‘हॅलो आई, अगं कढी कशी बनवायची?’ असा फोन येताच साहिलची आई कढी बनविण्याची पाककृती त्याला व्हिडीओ कॉलवरच समजावून सांगू लागली. शिक्षणासाठी घरापासून लांब असलेल्या साहिलला आईच्या व्हिडीओ कॉलचाच काय तो आधार होता. रोज सायंकाळी काय जेवण बनवायचे हा प्रश्न आईसोबत आता त्यालाही सतावू लागला होता. मग लगेच आईला फोन करून आज काय बनवू? हे कसे तयार करायचे? यात कांदा किती टाकायचा? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. बरं हे सारे प्रश्न साहिलच्या कढईतच तडतडत असतील का? तर नाही. आजकालच्या अनेक तरुण-तरुणींना या प्रश्नांनी चटके बसू लागले आहेत. शिक्षण, नोकरीनिमित्त घरापासून दूर, अनोळखी शहरात राहणाऱ्या या तरुण-तरुणींच्या लग्नाआधीच्या ‘संसारा’चा घेतलेला मागोवा..

कधी गोड, कधी तिखट!

शिक्षणासाठी घरापासून वेगळी राहणारी ही मुले महाविद्यालयाच्या जवळ ‘पेइंग गेस्ट’ वा वसतिगृहात राहत असतात. खोलीच्या आकारानुसार येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ठरते. मग काही खोल्यांमध्ये दोन तर काहींमध्ये पाच-सहा विद्यार्थी राहतात. वेगवेगळ्या भागांमधून आलेले, वेगवेगळ्या स्वभावाच्या या विद्यार्थ्यांसोबतच जमवून घेत प्रत्येक खोलीत एक कुटुंब तयार होत असते. आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठे असलेले हे ‘रूममेट्स’ काही गोष्टींवरून भांडत तर कधी एकमेकांना समजून घेत एकत्र राहत असतात.

‘व्हिडीओ कॉल’वर विली

महाविद्यालयाच्या वेळापत्रकातून फारसा वेळ मिळत नसल्याने बरेच दिवस घरी जाणे होत नसे. फोनवर आई-बाबांशी वरवरचे बोलणे नेहमीच व्हायचे, पण लहान भाऊ, माझा कुत्रा ‘विली’ यांची अनेक वेळा आठवण येत असे. मग व्हिडीओ कॉल करून  अनेक वेळा विलीशी बोलण्याचा प्रयत्न सुरू असायचा. त्यालाही फोनमधून माझा आवाज कसा येतो याचे अप्रूप वाटायचे, कदाचित म्हणूनच की काय तोही हाक दिल्यावर भुंकून दाखवायचा. घरी कोणतीही नवीन गोष्ट आली की माझा भाऊ व्हिडीओ कॉल करून ती गोष्ट मला दाखवायचा. व्हिडीओ कॉलच्या या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहूनसुद्धा मी कुटुंबाशी जोडला गेलो होतो.

– रौनक ठक्कर

खिचडीचीच ‘फर्माईश’

एरव्ही आईकडे वेगवेगळ्या पदार्थाची फर्माईश करणारे विद्यार्थी दिवसेंदिवस खिचडी खात आपली भूक भागवतात. करायला अगदी सोप्पी आणि वेळ वाचवणारी ही खिचडी म्हणजे घरापासून दूर राहणाऱ्या या तरुण-तरुणींचा आधारच म्हणावा लागेल. डाळीत थोडेसे मीठ जास्त पडले किंवा आवडीचा पदार्थ हवा तसा बनला नाही तर आईजवळ तक्रार करणारी ही मुले स्वत केलेला पदार्थ अळणी असो वा तिखट गपगुमान खातात. मग कधी जेवण बनवण्याचा कंटाळा आला की मित्र-मैत्रिणीसोबत बाहेर जाऊन खाद्यपदार्थावर ताव मारणारे हे तरुण ठिकठिकाणी दिसतात.

वरणात ओवा..

पहिल्यांदाच घरापासून लांब राहण्यासाठी आले होते. घरी कधी स्वयंपाक करण्याची सवय नव्हती. एखाददुसरा पदार्थ बनवता येत होता. त्या दिवशी जेवण बनवण्याची माझी पाळी होती. वरण-भात एखाददोन वेळा घरी केलेला असल्याने मी वरण-भाताचाच बेत आखला. आईला फोन करून पाककृती विचारली आणि त्याप्रमाणे स्वयंपाक तयार केला. मी आणि माझ्या काही रूममेट्स जेवायला बसलो. मैत्रिणीने पहिला घास घेतला तेव्हा कळले की वरणात जिऱ्याऐवजी ओवा टाकला आहे. सर्वानी तक्रार करत करतच ते वरण खाल्ले. आजही त्या ओव्याच्या वरणाची चर्चा रंगली की मैत्रिणी माझा उद्धार करतात.

– स्नेहा पवार

एक दिवस धुलाईचा!

घरी वॉशिंग मशीन आणि धुणी-भांडी करण्यासाठी  काम करणाऱ्या मावशी असल्याने ही कामे करण्याची सवय अनेक तरुणांना नसते. महाविद्यालयाचे वेळापत्रक आणि अभ्यास सांभाळणाऱ्या या विद्यार्थ्यांचा आठवडय़ातील एक दिवस कपडे धुण्यासाठी राखीव असतो. तरुण- तरुणी आठवडय़ाच्या कोण्या एका दिवशी मग ढीगभर साचलेले हे कपडे धुण्यात मग्न असतात.