आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com
दक्षिण भारतात ज्या प्रबळ हिंदू राजसत्ता होऊन गेल्या त्यातलीच एक चालुक्य राजसत्ता. पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, विजयादित्य, कीर्तिवर्मन असे कर्तबगार राजे या घराण्यात होऊन गेले. त्यांनी मोठय़ा प्रमाणावर राज्यविस्तार केलेला दिसतो. चालुक्यांचे अनेक शिलालेख प्रसिद्ध आहेत. त्याचसोबत त्यांच्या काळातील बरेच ताम्रपट उजेडात आल्यामुळे त्यांचा एकसंध असा इतिहास समजण्यास मोठी मदत झाली आहे. देखणे आणि कलाकुसरयुक्त असे मंदिरस्थापत्य ही या चालुक्यांची खास ओळख मानायला हवी.
बदामी ही चालुक्यांची राजधानी. एका बाजूला टेकडी आणि दुसरीकडे असलेल्या दरीच्या जणू काठावर बदामी वसलेली आहे. बदामी ही एक व्यापारी पेठ होती. या ठिकाणी वातापी आणि त्याचा भाऊ इलवला असे दोन राक्षस लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवायचे आणि फसवून त्यांना मारून खायचे; पण अगस्ती मुनी त्यांच्याकडे आल्यावर युक्ती त्याच्याच अंगलट आली आणि त्यात वातापी राक्षसाचाच मृत्यू झाला. तेव्हापासून या ठिकाणाला वातापी असे नाव पडल्याच्या नोंदी पौराणिक कथांमध्ये मिळतात. बदामीला असलेल्या दोन टेकडय़ा राक्षस भावांचे प्रतीक आहे असे समजले जाते. बदामीमध्ये असलेल्या मोठय़ा तलावाला याच संदर्भामुळे अगस्तीतीर्थ असे नाव मिळाले.
लाल रंगाच्या वालुकाश्म जातीच्या खडकात या लेणी खोदल्या आहेत. इथे पूर्वाभिमुख चार लेण्यांचा समूह असून त्यातल्या तीन हिंदू तर एक जैन लेणी आहे. बदामीच्या हिंदू लेणी या भारतातल्या सर्वात प्राचीन लेणी समजल्या जातात. यामध्ये देवाच्या मूर्तीसुद्धा असल्यामुळे त्यांना लेणींमंदिर असे म्हटले जाते. पुढे स्तंभयुक्त ओसरी, त्यामागे मोठा सभामंडप आणि आत मध्ये गर्भगृह जिथे देवतेचे शिल्प वसलेले आहे, असा आराखडा या लेणींचा आहे.
शैव लेणी
डोंगरात पहिली येते ती अंदाजे इ.स. ५५० च्या सुमारास खोदली गेलेली शैव लेणी. दारातच उजवीकडे शिवाची अठरा हात असलेली तांडव नृत्य करणारी अशी भव्यदिव्य प्रतिमा पाहायला मिळते. इथे शिव कमळावर नृत्य करताना दाखवला आहे. वरच्या दोन हातांत सर्प धरला असून बाकीच्या हातांमध्ये डमरू, जपमाला, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवलेली दिसतात.
वैष्णव लेणी
शैव लेणी येथून पुढे गेले की येते वैष्णव लेणी. या लेणीत विष्णूची विविध रूपे खूपच भव्यदिव्य रूपात कोरलेली पाहायला मिळतात. येथील सोळा आरे असलेल्या चक्राला जे आरे आहेत ते माशाच्या रूपातले आहेत. थोडक्यात १६ मासे इथे मध्यवर्ती भागात असलेल्या कमळाच्या वर्तुळाकडे तोंड केलेले असे कोरले आहेत.
महाविष्णू लेणी
वैष्णव लेणीच्या पुढे येते ती महाविष्णू लेणी. चालुक्य राजा कीर्तिवर्मन दुसरा याच्या राज्यकारभाराच्या १२ व्या वर्षांप्रीत्यर्थ इ.स. ५७८ मध्ये त्याचा भाऊ मंगलेश याने ही लेणी खोदून घेतली. या लेणीत मंगलेश याने यासंबंधीचा शिलालेखच कोरून ठेवला आहे. त्यावरून वैशिष्टय़पूर्ण माहिती समजते.
जैन लेणे
पुढचे चौथे लेणे आहे जैनांचे. चालुक्य राजे हे सर्व धर्मीयांना राजाश्रय देणारे राजे होते. सर्व धर्मीयांचा समान आदर त्यांच्याकडून केला जाई. पुलकेशी पहिला याचा राजकवी रविकीर्ती हा जैन होता. त्यामुळे चालुक्यांनी हे जैन लेणे खोदून घेतले असेल यात नवल काहीच नाही. इथे असलेले हे एकमेव जैन लेणे इतर तीन लेण्यांच्या तुलनेत साधे आहे. मुख्य गर्भगृहात भगवान महावीरांची बसलेली मूर्ती स्थापन केलेली दिसते. आतील भिंतींवर र्तीथकरांच्या विविध मूर्ती कोरलेल्या आहेत.
अनंतविष्णूची मूर्ती
लेणीचे मोठे वैशिष्टय़ असलेली आणि अगदी दुर्मीळ असलेली एक मूर्ती इथे आहे ती म्हणजे अनंतविष्णूची मूर्ती. शेषाच्या म्हणजेच नागाच्या वेटोळ्यावर ललितासनात विष्णू बसलेले आहेत आणि त्याच नागाने त्यांच्या मस्तकाच्या वर फणा धरलेला आहे. शक्यतो विष्णूच्या शेषशायी म्हणजे शेषावर पहुडलेल्या प्रतिमा अनेक दिसतात; पण अनंत विष्णूच्या मूर्ती तुलनेने फारच कमी दिसतात. नरसिंह, हरिहर यांच्या सुबक मूर्ती इथे बघायला मिळतात.
बदामीचे वैभव मंदिरे
याशिवाय बदामीमध्ये असलेले भूतनाथ मंदिर, लकुलीश मंदिर आणि जवळच असलेल्या महाकूट इथली मंदिरे हे बदामीचे वैभव आहे. तसेच बदामीचा किल्ला आणि त्यावर असलेले स्थापत्य अवशेष अवश्य बघावेत असे आहेत. चालुक्यांचा राजा पहिला पुलकेशी याने इ.स. ५४३ मध्ये इथे किल्ला बांधल्याचे सांगतात. बदामीमधील अनेक ऐतिहासिक स्थळांसारखा हा किल्लाही एक महत्त्वाचे ठिकाण आहे. आजही मूकपणे हा किल्ला गतवैभवाची कथा सांगत असतो. चालुक्यांचे मंदिरस्थापत्य बघायला ऐहोळे आणि पट्टदक्कलला जावे लागेल. तो एक निराळाच खजिना आहे. नुसते बदामी बघायला भरपूर वेळ दिला पाहिजे. बदामीमध्ये असलेले वस्तुसंग्रहालय आणि जवळच असलेले शाकंभरी देवीचे मंदिर आणि त्यासमोर असलेला मोठा तलाव या सगळ्याच गोष्टी एकाहून एक सुंदर आहेत. चालुक्यांची बदामी सजली आहे या समृद्ध वारशाने. तिचा आस्वाद घेण्यासाठी मुद्दाम वेळ काढून जायला हवे.