प्रशांत ननावरे
आकाराने मुबंईपेक्षाही लहान आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला सिंगापूर जागतिक नकाशावरील पर्यटकांचं एक खास आकर्षण झालेला आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती.
चायनीज आणि मलाय खाद्यसंस्कृतीच्या मिलाफातून तयार झालेले खाद्यपदार्थ ही आता सिंगापूरची ओळख झाली आहे. जागोजागी असलेले ‘हॉकर्स सेंटर’ हे खाण्याचे प्रमुख अड्डे आहेत. सिंगापूरच्या मूळ निवासींमध्येही त्याचं अप्रूप दिसतं.
‘चायनाटाऊन’च्या प्रसिद्ध परिसरात असलेले मॅक्सवेल फूड सेंटर, मध्य सिंगापूरच्या डाऊनटाऊनमधील ऐतिहासिक इमारतीमध्ये असलेलं ‘ लौ पा साट’ म्हणजेच ‘तेलोक अय्यर मार्केट’, मरिना बे सॅन्ड येथील मोठय़ा मॉलमधील फूड कोर्ट अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो. चायनीज आणि भारतीय पद्धतीचे पदार्थ येथे मिळत असले तरी त्यांची चव अतिशय वेगळी आहे. ते तिखट असले तरी झणझणीत नाहीत आणि मसालेदार असले तरी जळजळीत नाहीत, हा चवीमधला फरक आहे. स्टॉल्सवरील जवळपास सर्वच पदार्थ उकडून, शिजवून आणि मसाले लावून ठेवलेले असतात आणि ऑर्डरप्रमाणे तयार करून दिले जातात. या पदार्थाची किंमतही ५ ते २० सिंगापूर डॉलर्सच्या दरम्यान असते. त्यामुळे सिंगापूरला जाल तेव्हा उंची रेस्टॉरंटला भेट देण्यासोबतच जागोजागी असलेल्या या ‘हॉकर्स सेंटर’मधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतल्याशिवाय तुमची सिंगापूर वारी पूर्ण होणार नाही, हे नक्की.