आसिफ बागवान

व्हॉट्सअ‍ॅपने आणलेले नवे गोपनीयता धोरण तुम्हाला स्वीकारावेच लागेल. अन्यथा ८ फेब्रुवारीनंतर तुम्हाला हे अ‍ॅप वापरताच येणार नाही. थोडक्यात व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना चहूबाजूने घेरले असून आता सापळय़ात पाय टाकण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.

फेसबुकने सहा वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केले, तेव्हा सुरू झालेली कुजबूज अखेर २०२१ मध्ये खरी ठरली आहे. झटपट संवादाचे लोकप्रिय अ‍ॅप असलेले व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकने १९ अब्ज डॉलर मोजून आपल्या ताब्यात घेतले, तेव्हाच आता व्हॉट्सअ‍ॅपवरील आपली गोपनीयता धोक्यात आली आहे, असे वापरकर्त्यांना वाटले होते. त्याला कारणही तसेच. सोशल मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठे व्यासपीठ असलेल्या फेसबुकने आपल्याजवळ जमा होणाऱ्या वापरकर्त्यांच्या माहितीचा अर्थाजनासाठी कसा वापर केला, हे लपून राहिलेले नाही. जाहिरात कंपन्यांपासून राजकीय पक्षांपर्यंत अनेकांना वापरकर्त्यांची माहिती विकून फेसबुकने बक्कळ कमाई केली. त्याच वेळी आपल्याला कट्टर स्पर्धा करू शकणाऱ्या अन्य सोशल मीडिया अ‍ॅपना या ना त्या प्रकारे मोडीत काढण्याची दांडगाईही या कंपनीने नेहमीच केली. व्हॉट्सअ‍ॅप ताब्यात घेण्याचा करार हा त्याच धोरणाचा एक भाग होता. त्यामुळे जवळपास पावणेदोन अब्ज डॉलर इतके बाजारमूल्य असलेले हे अ‍ॅप फेसबुक १९ अब्ज डॉलरना खरेदी केले. त्याच वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरील तत्कालीन ६० कोटी वापरकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला हवी होती. पण ‘तुमच्या गोपनीयतेबद्दलचा आदर आमच्या डीएनएमध्ये भिनला आहे,’ हे व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘प्रायव्हसी’ धोरणावरील वाक्य त्यांना आश्वस्त करून गेले.

आज, सहा वर्षांनंतर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला पायदळी तुडवून कमाई करण्याचे धोरण व्हॉट्सअ‍ॅपने आणले आहे. दोनच दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आपले गोपनीयता धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) आणि अटी व शर्ती (टम्र्स अ‍ॅण्ड कंडिशन) यांत महत्त्वाचा बदल केला. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिवसरात्र गुरफटून गेलेल्या बहुसंख्य वापरकर्त्यांना अद्याप या बदलाची कल्पनाही नसेल. पण अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, वापरकर्त्यांची गोपनीय माहिती फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही कंपन्यांशी ‘शेअर’ करण्याचे अधिकार व्हॉट्सअ‍ॅपने या नवीन धोरणांतून स्वत:कडे घेतले आहेत आणि जर तुम्हाला ही बळजबरी नको असेल तर तुम्ही खुशाल व्हॉट्सअ‍ॅप सोडून जाऊ शकता, असा इशाराच व्हॉट्सअ‍ॅपने दिला आहे. येत्या ८ फेब्रुवारीपासून हे बदल अमलात येणार असून त्यापूर्वी नवीन प्रायव्हसी धोरण कबूल न करणाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरताच येणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयता धोरणात तीनच बदल केले आहेत. पण हे तीन बदल वापरकर्त्यांची गोपनीयता गुंडाळण्यास पुरेसे आहेत. यातील पहिला बदल म्हणजे, वापरकर्त्यांच्या माहितीचे संकलन आणि प्रक्रिया. या बदलानुसार व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या मोबाइलमधील बॅटरीची सद्यस्थिती, नेटवर्क सिग्नल, मोबाइल क्रमांक, आयपी अ‍ॅड्रेस, मोबाइल कंपनी, भाषा आणि कालक्षेत्र (टाइमझोन) अशी सगळी माहिती व्हॉट्सअ‍ॅपला वेळोवेळी गोळा करता येणार आहे. सध्याच्या स्मार्टफोनवरील अनेक अ‍ॅपमध्ये अशाप्रकारची माहिती गोळा करण्याची मुभा आपण आधीच देऊन टाकलेली आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप पहिल्यांदाच वापरकर्त्यांची अशी माहिती गोळा करत आहे. ती कशासाठी, या प्रश्नाला ठरावीक गोंडस उत्तर ‘अ‍ॅपच्या अद्यतन आणि वापरकर्त्यांच्या सहजतेसाठी’ असे देण्यात आलेले आहे.

