– डॉ. आशुतोष जावडेकर, डेन्टिस्ट, साहित्यिक
ताणाच्या काही पातळ्या असतात. मला असं वाटत की सौम्य ताण हा नेहमी स्फूर्तीदायी असतो. अशा प्रकारचा ताण हा काम करून देतो. कोणतीही गोष्ट घडण्याआधीच त्याची काळजी घेणं कधीही चांगलं. वाचन, लिखाण, मित्र-मैत्रिणींशी मनमुराद गप्पा, व्यायाम या सर्व गोष्टी मी नित्याने करत असतो. त्यामुळे ताण फार कमी येतो. एखाद्या गोष्टीमुळे येणाऱ्या ताणात अडकायला होत नाही. कधी काही अनपेक्षित गोष्टी घडल्या तर येणारा ताण हा फार मोठा असतो. अनेकदा घडलेल्या गोष्टी किंवा त्या गोष्टींशी संबंधित विचार सारखे भेडसावत राहतात. अशा परिस्थितीतही मी स्वत:ला हरू देत नाही.
ताण कमी करण्यासाठी सवरेत्कृष्ट मार्ग म्हणजे निसर्गाशी जवळीक. एखाद्या गोष्टीचा ताण आला तर मी चांगला एक-दीड तास निसर्गाच्या सान्निध्यात घालवतो. रस्त्यावरून चालत जातो, आजूबाजूच्या माणसांना पाहात, दुकानावरच्या पाटय़ा वाचत. असे केल्यामुळे अनेकदा ताणाची उकल होत जाते. निसर्ग मला गजबजलेल्या शहरातही दिसतो. साहित्य आणि संगीत हे माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक, त्यामुळे ताणाच्या वेळेत यांची मला चांगलीत मदत होते. ताणात मी शांता शेळके, बा. भ. बोरकर यांच्याकडे वळतो. देवधर्म खूप मानत नसलो तरी मी अश्रद्ध नाही आहे. किशोरीताई ते जॉन एल्टन सर्वच मला ताणाच्या प्रसंगात बळ देतात. या सर्वाव्यतिरिक्त ताणात असेन तेव्हा एक गोष्ट अगत्याने करतो ती म्हणजे व्यायाम. रोजच्या वेळापत्रकात अनेकदा व्यायामशाळेत जाण्याचं राहून जातं पण अशा वेळेला व्यायामशाळेत जाणं कधीही चुकवत नाही. ताणाच्या परिस्थितीत हक्काचे जिवलग आपल्या जवळ असणं फार महत्त्वाचं ठरतं. सुदैवाने माझी बायको हीच माझी जवळची मैत्रीण असल्याने तिच्याशी मनसोक्त गप्पा मारल्यावर माझा ताण बऱ्यापैकी हलका होतो. अशा वेळी माझ्या लहान मुलीसोबत खेळतो त्यामुळे मला माझ्यासमोर असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते. माझ्याजवळ चांगलेच मित्र-मैत्रिणी असल्याने अशा परिस्थितीत तेही मला समजून घेतात. अनेकदा मला लहानपणी कोणता खेळ शिकला नसल्याची खंत वाटते. ताण कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबल्यामुळे ताणाचा प्रभाव कमी झालेलाच असतो. त्यामुळे या दहा मिनिटांत मी या प्रश्नाचा शांतपणे विचार करतो. ताणाच्या परिस्थितीतही स्वत:चा स्वत:शी संवाद होणं महत्त्वाचं असतं. काही प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळत नाहीत, मात्र हेही आपल्याला स्वत:ला समजावून सांगावं लागतंच.