भीमबेटका या आदिमानवांच्या गुहांपासून, लेणी, स्तुप, किल्ले, मंदिरे, राजवाडे, व्याघ्र प्रकल्प असे वैविध्य असलेला मध्यप्रदेश पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. पवित्र मानल्या गेलेल्या नर्मदा नदीचा उगम येथील अमरकंटकमध्ये होतो. या नदीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. हे राज्य उभे आडवे पसरलेले असल्यामुळे सर्वच ठिकाणे एकाच वेळी पाहाणे थोडे त्रासाचे आहे. आनंदाची गोष्ट ही की महाराष्ट्राच्या सर्व भागांतून मध्यप्रदेशात जाण्यासाठी रेल्वे, बसची सोय आहे. त्यामुळे हे राज्य पाच टप्प्यांत आरामात पाहाता येते. मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाची सर्वत्र सुंदर अतिथीगृहे आहेत. त्यांचे कार्यालय मुंबईत ‘वर्ड ट्रेड सेंटर’ येथे आहे तेथे जाऊन किंवा ऑनलाइन नोंदणी करता येते.

उत्तर भाग (खजूराहो, ओर्छा, ग्वाल्हेर)

खजूराहो, ओर्छा, ग्वाल्हेर बरोबर झाशी किंवा शिवपुरी यापैकी एक ठिकाण पाहाता येते. झाशी मध्यप्रदेशमध्ये नसून उत्तर प्रदेशात आहे पण खजुराहो, ओर्छा पाहून ग्वाल्हेरला जाताना झाशीचा किल्ला पाहून जाता येते. ओर्छा ते झाशी अंतर १७ किमी असून, झाशी ते ग्वाल्हेर अंतर १२० किमी आहे. झाशी ते ग्वाल्हेर जाण्यासाठी रेल्वेचा पर्यायही उपलब्ध आहे. खजुराहो, ओर्छा पाहून १०० किमीवरील शिवपुरीला जाता येते आणि तेथून ११० किमीवरील ग्वाल्हेर गाठता येते. खजुराहो ते ग्वाल्हेर ही सहल ५ ते ६ दिवसांत करता येते. खजुराहोला जाण्यासाठी सतना स्थानकावर उतरून खासगी वाहनाने जाता येते. एखाद-दोन दिवस वाढवल्यास या रस्त्यातील पन्ना अभयारण्यही पाहाता येते.

मध्यभाग (भोपाळ, भोजपूर, भीमबेटका, सांची, उदयगिरी, विदिशा)

भोपाळ हे मध्यप्रदेशातील राजधानीचे शहर आहे. विमानाने आणि रेल्वेने हे शहर भारतातील इतर शहरांशी जोडलेले आहे. भोपाळमध्ये राहून तेथील चार पर्यटनस्थळे चार दिवसांत आरामात पाहता येतात.

  • सम्राट अशोकाच्या काळात बांधलेला सांचीचा स्तुप.
  • गुप्त सम्राटांच्या काळात कोरलेली हिंदू लेणी आणि नंतरच्या काळात कोरलेली जैन लेणी, विदिशा
  • अश्मयुगीन मानवाचे वसतीस्थान असलेले भीमबेटका
  • भोजपूर येथे राजा भोज याने बांधलेले भव्य शिवमंदिर आणि तेथील एकाच दगडात घडवलेले जगातले सर्वात मोठे शिवलिंग.

पूर्व भाग (उज्जन, इंदुर, धार, मांडू, महेश्वर, ओंकारेश्वर)

मध्यप्रदेशाच्या इतिहासावर आणि खाद्य संस्कृतीवर मराठय़ांचा प्रभाव आहे. बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठय़ांनी या भागात हातपाय पसरायला सुरुवात केली. पवार, होळकर, शिंदे या सरदारांनी मध्यप्रदेशात बस्तान बसवले. भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांचे विलीनीकरण होईपर्यंत त्यांचा या भागावरील प्रभाव कायम होता. मुंबई-पुण्याहून या भागात जाण्यासाठी मध्य पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा आहेत. उज्जनपासून सुरुवात करून पाच ते सहा दिवसांत ही सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहाता येतात. पहिल्या दिवशी उज्जन पाहून इंदूरला मुक्काम करावा. दुसऱ्या दिवशी इंदूर-धारमार्गे मांडू गाठावे. मांडूला दोन दिवस मुक्काम करून महेश्वरमार्गे ओंकारेश्वर गाठावे. ओंकारेश्वरला एक दिवस मुक्काम करून इंदूरला येऊन परतीचा प्रवास करावा.

व्याघ्रप्रकल्प

कान्हा, बांधवगड, पेंच हे मध्यप्रदेशातील व्याघ्रप्रकल्प आहेत. या सर्व ठिकाणी कमीतकमी चार दिवस राहून तज्ज्ञ मार्गदर्शकांसह जंगल पाहाता येते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे, मात्र ही नोंदणी आधीच करून ठेवावी लागते.

पश्चिम भाग (जबलपूर, पंचमढी)

जबलपूर जवळचा भेडाघाट येथील धुंवाधार धबधबा आणि नर्मदेच्या पात्रात नदीने कापलेले संगमरवराचे डोंगर पाहात नौकानयन हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथील चौसष्ट योगिनी मंदिरही पाहाण्यासारखे आहे. केवळ एवढय़ासाठीच जाऊन येणे परवडण्यासारखे नसल्याने, भेडाघाटची सांगड कान्हा (१९० किमी), बांधवगड(२३५ किमी), पंचमढी (२३० किमी) यांच्याशी घालता येते. जबलपूर हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने देशाच्या सर्व भागांतून रेल्वेने आणि रस्त्याने पोहोचता येते. पंचमढी हे मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई पुण्याहून पंचमढीच्या पायथ्याशी असलेल्या पिपरीयापर्यंत थेट गाडय़ा आहेत. तिथे फिरण्यासाठी दोन ते तीन दिवस पुरेसे आहेत.