नंदिनी बेडेकर – शास्त्रीय गायिका
माझा ताण गाण्यानेच जातो. तंबोरे सुरात लागले तरी माझी ताणमुक्ती होत असते. तंबोऱ्याची जोडी सुरात जुळणे हे माझ्यासाठी ताण जाण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येकाला स्वत:चे काम हे महत्त्वाचे असते. आपल्या कामात कार्यमग्न राहणे हा ताणमुक्तीचा उत्तम पर्याय असू शकतो. आनंदी राहणे, लहान लहान गोष्टीतून आनंद शोधणे हा माझा स्वभाव आहे. लहान गोष्टींमध्ये मी आनंद शोधत असते. हा आनंद शोधण्यासाठी खूप मोठय़ा गोष्टी ठरवून मला कराव्या लागत नाहीत. सुट्टय़ा असल्या म्हणून कुठेतरी बाहेर फिरायला जाणे, परदेशात जाऊन ताणापासून मुक्तता मिळवणे असा प्रयत्न माझ्याकडून होत नाही. घरातल्या लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न मी नेहमी करते. कामासाठी सकाळीच घराबाहेर गेलेले पती जेव्हा सायंकाळी लवकर घरी परत येतात तो क्षणही माझ्यासाठी आनंदाचा असतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन आयुष्यातील लहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न केल्यास ताणमुक्तीसाठी फारसा प्रयत्न करावा लागणार नाही. किशोरीताईकडे गाणे शिकायला लागल्यापासून मला ताण येईल अशी संधीच ताईंनी कधी दिली नाही. जेव्हा जेव्हा किशोरीताई आणि मी एकत्र बसायचो. तेव्हा एका वेगळ्या पातळीवरच्या गप्पा आमच्यात व्हायच्या किंवा गाणे व्हायचे. हा असा संवाद त्यांच्याशी असल्याने ताईंनीही कधी मला ताण येऊ दिला नाही. आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा ताण निश्चितच येत असतो. असे असले तरी आपण घेत असलेल्या ज्ञानापुढे या गोष्टी क्षुल्लक असतात. हे किशोरीताईंनी माझ्या खूप लहान वयातच मला समजावून सांगितले. त्याचा अनुभव दिला. त्यामुळे आपण जे काही काम करत असतो, जे काही ज्ञान घेत असतो त्यात आपल्या ताणाने प्रवेश करता कामा नये. आपले आवडते काम करताना हा ताण कधीच जाणवत नाही. कोणतीही कला ही ताणमुक्तीचे माध्यम असू शकते. मी माझ्या कलेच्या साधनेतून ताणमुक्ती शोधते. कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धेचा ताण घेता कामा नये. मी हा स्पर्धेचा ताण कधीच घेत नाही. जे आपले आहे, ते आपल्याला मिळणार आहे, अशी मानसिकता ठेवायला हवी. आपले ध्येय काय आहे यानुसार ताण घ्यायचा की नाही, हे अवलंबून आहे. केवळ प्रसिद्ध होणे, पैसा कमावणे हेच ध्येय असेल तर निश्चित ताण येऊ शकतो. माझे हे ध्येय नाही. त्यामुळे मी गात असताना मला आनंद मिळतो. तंबोरे जुळवणे, तंबोऱ्याच्या तारा लावणे, तंबोऱ्याची निगा राखणे, तंबोरे किती सुंदर बोलू शकतील यासाठी प्रयत्न करणे हा देखील माझ्या आनंदाचा भाग आहे. माझा स्वभाव प्रसन्न आहे. किशोरीताई नेहमी म्हणायच्या, ‘‘नंदिनी घरात येताना उत्साह घेऊन येते.’’ या लहान गोष्टींमधून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असल्याने ताणमुक्तीसाठी वेगळ्या पर्यायाची गरज भासत नाही.