|| धनश्री लेले, निवेदिका
एखादा रस्ता ओलांडताना कितीही अडथळे आले तरी तो ओलंडण्याचे आपण थांबत नाही. एका विशिष्ठ ठिकाणावर पोहचणे हेच एक लक्ष्य असते. मी माझ्या ताणमुक्तीची पायवाट माझ्या कामातून शोधते. एका वेळी माझे अनेक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमातून ताण येणे स्वाभाविक असते. ताणातून मुक्ती मिळविण्यासाठी मी माझे काम हाच पर्याय निवडते. हातात घेतलेले काम हे चांगलेच झाले पाहिजे याकडे माझा अधिक कल असतो. हाती घेतलेला कार्यक्रम जेव्हा उत्तम होतो तेव्हाच ताण हलका होतो. भरपूर काम आहे असे म्हणून नुसताच ताण घेत राहणे याला काहीच अर्थ नाही. सुरुवातीला मला सगळेच कार्यक्रम करावेसे वाटत.
एका दिवशी दोन कार्यक्रमांचे नियोजन असे. नावीन्याचा मोह होता. एका दिवशी अनेक कार्यक्रम करताना मला ताण येत असे. सध्या मात्र मी स्वत:चे नियोजन करते. ताणमुक्तीचा उपचार म्हणजे काम. जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत ताण आपल्या मनावर अधिराज्य गाजवतो. कामामध्ये नियमितता, सूसुत्रता आणि तत्परता या तत्त्वांचा मी वापर करते. यामुळे कोणत्याच गोष्टींचा ताण जाणवत नाही. एका आठवडय़ात पाच लेख लिहायचे असतात. अशा वेळी मी एका दिवसात एक लेख लिहिते. एक लेख लिहून पूर्ण झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो आनंदच ताण हलका करण्याचे साधन असते. त्यामुळे मनाने ताण घेण्याची सवय चुकीची आहे. मी अनेक विषयांवर लेख लिहीत असते. दरवेळी लेख लिहिताना लेखाचा विषय वेगळा असतो. कामात नावीन्यता महत्त्वाची असते.
आपण आपल्या कामात वैविध्यता शोधणे हा ताणमुक्तीचा उत्तम पर्याय असल्याचे मी समजते. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याशी संवाद साधते. यामुळे उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ताण आल्यावर आवडत्या व्यक्तीशी संवाद साधणे या पर्यायाचा उपयोग करते. काही वेळा काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण करण्याचे सोडून अरे आत्ता मी हे काम का करतेय असे मनाला वाटत रहाते. त्यावेळी ते काम कशाला घेतले असे म्हणण्यापेक्षा जे काम हातात घेतले आहे ते काम शंभर टक्के देऊन पूर्ण करायचेच असे मी ठरवते. ताण आल्यानंतरसुद्धा एखादी गोष्ट मनापासून आनंदाने पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तक्रार केल्याने ताण अधिक वाढतो. ‘त्वमेव केवलं कर्तासी’ हे अथर्वशिष्र्यातील वाक्य मी नेहमीच लक्षात ठेवले आहे. ताण आला तरी कोणत्या गोष्टीतून तो ताण आपण हलका करू शकतो याचा सतत शोध घेत रहाणे हा ताणमुक्तीचा उत्तम पर्याय आहे.
शब्दांकन – भाग्यश्री प्रधान