रवी जाधव, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, मित्रांचा जिवलग मित्र, कुटुंबातील कुटुंबवत्सल नवरा आणि वडील, तर एकीकडे समाजातील एक जागरूक नागरिक अशा सगळ्या भूमिका निभावाव्या लागत असताना दिवसभराचा शीण वाढत जातो. तो कमी करण्यासाठी माझे सर्वात आवडते काम म्हणजे जुन्या हिंदी-मराठी संगीताचा मनमुराद आनंद घेणे. गाडीत असो वा घरात, जिथे वेळ मिळेल तेथे गाणी ऐकण्यातच माझा जास्त वेळ जात असतो. ‘जिंदगी का साथ निभाता चला’.. ‘मी मज हरपून बसले गं’.. ‘समईच्या शुभ्र कळ्या’.. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी गाणी ऐकायला आवडतात. धावपळ करून घरी आल्यानंतर आम्ही रेडिओ लावून गाणी ऐकणे पसंत करतो. दिवसभराची धावपळ संपून घरी आल्यानंतर पत्नी मेघनासोबत रात्री गाणी ऐकून संपूर्ण ताण हलका करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. ताण ही शाश्वत गोष्ट नाही. तो आज आहे, पण उद्या नसतो. एखाद्या घटनेमुळे तुम्हाला ताण येऊ शकतो, मात्र दुसऱ्या दिवशी तो ताण कमी झालेला असतो. अशा ताणांच्या परिस्थितीत संगीतातून मनातील ताण हलका करू शकतो. आवडती कोणतीही गोष्ट केल्यानंतर ताण नक्कीच हलका होत असतो. तुमच्या आयुष्यातील उद्याची सकाळ हे तुमचे नवे आयुष्य घेऊन येत असते. सुख-दु:खाच्या घटना जशा आयुष्यात घडत असतात तसेच आनंदी जीवन जगत असतानाही ताण येतो. परंतु त्याचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टिकोनातून या ताणतणावावर मात करण्याची गरज आहे. उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी आणि जगण्यासाठी तरुण पिढीने प्रयत्न करण्याची गरज आहे. कामांमध्ये नेहमी गुंतून राहणे हाच खरा ताणमुक्तीचा मार्ग आहे. तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करा, तुम्ही काम करत असाल त्या कामामध्ये स्वत:ला झोकून द्या. यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. एकटे राहण्यापेक्षा आपले मित्रमंडळ, कुटुंबीय, शाळेतील इतर सहकारी सगळ्यांसोबत राहा, तुमच्या मनातील गोष्टी शेअर करा. त्यातून तुम्हाला चांगले विचार, मार्गदर्शन आणि सल्लागार मिळतील. आनंद, राग, दु:ख, उद्वेग या भावनांचा स्वीकार करून त्यांचा निचरा करायला शिकले पाहिजे, या भावना दडपून ठेवल्यास त्याचा उद्रेक कधीतरी होतोच, त्याशिवाय शरीरात अनेक आजारही जन्म घेतात. संगीत किंवा इतर कोणतीही कला माणसाला ताणमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रत्येकाने स्वत:त एकतरी कला रुजवावी, जेणेकरून आयुष्यातील आव्हानांना कोणत्याही ताणाशिवाय सामोरे जाता येईल. आयुष्य हे सुंदर आहे, ते अजून सुंदर करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. त्यासाठी सदाबहार गाणी उपयोगी ठरतात.