बने ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता अजिंक्य जोशी म्हणाला, आम्ही कलाकार म्हणून एकमेकांना ओळखत होतो. परंतु या मालिकेतील कुटुंब साकारताना पहिल्यांदाच एकत्र आलो. सकाळी ९ ते रात्री १० आम्ही चित्रीकरणामुळे सेटवरच असतो. त्यामुळे घरच्यासारखंच हेही कुटुंब झालं आहे. आता आम्ही इतके एकमेकांना ओळखू लागलोय, की एखाद्या घटनेवर कोण कशा प्रकारे व्यक्त होईल, हेसुद्धा कळू लागलं आहे. अभिनेते प्रदीप वेलणकर आणि अभिनेत्री उज्ज्वला जोग आमच्या आई-वडिलांची भूमिका साकारत आहेत. पण ते खऱ्या आयुष्यातही आमचे आई-वडील असल्यासारखे वाटतात. त्यांचा वडिलकीचा सल्ला आम्हाला दिलासा देतो. त्यांचा आम्हाला आधार वाटतो.
नात्यांची ओढ असणे हा मनुष्यस्वभावच आहे. माणसाला नात्यांचा ओलावा हवाच असतो. त्यामुळे कुटुंबाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गेल्यावर नाती निर्माण होतात आणि नात्यांचं एक वर्तुळ पूर्ण होतं.
-माधवी कुंटे, लेखिका