दैनंदिन जीवनात तोच तोचपणा टाळत प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवे, वेगळेपण शोधणारी तरुणाई आता नोकरी-व्यवसायामध्येही चौकटीबाहेरचं शोधण्याच्या प्रयत्नात आहे. वर्षांनुवर्षे सरकारी नोकरीत स्थिरता शोधण्याचा चालत आलेला ‘ट्रेन्ड’ आजच्या तरुणाईने बऱ्यापैकी मोडीत काढला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. लहानपणी, ‘मला डॉक्टर व्हायचे आहे’, ‘मला पोलीस व्हायचे आहे’ असे म्हणणारे सर्वच आता ‘मला काही तरी वेगळं करायचं आहे’ असे म्हणू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणाच्या पद्धती जशा आधुनिक होत आहेत, तसाच विद्यार्थी घडवण्याचा ढाचाही बदलत चालला आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना ‘आऊट ऑफ दि बॉक्स’ अर्थातच चौकटीबाहेरचा विचार करण्याचे बाळकडू दिले जात आहे. पुढे जाऊन हीच मुले उद्योगांच्या शर्यतीत काहीतरी वेगळं ठरेल, अशा कल्पनेच्या शोधात लागतात आणि कदाचित त्यातूनच आधुनिक युगातल्या पुरणपोळी.कॉम, यूअरस्टोरी.कॉम असे वेगळे ‘स्टार्ट अप’ उदयाला येतात.

समाजमाध्यमांनी जोडलेल्या आताच्या जगात स्वत:चा काही तरी उद्योग सुरू करणे फार कठीण राहिलेले नाही. इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाज माध्यमांचा आधार घेत अनेक होतकरू उद्योग सुरू करताना दिसतात. अशा समाजमाध्यमांमधून एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी रंगीबेरंगी कागद आणि टिकल्यांनी सजवलेले तयार डब्बे, अनोख्या बनावटीचे शुभेच्छापत्र अशा वस्तूही आजकाल या समाजमाध्यमांवर विकल्या जात आहेत. समाज माध्यमांमधून उद्योग सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणचे यात कोणतेही भांडवल उभारण्याची गरज लागत नाही. अशा माध्यमांमधून उद्योग सुरू करून मग पुढे ते मोठय़ा पातळीवर करण्यास मदत होत असल्याचे अनेक उद्योजकांकडून सांगण्यात येते.

लहानपणापासूनच गोष्टी ऐकून होते. चांगली कामे करण्याची शिकवण देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात तर वाईट कामे करून होणाऱ्या परिणामांचे धडे देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात. याच गोष्टींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत यूअरस्टोरी.कॉम या उद्योगाने श्रद्धा शर्मा हिने ‘स्टार्ट अप’ मध्येही वेगळेपण जपले आहे. वेगवेगळ्या लोकांकडून येणाऱ्या गोष्टींमधून सर्वच काहीतरी शिकत असतो. गेली नऊ वर्ष हजारोंनी पाठवलेल्या या गोष्टींमधूनच मला जगण्याची नवी उमेद मिळाल्याचे त्या सांगतात.

सणासुदीला तयार होणारे मोदक, पुरणपोळीसारखे पदार्थ तयार करायला वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी सर्रास केल्या जातात. आजच्या नव्या पिढीला पुरणपोळीसारखे पदार्थ एकतर बनविता येत नाहीत किंवा तो घाट करायला वेळ नसतो. सणासुदीच्या दिवशी लागणारे हे पदार्थ आजकाल बाहेरून मागवण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नव्या पिढीची ही गरज ओळखून डोंबिवलीच्या सौरभ दहीवदकर यांनी पुरणपोळी डॉट कॉम या संकेतस्थळावरून पुरणपोळीच्या पारंपरिक चवीला निरनिराळ्या स्वादांची जोड देत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. पारंपरिक पुरणपोळ्यांबरोबरच आंबा, गुलाब, बदाम-पिस्ता, चीज अशा हटके चवीच्या पुरणपोळ्याही लोकांनी आपल्याशा केल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीत लोकांना प्रत्येक गोष्टीत बदल हवा आहे. पारंपरिक पुरणपोळ्यांमध्येही असाच थोडासा बदल करून परंपरा जपून मराठमोळ्या पदार्थाला ‘ब्रॅन्ड व्हॅल्यू’ मिळवून देण्याच्या हेतूने हे संकेतस्थळ सुरू केल्याचे सौरभ दहीवदकर सांगतात.

वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एखाद्या कंपनीची मदत घेणे हे काही नवीन नाही. तरुणाईमधील एक मोठा वर्ग जणू या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या प्रेमात आहे. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या कंपनींकडून आकारला जाणारा पैसाही तितकाच मोठा असतो. परंतु अपूर्वा आपटे या तरुणीने सोहळा इव्हेंट्स या उद्योगातून आपल्याला हव्या त्या किमतीत कार्यक्रमाचे व्यवस्थापन करून देण्याची अनोखी संकल्पना राबवली आहे. खर्च करण्याची कितपत तयारी आहे हे सांगितल्यानंतर या कंपनीकडून मोजक्या पैशात संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले जाते. ‘किंमत तुमची, मदत आमची’ या संकल्पनेवर आधारित या उद्योगालाही दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे अपूर्वा आपटे सांगतात.

अगदी रोजच्या जगण्यात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींमधून काहीतरी वेगळेपण शोधत सुरू केले जाणारे हे उद्योग आजच्या बदलत्या ‘ट्रेन्ड’ला अगदी साजेसे आहेत. सध्याचा बदलता ‘ट्रेन्ड’आणि वाढलेली स्पर्धा पाहता येत्या काळात उद्योगांमध्येही कल बदलताना दिसेल अशी खात्री अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.