भक्ती बिसुरे

हिवाळा आरोग्यदायी ऋतू समजला जात असला तरी या ऋतूत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण थंडीत विषाणूजन्य आजारांची वाढ होण्याची शक्यता असते. सध्या शहरी भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे धुळीचे साम्राज्य वाढले असून ही धूळ सर्दी, खोकला या विकारांना निमंत्रण देते.

दीर्घकाळ गुडूप झालेली थंडी गेले काही दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यात हजेरी लावू लागली आहे. सर्व ऋतूंपैकी आल्हाददायक ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात केलेला व्यायाम शरीराला उपयुक्त असतो, हे लक्षात घेऊन अनेक जण या ऋतूत नव्या उत्साहाने व्यायामाची सुरुवात करतात. या काळात बाजारात उपलब्ध असलेल्या ताज्या भाज्या, रसरशीत फळं यांचा आहारात समावेश करून व्यायामाला छान सकस आहाराची जोड देण्याची संधीसुद्धा हिवाळ्यात मिळते. हिवाळा असा अनेक अर्थानी आरोग्यदायी ऋतू असला, तरी या ऋतूला आनंद आणि उत्साहाने सामोरे जाण्यासाठी आरोग्याची काळजी आणि काही प्रमाणात खबरदारी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. कारण थंडीत विषाणूजन्य आजारांची वाढ होण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी शहरात सुरू असलेली मेट्रो किंवा इतर विकासकामे यांमुळे धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. ही धूळ सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा तक्रारींना निमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे विषाणूजन्य ताप, श्वासाचे आजार, दमा, कोरडा खोकला अशी लक्षणे दिसणारे रुग्ण वाढतात. या सगळ्यापासून दूर राहायचे असेल तर काही सवयींचे पालन करणे आवश्यक ठरते.

फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ. अजित कुलकर्णी सांगतात, थंडी जशी वाढू लागते तसे आपले शरीर वातावरणात झालेल्या बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेत काही लोकांमध्ये सामान्यत: आढळणाऱ्या समस्या दिसून येतात, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास या समस्या टाळणे शक्य असते. थंडीत सामान्यत: आढळणाऱ्या आजारांमध्ये ताप, कफ, त्वचा कोरडी पडणे व खाजणे, डोके दुखणे, श्वसनाचे आजार, सांधेदुखी इत्यादींचा समावेश आहे. विशेषकरून ज्यांना अस्थमा आणि अ‍ॅलर्जीचा त्रास असतो त्यांनी योग्य काळजी न घेतल्यास हा काळ आव्हानात्मक होऊ  शकतो आणि श्वसनाच्या आजारांची तीव्रता वाढू शकते. जर श्वसनाचे विकार तुम्हाला असतील तर थंडीची चाहूल लागायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तयारी करणे महत्त्वाचे आहे. तुमची वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेता डॉक्टर तुमच्या औषधांचा डोस किंवा वारंवारता वाढवायची की नाही हे ठरवू शकतात. संध्याकाळच्या वेळेस रस्त्यांवर गर्दी वाढते तसेच प्रदूषणदेखील वाढते. अस्थमाची तीव्रता जास्त असेल तर अशा वेळेस संध्याकाळी बाहेर जाणे टाळा किंवा जायचेच असेल तर योग्य प्रकारचे मास्क वापरा. हे मास्क तुम्ही सकाळी फिरायला जातानाही वापरा. शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेले खोदकाम, बांधकाम यांमुळे धुळीचे प्रमाण जास्त असते. अस्थमाच्या रुग्णांनी धुळीपासून लांब राहावे, कारण धूळ शरीरात गेल्यास अस्थमाचा त्रास अधिक तीव्र होऊ  शकतो, तसेच शिंका, कफ किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे बळावतात. अस्थमा असलेल्या लोकांनी धूम्रपान आणि मद्यसेवन कटाक्षाने टाळावे कारण हे अस्थमा अ‍ॅटॅकसाठी जोखमीचे घटक ठरू शकतात. ज्यांना ब्राँकायटिस आणि श्वसनविकाराच्या समस्या आहेत, त्यांनीही विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वारंवार होणारा कोरडा खोकला, छातीत अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे सीझनल ब्राँकायटिस असलेल्या लोकांमध्ये दिसून येतात. अशा लोकांनी प्रदूषण, धुरळा, उग्र वास यांपासून दूर राहावे आणि नियमितपणे हात धुवावे असा सल्ला डॉ. कुलकर्णी यांनी दिला आहे.

जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने सांगतात, अस्थमाचा आजार नसलेले, मात्र अस्थमासदृश लक्षणे असलेले अनेक रुग्ण या काळात दिसतात. त्यामुळे अनेक दिवस, औषध घेऊनही खोकला बरा होत नसेल तर छातीविकार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे योग्य ठरते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती अशा सर्व वयोगटात थंडीच्या काळात योग्य ती खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी कोणतेही दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी दिलेला औषधांचा डोस पूर्ण करावा. त्यामुळे झालेला संसर्ग संपूर्ण बरा होण्यास मदत होईल. या ऋतूत होणारे जास्तीत जास्त संसर्ग हे विषाणूद्वारे पसरणारे असल्यामुळे आजाराचे निदान झाले की पूर्ण बरे वाटेपर्यंत विश्रांती घ्यावी, जेणेकरून आपला संसर्ग इतरांना होणार नाही. ज्या व्यक्तींना वर्षभर श्वसनविकार, ताप, सर्दी, खोकला होण्याचे प्रमाण जास्त असते, त्यांनी या ऋतूत जागरूक राहावे. थंडीच्या काळात अस्थमा असलेल्या रुग्णांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. इतर सर्वानीच घराबाहेर पडताना उबदार कपडे, स्वेटर, शाल, कानटोपी यांचा वापर करावा. अति वारा चेहऱ्यावर येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पिण्यासाठी कोमट पाणी, गरम पाण्याची वाफ यांचा उपयोगदेखील थंडीतील आजारांपासून लांब राहाण्यासाठी होऊ शकतो.

आहाराकडे लक्ष

आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतात. पुरेसे पाणी पोटात जावे यासाठी सूप, ग्रीन टी, कोमट पाणी, चहा, कॉफी असे पदार्थ घ्यावेत. तेल, तूप, लोणी यांचा आहारात समावेश असावा. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा, संत्री, मोसंबी, गाजर, पालेभाज्या यांचे सेवन करावे. जंकफूड किंवा फास्ट फूड खाऊ नये. हरभरा, हुरडा, मटार, स्ट्रॉबेरी अशा या मोसमात येणाऱ्या फळे आणि भाज्यांचाही आहारात समावेश करावा. योगासने, चालणे असे व्यायाम केल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर दिसेल.

Story img Loader