महाविद्यालयीन परीक्षा संपल्या की, तरुण-तरुणींना वेध लागतात पुढच्या वाटचालीचे. सध्याची पिढी अतिशय करिअरकेंद्रित असल्याने परीक्षांनंतरच्या सुटय़ांमध्ये मौजमजा, भटकंती, मनोरंजन अशा गोष्टी करताना ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ अर्थात व्यक्तिमत्त्व विकासाचे कोर्सेस करण्यावरही त्यांचा भर असतो; पण असे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण खरेच किती उपयुक्त ठरते? की ही केवळ पैशांची उधळपट्टी?

आयुष्यात कर्तबगारी सिद्ध करायची आहे, आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे वाटते, न्यूनगंड छळतो, नकारात्मकता कमी करायची आहे, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय करायचे आहेत, बुद्धिमान असूनही अभ्यास/ कामाचा ताण येतो, अशा अनेक प्रश्नांनी तरुण पिढीला भंडावून सोडले आहे. स्पर्धात्मक युगात या साऱ्या गोष्टी अतिशय आवश्यक मानल्या जातात. त्यामुळेच व्यक्तिमत्त्व विकासाला सध्या प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची गरज तरुण-तरुणींना वाटू लागली आहे. त्यामुळेच सुटय़ांच्या हंगामात व्यक्तिमत्त्व विकासाचे वेगवेगळे वर्ग, शिबिरे, कार्यशाळा आयोजित करण्यात येतात आणि त्यांना गर्दीही जमते; पण अशा कार्यशाळांना भरमसाट शुल्क भरून व्यक्तिमत्त्व विकास खराच होतो का, हा प्रश्न आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

व्यक्तिमत्त्व विकास सल्लागारांच्या मते तरुण वर्गाला आजही व्यक्तिमत्त्वाचा अर्थ आणि व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे. ‘स्व’ची ओळख करून घेणे, जीवनाची ध्येयनिश्चिती, व्यक्तिमत्त्व विकासाने यश संपादन करणे आदींचे शास्त्रोक्त ज्ञान देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र सांगितलेल्या मार्गावरून मार्गक्रमण केल्यास व्यक्तिमत्त्व विकास घडू शकतो, अन्यथा कितीही पैसा खर्च झाला तरी ती व्यक्ती तशीच राहते, असे ठाण्यातील ‘पर्सनॅलिटी कन्स्टल्टंट’ समीर जोग सांगतात.

जीवघेण्या स्पर्धेत आणि अस्वस्थतेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकास या संज्ञेकडे वेगळ्या अर्थाने पाहिले जाते. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्याची क्षमता असे समजण्याची पद्धत रूढ झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणे, समाजाप्रति संवेदनशील बनणे, कोणत्याही परिस्थितीत शांत आणि सकारात्मक राहणे हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत, असे जोग सांगतात.

हल्ली अस्खलित इंग्रजी बोलता येणे, आकर्षक शरीरयष्टी, पेहराव, बोलण्याची कला या गोष्टींना व्यक्तिमत्त्व विकासात जास्त महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊनही अनेक गोष्टींच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडवण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात.

सादरीकरणाची कला

उत्तम इंग्रजीचे ज्ञान, संभाषण कौशल्य, आकर्षक शरीररचना या गोष्टी असल्या तरी जोपर्यंत आपण आपल्या कलाकौशल्यांचे सादरीकरण उत्तमपणे करणार नाही, तोपर्यंत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडणार नाही. त्यामुळे विविध गोष्टींबद्दल ज्ञान मिळवून ते योग्य रीतीने सादर कसे करावे याचे प्रशिक्षण हल्ली कार्यशाळांच्या माध्यमातून दिले जाते.

इंग्रजीचा बागुलबुवा

जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर इंग्रजीचे उत्तम संभाषण कौशल्य असणेही आवश्यक मानले जाते. इंग्रजी लेखन कौशल्य आणि संभाषण कौशल्य या गोष्टी करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचा समजही रूढ झाला आहे. अलीकडे बहुतांश मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असतात. तसेच रोजच्या व्यवहारांतही इंग्रजीचा अधिकाधिक वापर होऊ लागला आहे. मात्र तरीही आयत्या वेळी इंग्रजीत एखादे संभाषण वा सादरीकरण करायची वेळ येते, तेव्हा आपण कचरतो.  इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडता येतील का? चपखल शब्द सुचतील का? अशा शंका मनात डोकावतात. या भीतीवर मात करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करण्याकडे व्यक्तिमत्त्व विकासक लक्ष देतात. भाषिक अडचणीमुळे एखादी व्यक्ती अडखळत किंवा विचार करत बोलते. मात्र त्यामुळे समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की, बोलणाऱ्या व्यक्तीचे त्या विषयातील ज्ञान अपुरे आहे. याउलट भाषेवर प्रभुत्व असले की, अनेकदा विषयाचे अपूर्ण ज्ञान असले तरीही संभाषणकलेच्या जोरावर वेळ रेटून नेता येते. कोणतीही पूर्वतयारी किंवा जुळवाजुळव केल्याशिवाय उत्तम संभाषण करण्याएवढी भाषेवर पकड असायला हवी. ही प्रक्रिया थोडी कठीण वाटणे स्वाभाविक आहे; पण चिकाटीने रोज सराव केल्यास इंग्रजी भाषाकौशल्य नक्की सुधारता येते.

आकर्षक शरीरचना (ग्रूमिंग)

शरीराचा रंग व ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येते. या गोष्टी तिला आनुवंशिकतेने मिळालेल्या असतात. व्यक्तीकडे असलेल्या उपजत अशा बाबींना जैविक बीजे म्हणता येईल. जीवन जगत असताना विविध बाह्य़ घटकांचा, प्रामुख्याने सामाजिक घटकांचा, व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत असतो. काही व्यक्तींना उंच, धिप्पाड तर काहींना बुटके शरीर लाभलेले असते. काही व्यक्तींचे शरीर सुडौल आणि व्यंगरहित असते, तर काहींच्या ठिकाणी शारीरिक व्यंगे असतात. व्यक्तीच्या शरीररचनेचा तिच्या समायोजनावर चांगला अथवा वाईट परिणाम होतो. उत्तम शरीरयष्टी व आकर्षक चेहरा असणाऱ्या व्यक्तींचा इतरांवर लवकर प्रभाव पडतो. उत्तम शरीरसंपत्तीच्या बळावर एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त होतो. त्यामुळे हल्ली चांगले दिसणे म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा काही संकल्पना रूढ होत आहेत, मात्र हा व्यक्तिमत्त्व विकासाचा केवळ एक पैलू आहे, असे डॉ. एन. विद्याधर सांगतात.