सध्या सगळीकडे मस्त थंडी पडली आहे. अशा वेळी काहीतरी चटपटीत खावे, प्यावेसे वाटते. नेहमी नाश्त्याला खायचंच का? कधी काही प्यायले तर? उगाच गैरसमज करून घेऊ नका. मी सूप्स वगैरे म्हणतेय हो! तर आज आपण पाहूया अशीच एक पाककृती. सध्या बाजारात छान लालभडक टोमॅटो आलेले आहेत. त्याचाच वापर आपण या पाककृतीत करणार आहोत. दिलेली पाककृती साहित्य ४ जणांसाठी पुरणारी आहे.

साहित्य

४ चांगले मोठे लाल टोमॅटो, ओले खोबरे १/२ वाटी, सोसेल त्याप्रमाणे हिरवी मिरची/लाल तिखट, आले किसून, गूळ/साखर, मिरी दाणे, तूप, कोथिंबीर, कढीलिंब, फोडणीसाठी जिरे आणि हिंग, मोहरी नको.

कृती

सगळ्यात आधी टोमॅटो छान धुवून घ्या आणि कुकरच्या डब्यात, टॉमॅटो, खोबरे, मिरी, जिरे, हिरवी मिरची, आले हे सगळे एकत्र करून दणदणीत चार शिट्टय़ा काढून घ्या. थंड झाल्यावर हे सगळे छान गुळगुळीत वाटून घ्या. अगदीच काही दाताखाली येऊ नये, असे वाटत असेल तर गाळून घ्या. पण शक्यतो असे करू नये. लाल तिखट वापरणार असाल तर ते घाला. त्यानंतर मीठ आणि गूळ घालून एक उकळी आणा. हवे तर यावर फोडणी देता येईल. पण फोडणी केवळ जिरे, हिंग आणि कढीलिंबाचीच द्यावी. अगदीच आवडत असेल तर थोडे लिंबूही पिळता येईल. तिखट जास्त आवडत असेल तर मिरच्यांचे प्रमाण वाढवावे, फोडणीतही सुक्या मिरच्या घालता येतील. तिखट नको असल्यास मिरच्या कमी कराव्यात. सजावटीसाठी कोथिंबीर पेरावी. आता हा टोमॅटो शोरबा प्यायला तयार. मारा भुरका!

(लेखिका खाद्यसंस्कृती व पाककलेच्या अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)

Story img Loader