|| डॉ. अविनाश भोंडवे
उष्माघात म्हणजे वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. शरीरातील पाणी जसजसे कमी होते, तसतसे वेगवेगळे परिणाम यात दिसून येतात. त्यानुसार याचे काही उपप्रकार पडतात; पण याला सरसकटपणे उष्माघात असेच म्हटले जाते.
आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७ अंश से. (९८.६ अंश फॅरनहाईट) असते. हे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदूवर, रक्ताभिसरणावर आणि शरीरातल्या रसांवर (एन्झाइम्सवर) प्राणघातक दुष्परिणाम होऊ शकतात. ते टाळण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी एक वातानुकूलन प्रणाली कार्यरत असते. ती चार पद्धतीने शरीराचे तापमान कायम राखण्याचा प्रयत्न करते.
१. उत्सर्जन (रेडिएशन)- उन्हातून सावलीत आल्यावर शरीरातील उष्णता बाहेर पडते, तर थंडीत गरम शेकोटीने उबदार वाटते.
२. संक्रमण (कंडक्शन) – उन्हाळ्यात गार पाण्याने आंघोळ केल्यास पाण्याचा गारवा शरीराला मिळतो, तर हिवाळ्यात उबदार स्वेटरने थंडी कमी होते.
३. प्रवाही अभिसरण (कन्व्हेक्शन) -शरीरातील रक्तप्रवाहाद्वारे उष्णता मेंदूपासून दूर नेली जाते.
४. बाष्पीभवन (इव्हॅपोरेशन)- शरीरातील पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर पडून त्याचे बाष्पीभवन होऊन आपल्याला गार वाटते.
तापमान नियंत्रण कार्यप्रणाली
शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, काकडणे आणि कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य़ तापमानही वाढते. या वेळेस हायपोथॅलॅमसकडून रासायनिक संदेश पाठवले जाऊन रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात आणि बाह्य़ त्वचेखाली असलेल्या घर्मग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे रक्तप्रवाहातील द्रव पदार्थ आणि क्षार वापरून घाम तयार होतो. या घामाचे बाष्पीभवन होऊन शरीराला थंडावा येतो. घाम येण्याच्या या प्रक्रियेत शरीरातील द्रव पदार्थ आणि पाणी तापमानानुसार अधिकाधिक वापरले जाऊन त्यांचा साठा कमी होत जातो. बाह्य़ उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात.
हीट स्ट्रेसचे मुख्य प्रकार
- हीट रॅशेस- घामोळ्या येणे.
- हीट क्रॅम्पस- स्नायूंमध्ये चमक, लचक भरणे.
- चक्कर/बेशुद्धी- घाम खूप येऊन शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्याने रक्तदाब खाली उतरून चक्कर येते किंवा शुद्ध हरपते.
- ऱ्हॅब्डोमायोलायसिस- तीव्र उन्हात सतत काम करत राहिल्याने आणि आवश्यक पाणी न प्यायल्याने, स्नायूंच्या पेशी नष्ट होऊन त्यांचे विघटन होऊन ते मृत होतात. परिणामत: हृदयाचे स्पंदन अनियमित होते, मूत्रपिंडांचे कार्य मंदावते.
- उष्माघात (हीट स्ट्रोक)- ज्या वेळेस शरीरातील पाण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते, तेव्हा होणाऱ्या प्राणघातक त्रासाला उष्माघात म्हणतात.
उपचार
- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवणे, पंखे, कूलर असलेल्या, वातानुकूलित खोलीत ठेवावे.
- शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने
- बर्फाच्या पाण्याने आंघोळ
- कपाळावर थंड पाण्याच्या पट्टय़ा, आइसपॅक
- दिवसभरात ५ ते ६ लिटर ओआरएसचे पाणी द्यावे.