डॉ. अविनाश भोंडवे

बेल्स पाल्सी म्हणजे अर्ध्या चेहऱ्यावरून वारे जाणे. या आजारात चेहऱ्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचे आकुंचन-प्रसरण थांबते आणि ते लुळे पडतात. क्वचितप्रसंगी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात.

मेंदूमधून एकूण १२ विशेष मज्जातंतू निघतात. त्यांना क्रेनिअर नव्‍‌र्हस म्हणतात. यातील सातव्या क्रमांकाच्या मज्जातंतूंना फेशियल नव्‍‌र्ह म्हणतात. मेंदूपासून डोक्याच्या कवटीबाहेर आल्यावर या फेशियल नव्‍‌र्हला पाच शाखा फुटतात. त्या कपाळ, भुवया, पापण्या, वरचा आणि खालचा ओठ, गाल, कानाच्या पुढील भाग, मानेचा एका बाजूचा भाग यावरील स्नायूंची हालचाल नियंत्रित करत असतात. या मज्जातंतूला इजा झाल्याने या स्नायूंच्या हालचाली बंद होतात.

लक्षणे

* चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू लोंबू लागतात, त्यामुळे दोन्ही बाजू असमान दिसतात.

* चेहरा भावनारहित दिसतो.

* चेहऱ्यावरचे स्नायू मध्येच आखडतात आणि फडफडतात.

* खाणे पिणे अशक्य होते.

* बोलणे स्पष्ट न राहता अडखळत होते.

* जिभेची चव पूर्णपणे किंवा अर्धवटपणे नष्ट होते.

* कानामध्ये वेदना होतात.

* उच्च पट्टीतल्या आवाजाचा त्रास होतो.

* डोळ्याच्या पापणीची उघडझाप बंद होते.

* डोळा कोरडा पडतो.

* आजाराची सुरुवात झाल्यावर ही लक्षणे लगेच दिसू लागतात आणि दोन दिवसांत ती वेगाने वाढतात.

कारणे

* बेल्स पाल्सी १५ ते ६० वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला होऊ  शकते. दर ५००० व्यक्तींत एकाला हा आजार होऊ  शकतो. बेल्स पाल्सी एकदा झाली तरी ती पुन्हा होऊ  शकते.

* बेल्स पाल्सी होण्याचे खरे कारण वैद्यकीय शास्त्राला स्पष्टपणे माहिती नाही. मात्र काही विषाणूजन्य संसर्गामुळे फेशियल नव्‍‌र्हला सूज येते, ती फुगते आणि कवटीच्या ज्या छिद्रातून ती बाहेर येते, त्या हाडामध्ये ती दबली जाते. या दबावामुळे फेशियल नव्‍‌र्हचे कार्य थांबते. खालीलपैकी एखादा विकार असल्यास हा त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

*  हर्पीस सिम्प्लेक्स- या विषाणूमुळे होणाऱ्या आजारात ओठांच्या कोपऱ्यावर, लैंगिक अवयवांवर, गुदद्वारावर, त्वचेवर, डोळ्यांना जखमा होतात.

मधुमेह

सर्वसाधारण सर्दी

फ्लू

उच्च रक्तदाब

गोचिडांमधून पसरणाऱ्या बोरेलिया नावाच्या जंतूंमुळे होणारा लाइम डीसिज इन्फेक्शस मोनोन्युक्लिओसिस एचआयव्ही किंवा इतर ऑटो इम्युन आजार सार्कोयडोसिस अपघातात डोक्याला लागलेला मार

निदान-

बेल्स पाल्सीचे निदान रुग्णाच्या वैद्यकीय तपासणीतूनच होते. रुग्णाची लक्षणे लक्षात आल्यावर डॉक्टर त्याला दोन्ही डोळे घट्ट आवळून घ्यायला सांगतात, त्यामध्ये ज्या बाजूला त्रास झाला आहे, त्या बाजूचा डोळा उघडा राहतो. तपासण्यांमध्ये डॉक्टर रुग्णाला गाल फुगवायला सांगतात, ओठांचा चंबू करायला सांगतात, ओठ फाकवून दात दाखवायला सांगतात, कपाळाला आठय़ा पाडायला सांगतात. या क्रिया करताना रुग्णाच्या चेहऱ्याच्या ज्या बाजूला त्रास झाला आहे, त्या बाजूच्या स्नायूंची हालचाल होत नाही. यावरून बेल्स पाल्सीचे निदान होते.

फेशियल नव्‍‌र्हला कितपत इजा झाली आहे, हे पाहण्यासाठी ईएमजी हा मज्जातंतूतील विद्युतप्रवाहाचे मापन करणारा आलेख काढला जातो.

उपचार

यामध्ये काही विषाणूविरोधी औषधे, स्टीरॉइड्स, बी१२ची इंजेक्शन्स दिली जातात. मात्र त्रास झालेला चेहऱ्याचा अर्धा भाग रुग्णाने स्वत:च सतत चोळणे, फुगे फुगवणे, इलेक्ट्रिक स्टीम्युलेशन असे काही उपाय केले जातात. काही रुग्णांमध्ये आजार बरा झाल्यावरही चेहऱ्यामध्ये काही दोष शिल्लक राहतात. अशा वेळेस प्लास्टिक सर्जरी करून त्यात सुधारणा करता येते.

Story img Loader