उन्हाळा आणि दिवाळी हे भटकंतीचे दोन हंगाम! उन्हाळ्यात एक तर थंड हवेच्या ठिकाणाची निवड केली जाते, नाही तर मग जंगलाची वाट धरली जाते. अलीकडे पर्यटकांची पहिली पसंती म्हणजे जंगल आणि वन्यजीव! सोबतीला निसर्ग, साहस आणि इतरही गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असतील तर मग दक्षिण अफ्रिकेला जायला हरकत नाही.
दक्षिण अफ्रिकेला जाण्यासाठी प्रवासाचा एकच मार्ग आणि तो म्हणजे विमान प्रवास. मग तुम्ही मुंबईहून दुबईमार्गे जाऊ शकता किंवा माहे आयलंडमार्गे! बहुतेक पर्यटक दुबईमार्गेच जाणे पसंत करतात, पण माहे आयलंडमार्गे गेलात तर आयलंडवर असणारे तिथले छोटेसे विमानतळ आणि त्या विमानतळावरून दिसणारे आयलंडचे सौंदर्य काही क्षण खिळवून ठेवते. माहे आयलंड या छोटय़ाशा बेटावर निसर्गाचं अद्भुत रूप पाहता येत असलं, तरीही बहुतेक पर्यटनप्रेमी अद्याप या सौंदर्याविषयी अनभिज्ञच आहेत. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड स्पर्धेमुळे हे बेट थोडंफार प्रकाशात आलं. मुंबई-माहे आयलंड-जोहान्सबर्ग हा ‘कनेक्टिंग फ्लाइट’ प्रवास करावा.
जोहान्सबर्गवर विमानतळावर पाऊल ठेवताच दक्षिण अफ्रिका आणि जंगल या नात्याची प्रचीती येते. येथे ठिकठिकाणी ‘बिग फाईव्ह’च्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. जोहान्सबर्गपासून दोन तासांच्या अंतरावर उत्तरेकडील मॅगेलिसबर्गच्या खोऱ्यात बलून सफारीचा आनंद घेता येतो. ७३ वर्षीय बिल हॅरॉप पहाटेच्या थंडीत हॉट एअर बलूनचे उत्कृष्ट सारथ्य करतात. १९८१ पासून ते हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्याशी बोलता बोलता जमिनीपासून सहा-सात हजार फूट उंचीवर आपण कसे पोहोचतो हे कळतच नाही. तेवढय़ा उंचीवरून मॅगेलिसबर्गच्या पर्वतरांगांतील धुक्याचे लोळ आणि थोडं खाली आल्यानंतर त्यांच्या खासगी जंगलातील वन्यप्राणी हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं असतं. रिव्हर व्हॅली क्लबमध्ये न्याहारीची व्यवस्था केली जाते आणि सोबतच बलून सफारीचं प्रमाणपत्रदेखील दिलं जातं. केपटाऊन हे दक्षिण अफ्रिकेतील सर्वात जुनं शहर. तीन हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेलं इथलं टेबल माउंटन जगातल्या सात आश्चर्यापैकी एक आहे. त्याला टेबल माउंटन हे नाव का पडलं असावं हे त्या ठिकाणी गेल्यानंतर कळतं. उंच असलं तरी शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र ते टोकदार नाही तर चपटं आहे हे कळतं. तिथे रोप वेने जावे लागते. ही केबल कार एकाच वेळी तब्बल ५०-६० पर्यटकांना अवघ्या काही मिनिटांत शिखरावर नेऊन पोहोचवते. वर चढताना ही कार गोलगोल फिरत जाते. विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी केबल कारच्या खिडकीची जागा पकडावी लागत नाही, प्रत्येकाच्या वाटय़ाला आपोआप खिडकी येते. निळाशार समुद्र, शहरातील वस्ती आणि हिरवेगार पर्वत येथे दिसतात. या पर्वताबाबत असे सांगितले जाते की हे शिखर लाइमस्टोन म्हणजेच चुनखडीने बनलेले होते. पाऊस आणि हवा इतकी जोरदार होती की ते पूर्णपणे सपाट झाले. मात्र, या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय सुंदर दृश्य दिसते.
केपटाऊन शहराच्या मध्यभागी ‘व्हिक्टोरिया-अल्फ्रेड वॉटरफ्रंट’ हे मस्ती आणि धूमधडाक्याची आवड असणाऱ्या पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी पर्यटकांना रेस्टॉरंट, बार, म्यूझिक शॉप, विशाल मत्स्यालय पाहता येते. सायंकाळ संस्मरणीय करायची असेल, तर येथे काही अफ्रिकी नर्तक नृत्य करत राहतात, तर काही संगीत वाजवत असतात. पर्यटकही त्यांच्यात सहभागी होतात. केपटाऊन शहर ते गार्डन रूटच्या दरम्यान ‘लिटिल कारु’ ही पर्वतांची शृंखला आहे. हेलिकॉप्टरमधून केपटाऊनचे दृश्य न्याहाळण्यात वेगळीच मजा आहे. डिकेन्स रोड, साल्ट रिव्हर येथून हेलिकॉप्टरची सफर करता येते. तर याच ठिकाणाहून व्हिन्टेज वर्ल्ड वॉर २ साइड कारने संपूर्ण केपटाऊन शहराची सफारी करता येते. या साइड कारने आपण समोर जातच असतो आणि सोबतच पर्वत आणि समुद्रदेखील आपल्या सोबत चालत जात असतात. दोन तास, चार तास आणि आठ तासांकरिता साइड कारने केपटाऊनमध्ये भटकता येते. याकरिता वेगवेगळे दर आकारले जातात. यादरम्यान तुम्हाला पूर्ण दिवस पेनीन्सुला किंवा मग वाइनलँड टूर, डिनर, पेंग्विन सफारी करता येते. बंजी जम्पिंगसारखे साहसी खेळ खेळू शकता, शार्क केज डायव्हिंगचा थरारक अनुभव घेऊ शकता किंवा जंगलावरून जाणाऱ्या रोपवेने गर्द वनराई, पक्षी न्याहाळू शकता.
भव्य सनसिटी
केपटाऊनमधील सनसिटीने जागतिक पर्यटन विश्वात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे आपोआप ओढले जातात. सनसिटीचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्यदिव्य राजवाडय़ात वसलेली हॉटेल्स. अतिशय सुंदर असे वॉटर गार्डन आणि गोल्फ कोर्स, वॉटर स्पोर्ट व अत्युत्कृष्ट कसिनो. ‘द पॅलेस ऑफ लास्ट सिटी रिसॉर्ट हॉटेल’ला जगातील सर्वात मोठय़ा थीम रिसॉर्टचा दर्जा आहे. या परिसरात एकूण तीन हॉटेल आहेत. प्राचीन काळात याच ठिकाणी आदिवासी सम्राटाचा भव्यदिव्य महाल होता. पारंपरिक पद्धतीने ते पाहुण्यांची सरबराई करत. ही या सम्राटाची ओळख होती, पण भूकंपात हा महाल नष्ट झाला. तोच महाल नजरेसमोर ठेवून ‘सनसिटी’ उभारण्यात आली आहे. त्याचे अभियांत्रिकी कौशल्य पर्यटकांची जिज्ञासा आणखी जागृत करते. भारतीय पर्यटक आणि दक्षिण अफ्रिकेत राहणाऱ्या मूळ भारतीयांचे हे आवडते ठिकाण आहे. वॉटर स्किइंग, वॉटर स्कूटिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यांसारख्या सुविधा येथे आहेत.
rakhichavhan@gmail.com