रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com
केस गळणे ही प्राण्यांबाबत अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. कोणत्या श्वान प्रजातींचे केस गळणार नाहीत? किंवा मांजराचे केस अजिबात गळू नयेत म्हणून काय करायचे? या प्रश्नांना उत्तरेच नाहीत.
प्राणी पाळायचा आहे पण त्याचे केस गळलेले चालणार नाहीत हे अशक्य आहे. रोज काही प्रमाणात प्राण्यांचे केस गळणारच हे प्राणी पाळण्यापूर्वीच पालकांनी गृहीत धरायला हवे. त्यामुळे केसांची अॅलर्जी, दमा किंवा श्वसनाचे आजार असलेल्या पालकांनी हौसेने घरी प्राणी आणण्यापूर्वीच विचार करायला हवा. प्राण्यांचे मृत झालेले केस काही प्रमाणात रोज गळतात. त्याजागी नवे केस येत असतात. पिल्लांच्या वाढीच्या वयात केस अधिक गळू शकतात. याशिवाय उन्हाळा वाढू लागला किंवा आहारात काही बदल झाला तर प्रमाण थोडे वाढते. केस गळणे बंद करणे शक्य नसले तरी या नैसर्गिक गोष्टीची समस्या होऊ नये याची काळजी नक्कीच घेता येते. केस गळण्याचा उपद्रव काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. कमी केसाळ श्वानांचे केस अर्थातच तुलनेने कमी गळतात. भारतीय प्रजातींचे केस परदेशी प्रजातींपेक्षा कमी गळतात. मांजरांच्या बाबत तोही पर्याय नाही. त्यावर केस गळू नयेत म्हणून प्राण्यांची आणि त्याचा त्रास होऊ नये म्हणून आपली काळजी घेणे आवश्यक.
आहार आणि स्वच्छता
रोज प्राण्यांचे केस विंचरले तर गळणारे केस घरभर पसरण्याचा मनस्ताप टाळता येईल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश बाजारात मिळतात. त्याशिवाय आहार हा महत्त्वाचा घटक. प्राण्याला आवश्यक पोषकमूल्ये, क्षार योग्य प्रमाणात मिळायला हवेत. योग्य पोषण केस गळण्याचे प्रमाण कमी करते. पाणी हा लक्ष देण्याचा दुसरा घटक. प्राण्यांना पिण्यासाठी सतत, स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. शरीरातील शुष्कता केस गळण्यासाठी कारणीभूत ठरते. पिल्ले पाणी पितात की नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. स्वच्छता हा तिसरा घटक. मांजरे स्वत:ची स्वच्छता स्वत:च राखतात. मात्र त्यांचेही केस अधून मधून विंचरणे आवश्यक असते. श्वानांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते. त्यांना ठरावीक कालावधीनंतर आंघोळ घालणे आवश्यक असते. त्यासाठी प्राण्यांसाठीचेच शाम्पू वापरावेत. माणसांचे साबण, शाम्पू किंवा जंतुनाशक द्रव्ये प्राण्यांच्या त्वचेसाठी घातक ठरू शकतात. आंघोळीला पर्याय म्हणून ड्राय शाम्पूही मिळतात. पिसवा, गोचीड हे देखील केस गळती वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यासाठी प्राण्यांवर वेळेवेळी औषधी फवारा मारणे आवश्यक. बाजारात त्यासाठी अनेक औषधे मिळतात. मात्र औषध पशुवैद्याच्या सल्ल्यानेच निवडणे योग्य. जंत झाल्यासही केस गळण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे तीन महिन्यांनी जंतनाशक औषधे देणे आवश्यक असते.
तर मग आजाराची लक्षणे
नेहमीपेक्षा खूप जास्त केस गळत असतील. प्राथमिक उपायांनी केस गळणे थांबत नसेल, अचानक खूप केस गळायला लागले तर वेळ न घालवता पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा. प्राण्यांचे मोठय़ा प्रमाणावर केस गळणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. शरीरातील विविध स्रावांचे (हार्मोन्स) संतुलने बिघडणे, मूत्रपिंडातील किंवा पचनसंस्थेतील संसर्ग यांमध्ये केस गळण्याचे प्रमाण वाढते. याशिवाय बुरशीजन्य त्वचारोग, कीटकांमुळे होणारे त्वचारोग, उष्णतेचा त्रास, अलर्जी ही देखील केस गळण्याची कारणे आहेत. त्यावर प्रयोग न करता तातडीने पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.
हे करा..
* प्राण्यांचे काही प्रमाणात केस गळणे नैसर्गिक असते.
* ऋतुमानानुसार केस गळण्याचे प्रमाण कमी-जास्त होते.
* आहार, पाणी, स्वच्छता याबाबत काळजी घेतल्यास केस गळणे आटोक्यात राहू शकते.
* शाम्पू, साबण यांची निवड काळजीपूर्वक करावी.