अमित सामंत
बुडापेस्ट ही हेंगेरीची राजधानीचे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस (१५ ऑक्टोबर १९४४ ते २८ मार्च १९४५) हंगेरीत अॅरो क्रॉस पार्टीची सत्ता होती. या पक्षाची विचारसरणी नाझींशी जुळणारी होती. त्या काळी हंगेरीत लाखाच्यावर ज्यू राहात होते. केवळ पाच महिन्यांतच त्यापैकी ८० हजार ज्यूंना छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. तर १० हजारांवर ज्यूंची बुडापेस्टमध्येच हत्या करण्यात आली. ज्यू डिस्ट्रीक्टमधील त्यांची राहाती घरे अनेक वर्षे तशीच राहिल्यामुळे त्यांची पडझड झाली होती. अशा प्रकारे मोडकळीस आलेली एक इमारत आणि स्टोव्हची फॅक्टरी पाडून टाकण्याचा निर्णय २००२ मध्ये प्रशासनाने घेतला. त्या वेळी काही ज्यू तरुणांनी ती जागा विकत घेतली आणि Szimpla Kert हा पहिला रुईन पब सुरू केला. बार आणि पबच्या ठरावीक साचातल्या सजावटीला आणि नेहमीच्या वातावरणाला छेद देणारा हा पब अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्यानंतर पडक्या इमारतींत अनेक रुईन पब उघडले. पर्यटकांसाठी हे पब्स आता मुख्य आकर्षण ठरले आहे.
बुडापेस्टच्या ज्यू डिस्ट्रीकमध्ये जगातील दुसरे मोठे सिनगॉग आहे. या सिनगॉगपासून १० मिनिटांवर रुईन पब्ज आहेत. संध्याकाळी ४ वाजता ते उघडतात आणि पहाटेपर्यंत खुले राहतात. मुख्य रस्ता सोडून गल्लीत शिरल्यावर दुतर्फा जुन्या इमारती दिसतात. त्यातील एका इमारतीत Szimpla Kert हा प्रसिद्ध रुईन पब आहे. इमारतीच्या बोळातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला खोल्या आहेत. पडझड झालेल्या या खोल्यांमध्ये बसण्याची व्यवस्था आहे. जुन्या टबमध्ये, कमोडवर बसूनही पर्यटक बीयरचा आस्वाद घेतात. बोळातही बाकडे मांडून ठेवलेले आहेत. मधल्या चौकातील छत कोसळल्यामुळे थेट आभाळाखाली बसण्याची व्यवस्था आहे. लोखंडी जिने लावून वरच्या मजल्यावरही बसण्याची सोय केली आहे. या ठिकाणी बुडापेस्टमधील ड्राफ्ट बियर्स, वाइन्स यांना सर्वात जास्त मागणी असते. उत्कृष्ट खाद्यपदार्थही मिळतात. लाइव्ह म्युझिक, मूव्ही स्क्रीनिंग, आर्ट गॅलरी, फार्मर्स मार्केट असे उपक्रमही राबवले जातात. बुडापेस्टमध्ये असताना एक संध्याकाळ यासाठी राखून ठेवली पाहिजे.