शैलजा तिवले
दम्याचा त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टर इन्हेलर वापरण्याचा सल्ला देतात. इनहेलरची सवय लागते, त्यात स्टिरॉइडचा वापर केला जातो, अशा अनेक गैरसमजांमुळे इनहेलरच्या वापराकडे पाठ फिरवली जाते. खरंतर दम्याच्या त्रासामध्ये इन्हेलर हा योग्य पर्याय कसा आहे, हे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अमिता आठवले आणि डॉ. विकास ओसवाल यांच्याकडून समजून घेऊया..
दमा किंवा अस्थमा हा माणसाच्या श्वसननलिकेचा स्वभावावर अवलंबून असणारा आजार आहे. दमा ही अॅलर्जिक प्रकृती आहे. दमा बरा होतो का, असा प्रश्न अनेकदा डॉक्टरांना विचारला जातो. न्युमोनिया किंवा क्षयरोग बरा होतो. त्याप्रमाणे दमा बरा होतो, असे म्हणता येत नाही. दम्याच्या व्यक्तीने कोणत्या बाबींनी नेमका त्रास होतो हे समजून घेऊन नियंत्रित राहण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.
दमा म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे आपला श्वसनमार्ग दीड ते दोन सेंटीमीटर आकाराचा असतो. काही कारणांमुळे श्वसननलिकेच्या आतील अस्तराला सूज येते आणि येथील स्नायूंचे आकुंचन पावते. त्यामुळे श्वसनलिकेचा आकार कमी झाल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. लाजाळूच्या पानांना स्पर्श केल्यास ते जसे मिटतात, तसे दम्याच्या रुग्णांच्या संपर्कात अॅलजीदायक घटक आल्यास त्यांची श्वासनलिका आकुंचन पावते. नाकाला चिमटा लावल्यानंतर स्ट्रॉने श्वास घेण्याचा प्रयोग केल्यास होणाऱ्या त्रासाएवढय़ा प्रतीचा त्रास या व्यक्तींना दरवेळेस श्वास घेताना होत असतो. हा त्रास कायमस्वरूपी नसतो. औषध घेतल्यानंतर किंवा कारणांचे निवारण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे या व्यक्ती श्वासोच्छवास घेऊ शकतात.
इन्हेलरबाबत रुग्णांची नकारात्मक भूमिका
इन्हेलर घ्यायला किमान पाच मिनिटे वेळ लागतो. याउलट गोळ्या घेणे सोपे वाटते, अशी रुग्णांची मानसिकता असते. त्यामुळे इन्हेलरच्या वापरासाठी नकार दर्शवितात. तसेच गोळीची किंमत वीस रुपयांपेक्षा कमी आहे. इन्हेलरची किंमत तुलनेने अधिक आहे. पालिका रुग्णालयात मात्र प्रत्येक महिन्याला इन्हेलर औषधासह मोफत दिले जातात.
इन्हेलरची सवय लागते का?
रोज दिवसातून दोन वेळा ब्रश करतो, मग आपण म्हणतो का याची सवय लागली आहे. तसेच इन्हेलरचे आहे. इन्हेलर जर तुमच्या श्वसनप्रक्रिया नियमित ठेवण्यासाठी आवश्यक असेल तर त्याचा वापर करणे म्हणजे सवय नव्हे. दम्याचा आजार असलेल्या प्रत्येक रुग्णाला आयुष्यभर इन्हेलरचा वापर करावा लागतो, हा गैरसमज आहे. तुमच्या फुप्फुसाच्या कार्याची तपासणी करूनच इन्हेलरची आवश्यकता आहे का हे ठरवले जाते. फुप्फुसाचे कार्य योग्यरीतीने सुरू नसल्यास त्याच्या धोक्याच्या पातळीवरून इन्हेलरमधून औषधाची मात्रा किती द्यायची, दिवसातून किती वेळा आणि किती दिवस वापर करावा हे सांगितले जाते. त्यामुळे दमा झाला म्हणजे इन्हेलरची आवश्यकता असेलच असे नाही. विविध प्रकारचे इन्हेलर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. काही इन्हेलर हे दम्याच्या अधिक त्रास झाल्यास तात्काळ आराम देणारे, त्रास नियंत्रित ठेवणारे आणि काही इन्हेलर स्टिरॉइडची मात्रा देणारे असतात.
पाऊस सुरू असेल आणि आपल्याला कामासाठी बाहेर जायचे असल्यास भिजू नये यासाठी छत्री घेऊन जातो. त्याप्रमाणे इन्हेलर बचावात्मक काम करत असतात. इन्हेलर घेतल्यानंतर ते श्वसननलिकेभोवती रक्षण कवच निर्माण करते. त्यामुळे मग दमा जागृत करणारी कोणती कारणे आल्यास श्वसननलिका बाधित होत नाही आणि श्वसनप्रक्रिया नियमितपणे सुरू राहते. त्यामुळे बचावात्मक कवचचा वापर केल्याने भविष्यातील त्रास वेळीच रोखणे शक्य असते.
स्टिरॉइडयुक्त इनहेलर
बऱ्याचदा स्टिरॉइडयुक्त इन्हेलरच्या वापरासाठी रुग्ण नकार देतात. स्टिरॉइडच्या अतिवापराचे दुष्परिणाम आहेत हे जरी खरे असले तरी इन्हेलरमधून दिली जाणारी मात्रा किती आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्टिरॉइडची मात्रा दोन हजार मायक्रोग्रॅमहून कमी असल्यास शक्यतो दुष्परिणाम कमी असतात. इन्हेलरमध्ये ४०० ते ८०० मायक्रोग्रॅमपर्यंत औषध दिले जाते. त्यातून ते थेट श्वसननलिकेत घेतल्याने रक्तात शोषले जाण्याची शक्यता कमीच असते, असे डॉ. आठवले स्पष्ट करतात.
