– विजयराज बोधनकर, चित्रकार
माणसाच्या वृत्तीवर सारे काही अवलंबून असते. जर एखाद्या माणसामध्ये संकटे झेलण्याची ताकदच नसेल तर त्या संकटांचा त्यांना ताण येणे साहजिकच आहे. माणसाचे वागणे कसे आहे यावर त्याला एखाद्या गोष्टीचा ताण येणार हे ठरत असते. कर्ज, खोटे बोलणे, गोष्टींचे नियोजन नसणे अशा गोष्टींमधून माणसाला तणाव येत असतो. आपल्यावर आलेल्या संकटांना आपण सतत प्रश्न विचारयला हवेत. या प्रश्नांमधूनच आपल्याला मार्ग मिळत जातो. मात्र ज्या वेळी या प्रश्नांना उत्तर मिळानासे होते तेव्हा व्यक्तीला ताणाला समोरे जावे लागते. आपल्या तणावाचे कारण काय हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे असते. अनेक जण ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी योगसाधना, व्यायाम असे वेगवेगळे मार्ग निवडत असतात. मात्र जर आपल्या प्रश्नांना उत्तरच मिळत नसेल तर या सर्व मार्गाचा माणसाला फारसा उपयोग होत नाही. शिवाजी महाराजांनादेखील अनेक गोष्टींचा ताण होता. मात्र त्यांनी बुद्धी आणि मनाचा वापर करून संकटांच्या सर्व परिस्थितींवर मात केली आहे. मी नेहमीच संकटांच्या समयी बुद्धी आणि मनाला ताणाचे कारण विचारत राहतो. मन स्थिर ठेवले की मला आपोआपच प्रश्नांमधून मार्ग मिळत जातो.
वाजवीपेक्षा मोठे स्वप्न पाहण्यात काही वावगे नाही, मात्र हेच लोकांच्या तणावाचे मुख्य कारण ठरते. स्वप्नेदेखील आपल्या गरजेला पूरक असली की त्यांचा ताण येत नाही. लहान लहान मुले आजकाल फुलण्याच्या आधीच मोठी स्वप्ने पाहायला लागतात. म्हणूनच कदाचित आज २०-२२ वर्षांच्या वयातच त्यांना हृदयविकारासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. श्रीमंतीवर योग्यता ठरवली जात नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. संकंटांना आपण एकटेच सामोरे जात नसतो. त्यामुळे अचानक आलेल्या संकटांवर शांती, बुद्धी आणि स्थिरता या त्रिसूत्रीचा वापर करत आपण सहज मात करून शकतो. माणसाला बोलणे, ऐकणे, बघणे, नियोजन, निर्मिती, वागणे, टिकवणे आणि संपर्क या कलांचा रोजच्या जीवनात योग्य तो तालमेळ राखता आला तर कोणतीही व्यक्ती ताणावर सहज मात करू शकते.
जीवन सुखकर करण्याच्या नादात माणूस स्वतच्या स्वस्थाकडे दुर्लक्ष करू लागला आहे. मात्र टोले जंग इमारतींमध्ये घर घेताना त्याच्या स्वतच्या शरीराची ही इमारत हळूहळू ढासळते याची त्याला जाणीव होत नाही. माणूस निरोगी असेल तर ताण-तणावाचा सहज सामना करू शकतो.