डॉ. अनिल काकोडकर , शास्त्रज्ञ
मला कामाचा ताण येत नाही कारण आपण जेव्हा कामाचा आनंद घेत असतो तेव्हा त्या गोष्टीचा ताण येणे अशक्य आहे. मी जे काम करतो त्यातून मला वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे भरपूर काम केल्यामुळे किंवा काही प्रकल्पांमुळे मला ताण आला आहे, असे आजपर्यंत तरी झालेले नाही. प्रत्येकाने नेहमी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. सर्वानी हे समजून घ्यायला हवे की काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. सर्वच गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. असे असेल तर मग कोणत्याही गोष्टीचा ताण का घ्यावा? अनेकदा गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर जातात आणि ताण येण्याचे हे प्रमुख कारण असते. अशा वेळी आपण आपले काम करत राहणे आवश्यक असते. विनम्रपणे आपण करीत असलेल्या कामाला आपण न्याय दिला तर आपल्यावर येणाऱ्या ताणाचे नियंत्रण करणे सोपे जाते. सतत कामाचा विचार करणे आणि कामात गुंतून राहणे माझ्याकडून होत असते.
कोणत्या गोष्टींचा ताण घ्यावा आणि कोणत्या गोष्टींचा नाही हे आपल्यावर असते. एखाद्या गोष्टीचा आपण किती ताण घ्यावा आणि मुळात ताण घेतल्यानंतर ती गोष्ट सोपी होणार आहे का? हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर त्या गोष्टीचा आपोआपच आपल्याला उलगडा होत जातो. त्यामुळे प्रत्येकाने एकनिष्ठेने आपली कामे करत राहावीत, ताण हा आपोआपच कमी होईल.
अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवान घडामोडींचा सामना करावा लागला. परंतु देशाच्या सर्वागीण हिताचा विचार करताना मोठय़ा जबाबदाऱ्या पेलाव्या लागल्या. हे करताना कामाचे नियोजन करण्यात आले होते आणि ते अविरत पार पाडले जात होते. अशावेळी प्रमुखपदाची जबाबदारी म्हणून पूर्णपणे कामावरच लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ताणाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य अंगी बाणले गेले.