अवचट,ज्येष्ठ लेखक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताण हा प्रत्येक व्यक्तीला यायलाच हवा. कारण ताणमुक्त राहण्याचा उपाय हा ताणातच आहे. या सृष्टीवर प्रत्येक जिवाला ताण हा असतोच. ताण ही व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक मनुष्य ताण हा कसा घेतो हे संपूर्णपणे त्या व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असते. मलाही ताण येतो. मात्र जगातील इतर व्यक्तींना ज्या प्रमाणात ताण येतो, त्यापेक्षा खूप कमी ताण मला येतो. ताणमुक्त राहण्यासाठी मी ताण हा, का आला आहे, याचा सर्वात अगोदर विचार करतो. आलेल्या ताणावर मात केल्यानंतरच मी ताणमुक्त राहतो. ताण ही आयुष्यात न संपणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आयुष्यात दु:ख फार आहे, असे म्हणणारे लोक हे स्वत:हून ताणाच्या जवळ जातात, असे वाटते. मी लहानपणापासूनच ताणमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा हा प्रयत्न यशस्वीही ठरला आहे. अनेकदा मुलांच्या पालकांचे असते की तू अमुकच एका क्षेत्रात करिअर कर वगैरे. मात्र मुलाला पालक सांगतात, त्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असते. पण माझे तसे नव्हते, मला माझ्या आई-वडिलांवर पूर्णपणे विश्वास होता. माझ्या पालकांनी मला सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात करिअर कर आणि त्यांचा निर्णय प्रमाण मानून मी डॉक्टर झालो. मी माझ्या कामात रमतो, म्हणून मला ताण कधी जाणवत नाही. आज प्रत्येक व्यक्ती ही पैशांच्या पाठीमागे धावताना दिसते. त्यालाही कळत नाही तो का धावत आहे. त्यादरम्यान त्याला त्याच्या कुटुंबालाही वेळ देता येत नाही. मात्र मग त्याला ताण येतो त्याच्या व्यस्तपणाचा. मी कधीच कोणत्या गोष्टीचा ताण घेत नाही. तो ताण कसा दूर होईल यासाठी फक्त एक रात्र घेतो. रात्री विचार करतो. ताण का आला आहे याचा विचार करून त्यासाठी काय करता येईल हे ठरवतो. सकाळी उठून मग ताण दूर करण्यासाठी मी कामाला लागतो. ही माझी ताण दूर करण्याची पद्धत आहे. अनेकजण ताण दूर करण्यासाठी वाचन, व्यायाम, फिरण्यास जाणे वगैरे गोष्टी करतात. मात्र मला असे वाटते की ताण दूर करण्यासाठी ताण का येतो याचा विचार केला आणि तो दूर करण्यासाठी मेहनत घेतली तर ताण हा कायमचा दूर होतो. मी ताण दूर करण्यासाठी चित्र काढतो, लाकडांवर कलाकुसर करतो. ताण दूर करण्यासाठी माझ्या आयुष्यातील मोलाचा वाटा म्हणजे मुक्तांगण होय. पत्नी सुनंदा हिच्या आजारपणाच्या काळात मी खचून गेलो नाही. त्यावेळी मला खूप ताण आला होता. मात्र सुनंदानेच मला सक्षम बनवले होते, त्यामुळे तो ताण दूर करण्यासाठी मी तिची आजारपणात सेवा केली. जे माझे नाही ते मला मिळणार नाही, मात्र जे माझे आहे ते मला नक्कीच मिळणार. हाच विचार करून मी जगतो. माणसाकडे निर्मितीचे तत्त्व आहे. इतके सुंदर तत्त्व निसर्गाने आपल्याला दिले असताना आपण त्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करून ताणमुक्त राहायला हवे.

शब्दांकन – हृषीकेश मुळे