|| डॉ. नीलम रेडकर

हृदयरोगाप्रमाणेच पक्षाघाताने त्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाला तर ‘हार्टअ‍ॅटॅक’ येतो, त्याचप्रमाणे पक्षाघात किंवा ‘ब्रेनस्ट्रोक’ मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतो. मेंदूच्या चेतापेशींना ऑक्सिजन व ग्लुकोजचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असते. रक्तपुरवठा थांबला तर या पेशी ज्या अवयवांचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालीवर परिणाम होतो. पक्षाघाताच्या आजारावर नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहे. वेळीच उपचार घेतले तर रक्तपुरवठा पूर्ववत होऊ शकतो.

पक्षाघाताचे प्रकार

१) पक्षाघाताचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे. हा अडथळा रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेल्या रक्ताच्या गुठळीमुळे होतो. (थ्रॉम्बॉसिस) तर काही वेळा हृदय किंवा मानेतील रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेली गुठळी मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये येऊन अडकते. (एम्बॉलिझम) आणि मेंदूचा रक्तपुरवठा खंडित करते. या दोन्ही प्रकारांमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अडथळा पक्षाघातास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारच्या पक्षाघातात लक्षणे दिसल्यानंतर तीन ते साडेचार तासांत गुठळय़ा विरघळण्याची औषधे (थॉम्बोलिसिस) एमआरआय किंवा सीटी स्कॅनच्या चाचणीनंतर दिल्यास रक्तपुरवठा पूर्ववत होऊन मेंदूचे कार्य सुरळीत चालू शकते.

अशा प्रकारच्या कारणास्तव झालेल्या पक्षाघाताचा झटका जर आला तर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतात, त्याला ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.

२) पक्षाघाताच्या दुसऱ्या प्रकारात मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूच्या पेशीवरील दाब वाढतो. मेंदूमधील अंतर्गत रक्तस्राव, उच्च रक्तदाब किंवा रक्तवाहिन्यांच्या दोषामुळे ती फुटून होतो. या प्रकारात रक्तवाहिन्यांमधील गुठळी कारणीभूत न ठरता अंतर्गत रक्तस्रावामुळे रुग्णांना पक्षाघाताची लक्षणे दिसतात. या प्रकाराच्या पक्षाघाताच्या उपचारात थ्रॉम्बेलिसिसचा रोल नाही.

पक्षाघाताची जोखीम खालील कारणांनी वाढते :

  • उच्च रक्तदाब
  • मधुमेह
  • हृदयरोग
  • हृदयाचे अनियमित ठोके
  • कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण
  • धूम्रपान, दारू किंवा कोकेनचे व्यसन
  • आनुवंशिकता
  • सततचा अर्धशिशीचा त्रास
  • रक्तवाहिन्यांचे आजार (ए वी अन्युरिझन)
  • मेंदूचा जंतूसंसर्ग
  • अपुरी झोप, आहार व व्यायामाकडे झालेले दुर्लक्ष, ताणतणावाची जीवनशैली

पक्षाघाताची चेतावणी देणारी लक्षणे :

काही वेळा पक्षाघाताची लक्षणे काही मिनिटांपुरती जाणवतात किंवा काही वेळा चोवीस तासांच्या आत पूर्णपणे नाहीशी होतात; परंतु या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाययोजना केली तर भविष्यात होणारा गंभीर धोका टळू शकतो.

ही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

  • हातातून वस्तू निसटणे.
  • पायातून चप्पल निसटणे.
  • तात्पुरता स्नायूचा दुबळेपणा किंवा शरीराची एक बाजू तात्पुरती संवेदनाहीन होणे.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होणे किंवा तोंड वाकडे होणे.
  • एका डोळय़ातील दृष्टी अचानक जाणे.
  • तात्पुरता बोलण्यातील तोतरेपणा.
  • पक्षाघाताची इतर लक्षणे :
  • एका बाजूचा हात व त्याच बाजूचा पाय लुळा होणे.
  • बोलताना किंवा गिळताना त्रास होणे.
  • आवाज घोगरा किंवा तोतरा होणे, जीभ अडखळणे, तोल जाणे, चक्कर येणे.
  • शरीराची एक बाजू चेतनाविरहित होणे.