-डॉ. अविनाश भोंडवे
मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे संपूर्ण शरीर विकलांग करून टाकणारा एक दुर्धर आजार. रुग्णाला दीर्घकाळ बाधित करणारा असा ‘स्वयंप्रतिकारक’ पद्धतीचा आजार आहे. शरीरात बाहेरून घुसणाऱ्या जंतूंना नष्ट करण्यासाठी शरीरातील प्रतिकारकशक्ती कार्यरत असते. मात्र काही आजारांत ती आपल्याच शरीरातील एखाद्या अवयवांवर हल्ला करून तो नष्ट करू लागते. अशा आजारांना स्वयंप्रतिकारक रोग (ऑटोइम्युन डिसीज) म्हणतात.
शरीरातील मज्जातंतूवर ‘मायलीन’ नावाचे एक आवरण असते. ते काही विशेष चरबीयुक्त पदार्थानी बनलेले असते. मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये या मायलीनवर आपल्या प्रतिकारशक्तीद्वारे विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्या मज्जातंतूंमधून होणारे मज्जासंस्थेचे संदेशवहनाचे कार्य स्थगित होते.
या आजाराची लक्षणे दोन टप्प्यांत दिसून येतात. पहिल्या प्रकारात आजाराची सुरुवात होताना काही लक्षणे आढळतात. ती हळूहळू वाढत जातात. अनेक काळ त्रास राहिल्यानंतर मग आपोआप कमी होतो आणि बऱ्याचदा ते नाहीसेही होतात. याला प्रायमरी प्रोग्रेसिव्ह म्हणतात. ६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये काही काळाने आधीचे त्रास काही नवीन लक्षणांसह पुन्हा उद्भवतात. त्यानंतर मात्र ते पुन्हा कमी होत नाहीत. या प्रकाराला सेकंडरी प्रोग्रेसिव्ह मल्टिपल स्क्लेरोसिस असेही म्हटले जाते. १० टक्के रुग्णांमध्ये हा त्रास खूप गंभीर स्वरूप धारण करतो आणि शारीरिक कार्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्यही कोलमडून पडते.
कोणाला होतो?
हा आजार आनुवंशिकतेने तर होतोच, पण काही पर्यावरणीय घटकही कारणीभूत ठरतात. १५ ते ६० वयाच्या व्यक्तींमध्ये आणि त्यातही पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दुपटीने अधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एखाद्या कुटुंबात हा आजार असल्यास त्यांच्या जवळच्या नातेसंबंधात इतरांना तो झाल्याचेही आढळते. थायरॉइड, मधुमेह, कोलायटिस असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा संभव अधिक असतो. या रुग्णांच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झालेले आढळते. काही रुग्णांत रक्तामध्ये एपस्टाइन बार नावाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्याने हा आजार झाल्याचेही आढळले आहे. अतिप्रमाणात धूम्रपान, स्थूल व्यक्तींनाही याची बाधा होण्याची शक्यता असते. रुग्णाच्या लक्षणांवरून आणि मज्जासंस्थेच्या विशेष तपासण्यांत याचे प्राथमिक निदान केले जाते. यात रुग्णाचे तोल सांभाळणे, हातापायांच्या क्रियांमध्ये समन्वय असणे, दृष्टी तपासणे इत्यादी मज्जासंस्थेच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते.
प्राथमिक आजाराची लक्षणे
* मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये कोणत्या मज्जातंतूंना इजा झाली आहे आणि ती किती प्रमाणात झालेली आहे, यावर रुग्णामधील लक्षणे आणि त्यांची तीव्रता अवलंबून असते.
* अंगाला बधिरपणा येणे, मुंग्या येणे. बऱ्याचदा ही लक्षणे शरीराच्या एकाच बाजूला दिसून येतात.
* मान पुढे झुकवल्यावर मानेतून विजेचा प्रवाह गेल्याप्रमाणे झटका बसणे.
* हातापायांची आग होणे, अंगाला सतत खाज सुटणे.
* खूप थकवा, अशक्तपणा जाणवणे.
* पायांचे स्नायू ताठर होऊन चालायला त्रास होणे, तोल न सावरता येणे.
* दृष्टिदोष- डोळ्याची उघडझाप होताना दुखणे, दृष्टी मंदावणे, अजिबात न दिसणे अशी लक्षणे एकाच डोळ्यात घडताना आढळतात.
* बद्धकोष्ठता, चक्कर येणे, लैंगिक समस्या
* यामध्ये क्वचितप्रसंगी सतत डोके दुखणे, अन्न गिळताना घास अडकणे, बोलताना अडखळणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शिंकणे, खोकणे कठीण होणे, ऐकायला कमी येणे अशी लक्षणे आढळतात. काही रुग्णांना अपस्माराचे झटकेदेखील येऊ शकतात.
* दुसऱ्या टप्प्यात आधीच्या लक्षणांसोबत मूत्रमार्गामध्ये सतत जंतुसंसर्ग होणे, शरीराची हालचाल करणे अशक्य होणे आणि संपूर्ण शरीराची क्रियाशीलता थांबणे अशी लक्षणे आढळतात.