आशुतोष बापट
पावसाळा सुरू झाला की सर्व पर्यटनस्थळे गर्दीने भरून जातात. कोकण, घाटमाथा आणि घाटातील धबधब्यांजवळच्या गर्दीपासून दूर राहून पावसाचा आनंद घ्यायचा असेल, तर खानदेश हा उत्तम पर्याय ठरतो. सोनगीर किल्ला, शिल्पकलेने संपन्न असलेली विविध मंदिरे पाहता येतात आणि खानदेशी खाद्यसंस्कृतीचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. या श्रावणात ही ठिकाणे पाहायलाच हवीत!
नुकताच सुरू झालेला श्रावण महिना म्हणजे विविध व्रत-वैकल्यांचा कालावधी. या महिन्यात निरनिराळी व्रते केली जातात. एकदा हाती घेतलेले व्रत हे कधी सोडायचे नसते. तो वसा कधी टाकायचा नसतो, तर जोपासायचा असतो. ज्यांच्या पायाला भिंगरी लागलेली असते अशांनी घेतलेला भटकंतीचा वसा जोपासण्यासाठी श्रावण महिन्यासारखा उत्तम काळ नाही. धो धो कोसळणाऱ्या आषाढसरींची झड आता कमी झालेली असते, आणि क्षणात येती सरसर शिरवे-क्षणात फिरूनी ऊन पडे असे निसर्गाचे वर्तन सुरू झालेले असते. याच काळात हिंडायला बाहेर पडावे. अधूनमधून अंगावर पाऊससरी घेत निसर्गाचे आल्हाददायक रूप न्याहाळत भटकंती करण्याची हीच तर वेळ असते!
कोकण, घाटमाथा, घाटातले धबधबे ही ठिकाणे हल्ली गर्दीने भरून वहात असतात. मग अशा वेळी काय करावे. आपले व्रत कसे जोपासावे. तर सरळ उठावे आणि खानदेशचा रस्ता धरावा.
खानदेश म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील अत्यंत देखणा प्रदेश. भटकंतीच्या व्रतासाठी अतिशय उत्तम असा हा प्रदेश. धुळे ही जणू खानदेशची राजधानीच! खानदेशी संस्कृती जपणारे धुळे ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा प्रसिद्ध आहे. या धुळ्याला मुक्काम करून आजूबाजूच्या प्रदेशात भरपूर फिरावे. सर्वात आधी निसर्गाचे मनसोक्त दर्शन घेण्यासाठी धुळ्याजवळ असलेल्या सोनगीर किल्ल्यावर जावे. उंचीला अगदी कमी असलेल्या सोनगीर किल्लय़ाची तटबंदी आणि तिथून दिसणारा नजारा अप्रतिम असतो. सोनगीर फाटा हे खवय्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण. इथे असलेल्या विविध हॉटेल्समधून खास खानदेशी पदार्थ मिळतात. भाकरी आणि त्याच्यासोबत शेवभाजी, सोबतीला कांदा- हिरवा ठेचा, शेवग्याची भाजी. मुद्दाम भूक ठेवून जावे आणि तुडुंब जेवावे. इथूनच एक रस्ता मेथी या गावी जातो. इथे एक विष्णूचे प्राचीन मंदिर असून त्यावर विष्णूची ‘वैकुंठ’ रूपातली महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती बघायला मिळेल. इथे बाजूलाच असलेल्या दगडावर दुसरा दगड आपटला तर संगीताचे स्वर निघतात.
तिथून पुढे बलसाणे गावी जावे. बलसाणे इथे मंदिर समूह आहे. त्यातले मुख्य मंदिर हे मठ म्हणून प्रसिद्ध आहे. हे काहीसे निराळे मंदिर आहे. याच्या सभामंडपात १२ खोल्या आहेत. कदाचित साधकांना इथे राहून साधना करता यावी यासाठी ही रचना केली असावी. बलसाणे मंदिरे ही त्यावर असलेल्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. येथील यज्ञवराहाचे शिल्प आवर्जून पाहावे असे आहे.
धुळे हे गावसुद्धा सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहेच. गावात राजवाडे संशोधन संस्था आणि त्यांचे संग्रहालय मुद्दाम पाहावे असे आहे. तसेच इथे असलेली समर्थ वाग्देवता संस्थासुद्धा पाहण्यासारखी आहे. येथे १९३५ मध्ये शंकर श्रीकृष्ण ऊर्फ नानासाहेब देव यांनी समर्थ रामदासस्वामी व रामदासी संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह, संशोधन व प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. वाग्देवता म्हणजे सरस्वतीची उपासना करण्याच्या उद्देशाने इथे विविध संतांवरील साहित्याचे संकलन केलेले आहे. संतसाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा एक मोठा ठेवा आहे. इथे रामदासस्वामींच्या हस्ताक्षरातील पोथी तर आहेच, याशिवाय रामदासस्वामींनी काढलेली चित्रेसुद्धा पाहायला मिळतात.
धुळ्यातसुद्धा खास खानदेशी खादाडीचा पुरेपूर आनंद घेता येतो. इथल्या पाच कंदील या गजबजलेल्या भागात असलेल्या ‘शेतकरी’सारख्या खास मराठमोळ्या हॉटेलमधे आपल्याला अस्सल खानदेशी चवीचे पदार्थ खायला मिळतात. धुळे-मालेगाव मार्गावर असलेल्या किल्ले लळिंगला तर ऐन श्रावणात भेट द्यायलाच हवी. धुळ्याहून ८ कि.मी.वर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी, पायथ्याच्या लळिंग गावातून पाण्याच्या टाकीशेजारून रस्ता आहे. इथून किल्ला चढायला अर्धा तास पुरतो. लळिंगची तटबंदी फार सुंदर आहे. तसेच वरून सगळा आसमंत फार अप्रतिम दिसतो. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठय़ा प्रमाणावर आहेत. एका पाण्याच्या टाक्यात पुन्हा ६ टाक्या खोदलेल्या दिसतात. एक सुंदर ठिकाण पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते. श्रावणातले आपले भटकंतीचे व्रत हे महादेवाच्या दर्शनाशिवाय कसे पूर्ण होणार. भटकंतीची अखेर आपण एका नेत्रदीपक शिवमंदिराने करावी. लळिंगवरून पुढे झोडगे गाव लागते. डाव्या हाताला माणकेश्वर महादेवाचे अतिशय अप्रतिम प्राचीन मंदिर आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरापेक्षा जरी याचा पसारा लहान असला तरीसुद्धा या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला मुद्दाम पाहण्याजोगी आहे. त्यात एका देवकोष्ठात असलेली अंधकासुर वधाची शिवप्रतिमा फारच देखणी आहे. मंदिराच्या बाह्य़ांगावर विविध वादक, दर्पणा, नूपुरपादिका अशा सुरसुंदरी, भैरव यांचे केलेले अंकन, तसेच शिखरावर असलेले कीर्तिमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहे. आठ दिशांचे स्वामी असलेले अष्टदिक्पालसुद्धा इथे मंदिरावर अत्यंत कलात्मकतेने कोरलेले आहेत.
आपले श्रावणातल्या भटकंतीचे हे व्रत असे खानदेशपासून सुरू करावे. महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला हा संपन्न प्रदेश आहे. त्याला निसर्गाचा वरदहस्त तर लाभला आहेच, शिवाय पर्यटकांची गर्दी अजिबात नसते. असा हा प्रदेश पाहून आपल्या व्रताची सुरुवात केल्यास भटकंती नक्कीच संस्मरणीय ठरेल.
ashutosh.treks@gmail.com