यातील दुसरा बदल म्हणजे, यापुढे ‘व्हॉट्सअ‍ॅपवरील बिझनेस खाती त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप चॅटमधील माहिती फेसबुकशी संबंधित अन्य खात्यांशी शेअर करू शकतील’. हा बदल वरकरणी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरून व्यवसाय करणाऱ्यांपुरता मर्यादित वाटत असला तरी, त्याचा थेट परिणाम सामान्य वापरकर्त्यांवर होणार आहे. म्हणजे, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून एखाद्या बिझनेस गटाशी (ग्रुप) संलग्न असाल तर तुम्ही त्या ग्रुपवरून शेअर केलेली माहिती किंवा तुमची माहिती कशी वापरायची आणि कुणाशी शेअर करायची याचा अधिकार संबंधित बिझनेस खात्याला असणार आहे. याचाच अर्थ, येथेही तुमची गोपनीयता भंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपनेच अत्यंत साळसूदपणे, ‘यापुढे बिझनेस खात्यांशी आपली माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा. तुमची माहिती अनेकांना दिसू शकते’ असे या गोपनीयता धोरणातच म्हटले आहे.

फेसबुकने आपला पसारा सातत्याने वाढवत नेला आहे. जे अ‍ॅप किंवा सोशल मीडिया संकेतस्थळ भविष्यात आपल्याला स्पर्धक बनू शकेल किंवा अधिक वापरकर्त्यांना आकर्षित करू शकेल, ते अ‍ॅप आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटाच फेसबुकने लावला होता. यातूनच इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसारखे तगडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांनी ताब्यात घेतले. याखेरीज फेसबुक वॉच, फेसबुक पोर्टल, फेसबुक मेसेंजर, गिफी, मॅपिलरी, ऑक्युलस व्हीआर असे अ‍ॅपही या कंपनीच्या ताब्यात आहेत. याशिवाय भारतातल्या ‘जिओ प्लॅटफॉर्म’मध्येही फेसबुकचा दहा टक्क्य़ांच्या आसपास हिस्सा आहे. तर अशा सर्व कंपन्यांना – तुम्ही त्यांचे खातेधारक असाल वा नसाल- तुमची माहिती आपोआप मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयता धोरणातला तिसरा बदल हेच सांगतो. व्हॉट्सअ‍ॅपवर जमा होणारी सर्व माहिती फेसबुकच्या कंपन्यांना पुरवण्यात येईल, असे या धोरणात म्हटले आहे. त्याचा परिणाम काय होईल, हे वेगळय़ाने सांगण्याची गरज नाही.

हे धोरण व्हॉट्सअ‍ॅपने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. आतापर्यंत थोडक्याच अ‍ॅप अपडेटमधून ते जारी करण्यात आले आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व वापरकर्त्यांपर्यंत ते पोहोचवले जाईल. यातील मेख अशी तुम्हाला हे धोरण कबूल करावेच लागेल. अन्यथा ८ फेब्रुवारीनंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरताच येणार नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर नजरा खिळवून बसणाऱ्या वापरकर्त्यांना नाईलाजानेच हे धोरण स्वीकारावे लागेल. अनेक कार्यालये, व्यवसाय यांच्या संवादांची देवाणघेवाणही व्हॉट्सअ‍ॅपवरून होते. त्यांनाही व्हॉट्सअ‍ॅपची ही बळजबरी सहन करावी लागणार आहे. हा जुलूम सोसायचा नसेल तर व्हॉट्सअ‍ॅपला पर्यायी अ‍ॅप शोधून त्यावर बस्तान बसवणे, हा मार्ग आहे. पण तो सोपा नाही. थोडक्यात व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना चहूबाजूने घेरले असून आता सापळय़ात पाय टाकण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.

Story img Loader