अमित सामंत
व्हिएन्नातील प्रसिद्ध खाऊगल्ली ‘नॅश मार्केट’मध्ये फिरताना, बुडापेस्टमधील (हंगेरी) व्हॅसी स्ट्रीटवर, ब्राटिस्लाव्हात (स्लोव्हाकिया) श्निट्झेलच्या पाटय़ा जिकडेतिकडे दिसतात. श्निट्झेल हे मटण, चिकन, पोर्क, बीफ, व्हिएल यापासून तयार करतात. चिकन श्निट्झेलची ऑर्डर दिली की शेफ फायबरच्या हातोडय़ाने बोनलेस चिकनचा तुकडा ठोकून पातळ करतो. त्यानंतर तो तुकडा पीठ, फेटलेले अंडे आणि पावाचा चुरा या मिश्रणात घोळवतो. अशा प्रकारे तयार झालेले कुरकुरीत श्निट्झेल सॅलडबरोबर सव्र्ह केले जाते.
या पदार्थाच्या शोधाबद्दल इतिहासकारांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. हाप्स्बर्ग या राजघराण्याची एक शाखा इटलीत होती. मिलान शहरात ११३४ मध्ये आयोजित केलेल्या शाही मेजवानीसाठी हा पदार्थ प्रथम केला गेला. तर काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, रोमनांनी पहिल्या शतकात हा पदार्थ प्रथम केला. त्याची नोंद अॅपिकस या पाककृतींच्या पुस्तकात आहे. रोमनांनी हा पदार्थ जर्मन प्रांतात आणला. युरोपीय लोकांनी हा पदार्थ जगभर नेला. व्हिनर श्निट्झेल हा ऑस्ट्रियाचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे, सणासुदीला आणि पाहुणे आले की हा खास पदार्थ आजही घरोघरी केला जातो. श्निट्झेल हा मूळ पदार्थ तयार करण्याची सर्व देशांतील पद्धत सारखीच आहे. पण प्रत्येक ठिकाणी त्याबरोबर वेगवेगळे पदार्थ दिले जातात.
हंगेरीत श्निट्झेलबरोबर भात, तळलेल्या बटाटय़ाच्या काचऱ्या देतात. स्लोव्हाकियात श्निट्झेलबरोबर उकडलेले बटाटे, भाज्या आणि टार्टर सॉस मिळतो.