बदलत्या काळाची कास धरत तरुणांच्या जगण्यात आधुनिकता अवतरली. नित्यनवे बदल तरुणाईने स्वीकारले आणि पेललेही. मग ते तंत्रज्ञान असो वा फॅशन. यातून एक नवा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. या अशा बदलाच्या वेगात जुन्यालाही आपलेसे करण्यात ही तरुणाई मागे राहिली नाही. डिजे स्नेकच्या ‘मगेंता रिड्डेम’ या हॉलीवूडच्या गाण्यावर थिरकणारी मित्रमंडळी एखाद्या रात्रीच्या पार्टीत ‘तरुण आहे रात्र अजूनी’ हे गाणेही मनापासून गुणगुणतात. म्हणूनच तरुणाईने जुन्याकडेही तितक्याच विश्वासाने एक नवं पाऊल टाकलं आहे.

हॉलीवूड गाण्यांचा ‘रिदम’ व्यक्तिमत्त्वात जितका उत्साह निर्माण करतो तितकाच बॉलीवूडमधील किंवा मराठीमधील जुन्या गाण्यांचा भावार्थ शांततेची अनुभूती देतो, असे प्रणाली साळुंखे सांगते. आजच्या तरुणांना नवीन बदल हवा आहेच पण काही जुन्या गोष्टींशी सांगड घालण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जात आहे. गाण्याची निवड, चित्रपट, फॅशन, घराची सजावट या सगळ्याच गोष्टीत जुन्या काळाचा ओलावा तरुणांना आकर्षित करत आहे. बहुतांश तरुणांच्या आवडीमध्ये जुने आणि नवे असे भांडण आता राहिलेले नाही. याउलट जुन्या गोष्टींचाच इतिहास समजून घेत त्याचा उपयोग आधुनिक आयुष्यात कसा करता येईल, यात तरुण रमले आहेत.  जुन्या-नव्या गोष्टी एकत्र साधत तरुण जगण्याचा आनंद घेत आहेत.

पारंपरिकता जपणारा आधुनिक साज हवा

जुन्या नव्याची सांगड घालत होणारी फॅशन हल्ली जास्त चर्चेत आहे. पूर्वी आधुनिक काळानुसार नवा साज करण्यावर भर होता. साधी एखादी वेशभूषा तरुणांना पसंतीस पडत होती. अलीकडे नव्या आधुनिक साज केलेला असताना त्यात पारंपरिकता अनेक तरुणी आवडीने करतात. खणाचे पोलके, मोठे गजरे, भरजरीत दागिने ही जुनी दागिन्यांची परंपरा आता नव्याने येत असून तरुणींना ही जुन्या- नव्या जोड दागिन्यांची फॅशन अधिक खुणावत आहे. पारंपरिक नथही आता पुन्हा तरुणाईच्या ‘स्टाईल स्टेटमेंटचा’ भाग बनू लागली आहे. आता ‘नोज पिन’ ही अगदी रोजच्या वापरातही तरुणाई दिमाखात मिरवताना दिसू लागली आहे.

रेडिओ तिचा सखा

‘डीजे नाइट्स, पब्ज, म्युझिक थिएटर, ब्लूटूथ यातच रमणारी तरुण मंडळी. या तरुणांना कायम हृदयाचा ठोका चुकवत मोठय़ा आवाजातील डीजेवर थिरकायलाच आवडते. आवाजाचे भान नाही आणि जुन्या गाण्यांची आवड नाही. आमच्या काळात काय गाणी होती. किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्या काळातील गाणी ऐकणे म्हणजे सुखच. पण अलीकडच्या काळातील पिढीला या जुन्या गाण्यांची काही आवड नाही,’ असे म्हणणाऱ्या ज्येष्ठांना आता थोडी माघार घ्यावी लागणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या प्रियांका पाटील या तरुणीशी बोलल्यावर तिची जुन्या गाण्यांविषयीची आवड ती मनापासून सांगत होती. आमच्या घरात पूर्वीपासूनच रेडिओ असल्याने जुन्या हिंदी-मराठी गाण्यांची आवड मला लहानपणापासून आहे. शास्त्रीय संगीतापासून ते हॉलीवूड गाण्यांपर्यंत सगळीच गाणी मनापासून ऐकते. प्रत्येक संगीताच्या शैलीप्रमाणे त्याचे वेगळेपण असल्याने जुन्या गाण्यातील अर्थ अधिक जाणवतो. त्यामुळे किशोरीताई आमोणकर, किशोरकुमार, लता मंगेशकर या सगळ्या संगीत क्षेत्रातील कलाकारांची गाणी आम्ही कुटुंबातील सदस्य एकत्र आवडीने ऐकतो. आकाशवाणीवरचे कार्यक्रम आजही ऐकतो. नुकताच आई-बाबांना पाच हजार जुन्या गाण्यांचा संच असलेला रेडिओ भेट म्हणून दिला. यात माझी आवडही जोपासली जाईल हा उद्देश होता. पब्ज असे प्रियांका सांगते.

घरात जुन्या आठवणींना उजाळा

नव्या घररचनेप्रमाणे घराची रचना असली तरी हल्ली मोठय़ा सदस्यांपेक्षा तरुणांनाच आपल्या घरात काही तरी जुन्याचा ओलावा हवा असतो. एखादी भिंत सुबक चित्रांनी भरली असेल तरी एक भिंत अशी हवी असते, जी पाहिल्यावर एखाद्या गावाकडच्या घरात आल्याचा भास व्हावा. योगेश पाध्ये या तरुणाने त्याच्या कुटुंबीयांना सांगून घराची सजावटीत खास जुनेपण राखून ठेवले आहे. त्याच्या घरातील भिंत जुन्या-नव्याची सांगड घालणारी असल्याने कुणीही पाहुणे आल्यावर त्या भिंतीकडे आकर्षित होतात असे योगेश सांगतो. घरातील एका भिंतीवरील फळीवर योगेशने भातुकली मांडली आहे. लाकडी तसेच मातीच्या भातुकलीची भांडी या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. जुना रेडिओ, दूरध्वनी असे साहित्य योगेशने खास आपल्या घरात सजावट म्हणून ठेवले आहे. आधुनिक गोष्टींची आवड आहेच पण जुन्या परंपरेतील गोष्टीही आता आवडू लागल्या असल्याने हा बदल केला असल्याचे योगेश सांगतो.