राजेंद्र श्रीकृष्ण भट
घरात कोणती फुलझाडे लावल्यास सुगंध पसरेल, हे पाहू या.. दोन झाडे आपल्या घरात असलीच पाहिजेत. ती म्हणजे पांढरा कवठी चाफा व पिवळा कवठी चाफा.
पांढरा कवठी चाफा – या झाडाला थोडे ऊन असले, तरी पुरते. याची वाढ हळूहळू होते. फुले लहान अंडय़ाच्या आकाराची असतात. कडक पांढऱ्या पाकळ्या असतात. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी यांचा सुगंध वातावरणात पसरतो. एकच फूल झाडावर दोन दिवस राहते व सुगंध देते. याची लांबट पानेसुद्धा शोभिवंत असतात. झाडे आटोपशीर असतात आणि त्यांचा विस्तार उभा होतो.
पिवळा कवठी चाफा – मंद गतीने वाढणारे, मोठय़ा जाड पानांचे असे हे झाड असते. याची पाने रबर ट्रीसारखी चमकदार असतात. अंडय़ापेक्षा मोठय़ा आकाराची फुले येतात. सूर्योदयानंतर दिवसभर त्यांचा सुगंध दरवळत राहतो. या झाडांना सावली आवडते. खूप हळूहळू वाढत असल्यामुळे व पाने झाडावर खूप काळ राहिल्याने (किमान वर्षभर) कचरा होत नाही.
ही दोन्ही झाडे हळू वाढणारी, सावली आवडणारी आहेत. त्यांच्या जुन्या फांद्यांवर गुटी कलमे करून त्याची अनेक झाडे करता येतात. सावलीत वाढ चांगली होते, फारशी निगा राखावी लागत नाही. कीड व रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाहीच. घराच्या कोपऱ्यात जिथे परावर्तित प्रकाश येतो, तिथे लावल्यास छान वाढतात.