अमित सामंत

राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तमिळनाडूतील जिंजी होती हेच बऱ्याच जणांना माहीत नसते. चेन्नईपासून १६० किलोमीटरवर जिंजी गाव आहे. गावाजवळ मोठा किल्ला असला तरी ते गाव छोटे आहे. अशा छोटय़ा गावांमध्ये बस स्थानकाजवळ एखादं नेहमीच वर्दळ असणारं हॉटेल असतंच. वर्दळीमुळे तिथे ताजे पदार्थ मिळतात. या व्याख्येत बसणारं ‘हॉटेल वसंत’ जिंजी बस स्थानकासमोर आहे. इडली, वडे, डोसे, कॉफी आणि अनलिमिटेड सांबार-चटणी, मिठाई इथे मिळते. भरपेट नाश्ता करून दुपारच्या जेवणाला सुट्टी देऊन राजागिरी किल्ला गाठावा. किल्ल्याचा कोपरान्कोपरा पाहावा. यात दिवस कसा संपेल, हे कळणारंच नाही. किल्ल्याकडून गावाच्या दिशेने येताना एका टपरीवर पितळेच्या बंबासारख्या भांडय़ात कॉफी उकळताना दिसते. तिथे कॉफीची मजा अवश्य घ्यावी.

हॉटेल अन्नपूर्णामध्ये सकाळी उत्तम बिर्याणी मिळते. चिकन बिर्याणीची ऑर्डर दिल्यावर वेटर टेबलावर केळीचे पान आडवे अंथरतो. चिकन बिर्याणी, दहीकांदा, टोमॅटो चटणी आणि पायसम आणून देतो. हे पदार्थ पाहून जीव अक्षरश: केळीच्या पानात पडतो.

रात्री गेलात तर चिकन चेट्टीनाड विथ डोसा मागवा. हा देखील केळीचं पान आडवं अंथरून त्यावर वाढला जातो. त्यावर चिकन चेट्टीनाड आणि बरोबर राक्षसी तव्यावर बनवलेला भला मोठा डोसा पेश केला जातो.

सामान्यपणे पर्यटक एका डोशातच गार होतात. अप्रतिम चवीच्या चिकन सोबत डोसा आणि हवी तेवढी चटणी आणि सांबार मिळतं. जिंजीतील ही खाद्यभ्रमंती दीर्घकाळ स्मरणात राहते.