डॉ. रेखा डावर (ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ)
‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी ज्ञान, आरोग्यसंपदा मिळे’ या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या योग्य असल्यास ताणाचे प्रमाण निम्म्यावर येते. मुळातच दिनचर्या नियोजित असेल तर ताण जाणवत नाही. वैद्यकीय क्षेत्रात कनिष्ठ असताना आणि काही वर्षांच्या अनुभवानंतर वरिष्ठ डॉक्टर म्हणून काम करत असताना ताणाचे स्वरूप बदलते. कनिष्ठ डॉक्टर म्हणून औरंगाबादला काम करत जेवाखायला वेळ मिळायचा नाही. कामही खूप असायचे आणि झोपही कमी मिळायची. त्यामुळे तेव्हा शारीरिक ताण खूप जाणवायचा.
आता काही वर्षांच्या अनुभवानंतर वरिष्ठ डॉक्टरांच्या भूमिकेत काम करताना शारीरिक ताण कमी झाला असला तरी आता मानसिक ताण अधिक प्रमाणात जाणवतो. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांकडून काम करून घ्यायचे असते. त्यामुळे जबाबदारीही वाढते. एखाद्या महिलेची प्रसूती तुमच्या हाताखालील डॉक्टर करत असले आणि तुम्ही प्रत्यक्ष सहभागी नसलात त्या महिलेची जबाबदारी तुमच्यावरच असते. सर्व गोष्टी योग्य पद्धतीने होत आहेत की नाही हे पाहणे, त्याचे नियोजन करणे हा ताण असतोच.
एक स्त्री म्हणून कुटुंब आणि नोकरी या दोन्हींचा समतोल सांभाळायचा असतो. अशावेळी चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र मी एक नियम कायम पाळला आहे. रुग्णालयाचा ताण कधी घरी नेला नाही आणि घरचा ताण कधी रुग्णालयात आणला नाही. हा समतोल साधणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी कुटुंबातील सदस्यांसमवेत संवादाची आवश्यकता असते. संवादातून आपला अर्धा ताण हलका होतो आणि यातूनच ताणतणाव हलका करण्याचे उपायही सापडतात.
योगासनांमुळेही शारीरिक आणि मानसिक ताण हलका होण्यास मदत होते. सध्या माझा नातूच माझ्यासाठी ताणमुक्तीचे माध्यम आहे. तो दीड वर्षांचा असून अमेरिकेत असतो. पण आम्ही ‘व्हॉटस अॅप’वर व्हिडीओ संवाद करतो.
शब्दांकन : किन्नरी जाधव