प्रशांत ननावरे

गुजरातमधील उदवाडा हे पारशी लोकांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. इराणशहा हा पवित्र अग्नि येथील उराणशहा अग्यारीत ठेवलेला आहे. इराणमधून आलेल्या झोराष्ट्रीयन लोकांचं गेली चार शतकं येथे वास्तव्य आहे. समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या या गावात गेल्यावर लाकडी बांधकाम आणि कलाकुसर असलेली जुन्या पद्धतीची घरं पाहायला मिळतात आणि लोकांच्या पेहरावावरून आपण पारशी लोकांच्या वस्तीत दाखल झाल्याचं कळतं.

या गावात फिरत असताना दोन नवीन पदार्थ नजरेस. ‘दूध ना पफ’ आणि हाताने तयार केलेलं ‘आंबा आइस्क्रीम’. जुन्या काळी ज्याप्रमाणे लंबगोलाकार पत्र्याच्या डब्यात आइस्क्रीम विकलं जात असे, त्या डब्यातून आइस्क्रीम विकणारा येथे भेटतो. केवळ ताजं दूध आणि आंब्याचा गर हाताने घोटवून तयार केलेलं हे आइस्क्रीम दररोज रात्री तयार करून दुसऱ्या दिवशी गावात येऊन विकणाऱ्या व्यक्तीची वाटेतच भेट होऊ शकेल.

दुसरा अतिशय वेगळा पदार्थ म्हणजे ‘दूध ना पफ’. हिवाळ्यात उन्ह पडायच्या आधी काही स्थानिक महिला हातातील ताटात फेसाळ दुधाचे हे ग्लास घेऊन दारोदारी फिरताना दिसतात. आदल्या रात्री गाईचे ताजे दूध गरम करून थंड करण्यासाठी ठेवले जाते. सकाळी त्यात थोडी साखर टाकून हे व्यवस्थितपणे फेटून काचेच्या ग्लासात ओततात. अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास फेस असतो. पहाटे फेरफटका मारायला गेल्यावर घरी परतताना हा दूधाचा ग्लास रिचवला नसेल तर उदवाडाला भेट दिली, असं म्हणणं चुकीचं ठरेल.