दीपा पाटील

साहित्य

१ किलो मटण, ३ चमचे साजूक तूप, २ चमचे आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा लिंबूरस, कढीपत्त्याची थोडी पाने, २ चमचे दही, पाव कप तूप, चवीनुसार मीठ, चेट्टीनाड मसाला.

चेट्टीनाड मसाल्याचे साहित्य –  १० काश्मिरी मिरच्या, १ चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, पाव चमचा काळी मिरी, १ इंच दालचिनी, ४ लवंगा, १ चक्री फूल.

कृती

आधी चेट्टीनाड मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांडय़ात मिरच्या, धने, जिरे, बडीशोप, मिरी, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल हे सारे मसाले कोरडेच भाजून घ्यावेत. नंतर ते गार झाल्यावर त्याची पूड बनवावी. आता ही चेट्टीनाड मसाल्याची पूड, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी.

कुकरमध्ये ३ चमचे तूप घालून ते गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट आणि मटण घालून चांगले परतावे. आता यात चवीपुरते मीठ घालून त्यात थोडेसे पाणी घालावे. कुकरचे झाकण लावून चार शिट्टय़ा कराव्यात आणि मटण मऊ होईलसे शिजवून घ्यावे.

कढईमध्ये उरलेले तूप गरम करून त्यावर वाटलेले ओल्या चेट्टीनाड मसाल्याचे मिश्रण परतावे. मग त्यावर दही घालून त्यावर मटणाचे वरचे पाणी घालून चांगली उकळी आणावी. हा वास घमघमू लागला की मग त्यात शिजवलेले मटण घालावे. मटण घी रोस्ट तयार आहे.

Story img Loader