गुळण्या करणे अत्यावश्यक
इन्हेलरच्या वापरानंतर लगेचच गुळणी करणे आवश्यक असते. जेटचा मारा श्वसननलिकेवर झाल्याने रुग्णाला घशामध्ये कसेतरी होत असते. अशा वेळेस गुळणी न केल्यास मुख्यत: मधुमेहाच्या रुग्णांना बुरशीजन्य संसर्ग होण्याचीही शक्यता असते. ज्यांना गुळणी करणे शक्य नसते त्यांनी ग्लासभर पाणी प्यावे. नुसती चूळ भरल्याने उपयोग नाही. इन्हेलरचा खाण्यापिण्याशी संबंध नाही. कारण हे औषध पोटात जात नाही.
तोंडावाटे औषधांचा वापर का करू नये?
तोंडावाटे घेतली जाणारी औषधे प्रथम पोटातून आतडय़ात जाते. तेथून विविध टप्पे पार करत फुप्फुसापर्यंत पोहचते. त्यानंतर ते श्वसननलिकेपर्यंत पोहचते. या प्रक्रियेमध्ये फार कमी प्रमाणात औषध प्रत्यक्ष श्वसननलिकेपर्यंत पोहचते. त्यामुळे औषधांची मात्राही वाढवावी लागते. त्याऐवजी इन्हेलरच्या माध्यमातून थेट औषध श्वसननलिकेपर्यंत पोहोचल्याने अधिक लवकर आराम पडण्याची शक्यता असते. तोंडावाटे घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणामांच्या तुलनेत इन्हेलरमधून घेतलेल्या औषधांचे परिणाम फारच कमी प्रमाणात आहेत.
इन्हेलरचा योग्य वापर
बऱ्याचदा फुप्फुसाच्या कार्याची चाचणी केल्यानंतर डॉक्टर इनहेलर लिहून देतात. रुग्ण इनहेलर घेतो, परंतु आराम पडत नाही म्हणून काही दिवसांत डॉक्टरकडे जातो. डॉक्टर मग औषधाची मात्र वाढवून देतो, असे चक्र सुरू असते. परंतु रुग्ण इन्हेलरचा योग्यरीतीने वापर करत आहे का याची शहानिशा डॉक्टरही करत नाहीत. त्यामुळे रुग्णही अजाणतेपणाने जमेल तसा वापर करतात आणि औषध योग्य मात्रेमध्ये श्वसननलिकेपर्यंत न पोहोचल्याने त्यांना आराम मिळत नाही. मग अखेर इन्हेलर फायद्याचे नाही, असा गैरसमज करून ते तोंडावाटे घ्यायच्या औषधांकडे वळतात. इन्हेलरच्या वापराचे योग्य समन्वय होण्यासाठी स्पेसर वापर करणे फायद्याचे आहे. डॉक्टरांनी पहिल्यांदा इन्हेलर देताना रुग्णाला त्याबाबत प्राथमिक माहिती देणे गरजेचे आहे. रुग्णांनीही डॉक्टरांकडून याचा नेमका कसा वापर करावा हे समजून घ्यावे. म्हणून रुग्णांना आम्ही प्रत्येक वेळेस येताना इनहेलर सोबत आणण्याच्या सूचना देतो. प्रत्यक्ष रुग्ण त्याचा वापर कसा करतो, याची पडताळणी करतो.
इन्हेलरची स्वच्छता
इन्हेलरचा जो भाग तोंडात घातला जातो, तिथे लाळ लागते. त्यामुळे तो भाग फडक्याने स्वच्छ करून घ्यावा. आठवडय़ातून एकदा धुवायचा असल्यास तो वापरण्यापूर्वी कोरडा होणे आवश्यक आहे. एकदा का त्यात आद्र्रता तयार झाली की बुरशी येण्याची शक्यता असते. अनेकदा रुग्णांचे असे होते की इनहेलर घेतल्यानंतर काही दिवस त्रास होत नाही, मग त्याची आवश्यकता काही काळ भासत नाही. मग तो कुठेही पडलेला असतो. इन्हेलर शक्यतो काम झाल्यानंतर पुसून कोरडा करून योग्यरीतीने ठेवणे गरजेचे आहे. त्याला धूळ लागू नये याची काळजी घ्यावी. स्पेसर आणि इन्हेलर डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट काळाने बदलणे गरजेचे असल्याचे डॉ. आठवले सांगतात.
इन्हेलर घेणे फारसे अवघड नसते. ते एकदा समजून घेतले की व्यवस्थितपणे त्याचा वापर करणे सहज शक्य आहे. अशिक्षित रुग्णही नीट माहिती दिल्यानंतर योग्यरीतीने इन्हेलरचा वापर करतात, हे रुग्णालयात अनुभवले आहे. त्यामुळे दम्याचा आजार बळावण्यापेक्षा योग्यवेळीच तो रोखण्यासाठी इन्हेलरचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
उपचार
दम्याचा त्रासामध्ये श्वसननलिकेला सूज आलेली असते. त्वचेवर भाजल्यानंतर तेथे मलम लावले जाते. परंतु श्वसननलिकेला असे बाहेरून उपचार करणे शक्य नाही. म्हणून मग इन्हेलरच्या माध्यमातून औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. इन्हेलरमधून औषध ओढल्यानंतर ते थेट श्वसननलिकेत पोहचते आणि तेथील सूज कमी करण्यात मदत करते. अशारीतीने औषध घेतल्यास आरामही लवकरात लवकर पडतो.