शुभा प्रभू-साटम
आज आपण धिरडी पाहू. आपली नेहमीचीच मराठी धिरडी पण त्याला थोडंसं वेगळं रूप दिलेली.
साहित्य
१ वाटी मोडाचे मूग, अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ किंवा एक वाटी मूगडाळ भिजवलेली आणि अर्धी वाटी तांदूळ पीठ. दोन चमचे ओले खोबरे
धिरडय़ाला ट्विस्ट येण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही साहित्य वापरू शकता. परंतु जे काही घ्याल ते अत्यंत बारीक चिरून किंवा किसून घ्या. – कांदा/गाजर/कोबी/शिमला (अत्यंत बारीक चिरून) किंवा पालक/कांदा पात/मेथी किंवा पिझ्झा सिझनिंग/हर्ब्स/रेड चिली फ्लेक्स/लसूण किंवा चीज, मश्रुम किंवा उकडलेलं चिकन.
कृती
मोडाचे मूग आणि तांदूळ एकत्र करून छान वाटून घ्या. जर तुम्ही मूगडाळ आणि तांदळाचे पीठ वापरणार असाल तर तेही छान वाटून घ्या. फक्त वाटताना त्यात ओले खोबरे वाटून घ्या. याची पातळ धिरडी करून घ्या. मग मसाला डोश्याप्रमाणे मसाला धिरडे करायचे असेल तर, वर म्हटल्याप्रमाणे हे कांदा, गाजर, कोबी, शिमला, पालेभाज्या, पिझ्झा हब्र्ज, चीज, चिकनपैकी जे आवडत असेल ते तव्यावर तेल टाकून छान परतून घ्या. नुसत्या पिठाच्या धिरडय़ांवर हा मसाला टाकून त्याची छान गुंडाळी करा वर बटर, चीज पेरा आणि भरपूर खा.
ही एवढी प्रक्रिया करण्याचा कंटाळा असेल तर सरळ धिरडय़ाच्या पिठात त्याला ट्विस्ट देण्यासाठी जे साहित्य वापरणार असाल ते मिसळून घ्या. तव्यावर मस्त जाडसर धिरडी टाका आणि चटणी, सॉस, लोणचे कशाहीसोबत खाता येईल.
जर घरात कोणतीच भाजी नसेल, सिझनिंगसाठीही काही नसेल तर चक्क केचप पिठात घालूनही धिरडी करू शकता.