मिलिंद रायकर, व्हायोलिन वादक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून एखाद्या गोष्टीतून जेव्हा तुम्ही समाधान मिळविण्याचा प्रयत्न करता, तेव्हा हा ताण आपोआपच हलका होतो. मुळातच संगीत हे ताण हलका करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. संगीताच्या माध्यमाचा अभ्यास करण्यासाठी साधना आवश्यक असून ही साधनाच ताणमुक्तीचा एक उत्तम पर्याय आहे.   मला ताण-तणाव भेडसावतात, तेव्हा मी गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि उस्ताद अमीर खान यांची गाणी ऐकतो. चांगल्या मित्रांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे त्यामुळे बराचसा ताण हलका होण्यास मदत होते. आचार्य अत्रे, पु.ल देशपांडे यांची पुस्तके वाचायला मला अधिक आवडतात. याशिवाय बऱ्याच वेळा आध्यात्मिक पुस्तकांचेही वाचन करतो. प्राणायाम करतो. व्यायाम करण्यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि आरोग्य उत्तम असेल तर मनही उत्तम राहते.

‘अनाम प्रेम’ या संस्थेशी मी निगडित आहे. ही संस्था अपंग, अंध, वयोवृद्ध नागरिकांना मदत करते. या संस्थेत काम केल्याने मला समाधान मिळते. जेव्हा एखादी धून मी सादर करतो, तेव्हा त्यातून रसिकांना मिळणारे समाधान आणि त्यांनी दिलेली शाबासकीही मला समाधान देते आणि माझा ताण हलका करते. त्यामुळे समाधान देणारी प्रत्येक गोष्ट माझा ताण हलका करत असते.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान