अमित सामंत

गुलाश सूप हा हंगेरीचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. सणासुदीला आणि पाहुणे आले की हा पदार्थ आजही घरोघरी केला जातो. हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये खाण्यासाठी आणि खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॅसी स्ट्रीटवर फिरताना पारंपरिक गुलाश सूप आणि पॅप्रिका चिकनचे बोर्ड जागोजागी दिसतात.

गुलाश सूप हे मटण, पोर्क, बीफ, व्हिएलपासून तयार करतात. कांदा आणि मटणाचे तुकडे तपकिरी होईपर्यंत तेलात परततात. त्यात पॅप्रिका, पाणी, गाजर, ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी इत्यादी घालून सूप केले जाते. काही ठिकाणी यात वाईन आणि टोमॅटोही घातला जातो.

गुलाश या शब्दाचा अर्थ आहे गुराखी. साधारणपणे नवव्या शतकात हंगेरीतले धनगर गुरे चारायला नेताना सोबत खारवलेले आणि उन्हात सुकवलेले मांस चामडय़ाच्या पिशवीत घेऊन जात. त्यात पाणी मिसळून उकळून त्याचे सूप करून पीत असत. आता गुलाश सूपचा महत्त्वाचा भाग असलेल्या पॅप्रिकाचा वापर त्यावेळी होत नव्हता. सोळाव्या शतकात पॅप्रिकाचा मध्य युरोपातील खाद्य संस्कृतीत प्रवेश झाला. कमी वेळात तयार होणारे हे पौष्टिक सूप हंगेरीच्या साम्राज्याबरोबर मध्य युरोपात सर्वदूर पसरले आणि स्लोव्हाकिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया इत्यादी देशांच्या खाद्य संस्कृतीचा भाग झाले. गुलाश सूपचा गाभा सर्व देशांत सारखाच असतो पण प्रत्येक ठिकाणी त्यात वेगवेगळे पदार्थ, वाईन यांचा वापर होतो.

Story img Loader