अमित सामंत

राजस्थानमधील जोधपूर हे वाळवंटाच्या काठावरचं महत्त्वाचं ऐतिहासिक शहर! राठोड राजघराण्यातील राव जोधा यांनी १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला आणि राजधानी जोधपूरला हलवली. तिथे बाजारपेठ वसली त्यात खाण्या-पिण्याची अनेक दुकाने होती. आजही तिथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची रेलचेल असते. तेथील नई सडक हा रस्ता क्लॉक टॉवरमार्गे थेट मेहरानगड किल्ल्यापर्यंत जातो. क्लॉक टॉवरच्या गेटला लागून ‘मिशरीलाल’ हे मिठाईचे दुकान आहे. तिथली ‘माखनीया लस्सी’ प्रसिद्ध आहे. अप्रतिम चवीच्या लस्सीवर मलईचा जो जाड तुकडा टाकलेला असतो त्यामुळे लस्सीची चव जिभेवर रेंगाळत राहते. बेसनची वडी, गाजर हलवा, कलाकंद, मावा कचोरी इत्यादी मिष्टान्न्ो आणि ती खाल्ल्यामुळे जिभेवर रेंगाळणारी गोड चव घालवण्यासाठी तळलेले काजू, शेव-चिवडय़ाचे विविध प्रकार, नमकीन कचोरी आणि मिरची वडाही मिळतो.

जनता स्वीट होममध्ये बंगाली मिठाई, मावा कचोरी, इमरती, मावा लाडू मिळतात. येथे सॉफ्ट आइसक्रीम हा वगवेगळ्या फ्लेवरमधील स्मुदीसारखा घट्ट पदार्थ मिळतो.

तिथून रिक्षाने शाही सामोसाच्या मागच्या गल्लीत असलेले चतुर्भुजचे दुकान गाठावे. तिथे गुलाबजाम, कलाकंद थेट वर्तमानपत्राच्या तुकडय़ावर देतात. जोधपूरमध्ये चहा न पिता गरमागरम दूध घ्यावे. त्यावर मलईचा पातळ स्लॅब घालून मिळतो.

जोधपूर पाहता पाहता या स्थानिक पदार्थाचा आस्वाद घेतल्यास भटकंती संस्मरणीय ठरेल.

Story img Loader