अमित सामंत
बाराव्या शतकात आजच्या तुर्कस्तानातल्या ऑटोमान साम्राज्याने पूर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्यानंतर विसाव्या शतकात कामानिमित्त अनेक तुर्की लोकांनी युरोपचा आश्रय घेतला. त्यांनी आपल्याबरोबर आपली खाद्यसंस्कृती युरोपात आणली आणि रुजवली. युरोपात फिरताना अनेक ठिकाणी तुर्कस्तानातून आलेल्यांची हॉटेल्स दिसतात. हॉटेलचे नाव आणि पुढे केबाब (कबाब) असे लिहिलेले असते. दुकानाच्या दर्शनी भागात काचेआड फिरणाऱ्या उभ्या दांडय़ावर उलटय़ा ठेवलेल्या कोनच्या आकारात मसाले लावलेले मटण शिजत ठेवलेले असते. येथे मिळणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे डोनेर कबाब. हा पदार्थ दोन प्रकारांत मिळतो. प्लेटमध्ये आणि रॅपमध्ये.
डोनेर कबाब मागवल्यावर तिथला कुक उभ्या दांडय़ावर शिजत असलेल्या मटणाचे बोनलेस तुकडे आपल्या समोरच सुरीने कापून प्लेटमध्ये घेतो. सोबत वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, पिटा ब्रेड आणि भात देतो. दोन ते तीन जणांना ही डिश पुरते. डोनेर रॅपमध्ये मैद्याच्या रोटीमध्ये मटणाचे तुकडे, सॉस आणि गाजर, लेटय़ुस इत्यादीचे सॅलड असते. डोनेर कबाबचा शोध एकोणिसाव्या शतकात तुर्कस्तानात लागला. तिथून तो इस्तंबूल मार्गे जगभर पसरला. फास्ट फूडमध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले. आपल्याकडचा शोरमा हा त्याचा भाऊ आहे.