कधीतरी एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण मस्त उशिरापर्यंत लोळत पडतो. मग उठल्यावर उन्हं वर आलेली असतात. अशा वेळी फार काही खावंसं वाटत नाही. चहा वगैरे तर नकोच होतो. दुधाचाही कंटाळा येतो. अशा वेळी न्याहरीसाठी एक वेगळा पदार्थ. खायचा नाही तर प्यायचा!

साहित्य – काकडी, पुदिना, आले, चाट मसाला, मीठ, मिरपूड.

कृती : काकडीची साले काढून तिचे छोटे तुकडे करून घ्या. काकडी कोवळी असेल तर सालं काढण्याच्या फंदातही पडू नका. आता ब्लेंडरमध्ये हे काकडीचे तुकडे, पुदिन्याची पानं, चाट मसाला, मीठ, मिरपूड घालून छान फिरवून घ्या. हा रस गाळू नका, असाच अर्धवट फिरवलेल्या गराच्या अवस्थेत ग्लासमध्ये ओता. लगेच पिऊन टाका. यामध्ये आवडत असल्यास गोड दहीसुद्धा घालता येईल. कलिंगड किंवा टरबूजही घालता येईल. साखर मात्र शक्यतो टाळा. खूप तिखट वाटत असल्यास मिरपूडही टाळा.

Story img Loader