जादूटोण्यासंदर्भातील ५० टक्के  प्रकरणे महिला अत्याचाराची आहेत; म्हणून महिला अत्याचाराच्या विरोधातील लढय़ाचं अंधश्रद्धा निर्मूलन हे एक हत्यारच आहे, त्यात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढायला पाहिजे. स्त्रियांनीही स्वत:साठी काही तरी ठोस करणं गरजेचं आहे.

आपल्याकडे अंधश्रद्धा हा प्रश्न कायमच आव्हानात्मक राहिलेला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (‘अंनिस’) आणि इतर संघटना गेली अनेक र्वष यावर काम करत आहेत. महाराष्ट्र ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली, परंतु महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ त्यामुळे थंडावली तर नाहीच, उलट अधिक जोमाने कृतिशील झालीय.

साधारणपणे ८० च्या दशकात श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून काम सुरू केलं तेव्हा जगातली या प्रश्नावरची ती पहिली चळवळ होती, असं श्याम मानव यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत ही चळवळ फोफावली. सुरुवातीला मुलींचा सहभाग खूप असायचा, पण चळवळीच्या लढाऊ  आणि धोका अंगावर घेण्याच्या स्वरूपामुळे त्यांची संख्या कमी झाली, असंही मानव यांनी सांगितलं. बुवा, बाबा, ज्योतिषी यांची लबाडी उघड करण्याचं काम त्यांनी केलं. ८० च्या दशकातच डॉ. दाभोलकर यांनी या प्रश्नावर कामाला सुरुवात केली आणि २० ऑगस्ट २०१३ या दिवशी त्यांचं अथक काम थांबलं. सामान्य माणसे त्यांच्या मनामध्ये परंपरेनं घुसवलेल्या अंधश्रद्धांचा बळी असतात. त्यांच्या मनामधील भुतंखेतं, जादूटोणा, चमत्कार, भानामती इत्यादीची भीती काढून टाकण्यासाठी दाभोलकर, श्याम मानव यांनी गावोगावच्या अशा प्रकारातलं ‘सत्य’ उजेडात आणले. दाभोलकरांच्या ‘अंधश्रद्धा विनाशाय’ या पुस्तकात त्यांनी अशा अनेक सत्य कहाण्या सांगितल्या आहेत. १०वीच्या परीक्षेत अपयश मिळण्याच्या भीतीतून रात्री स्वत:च्या घरावर दगड मारणारा महेश, लहान वयात, दूर मामाच्या गावी अनेक दिवस राहून कंटाळलेली शाळेत न घातलेली रत्नमाला – अशा घरातल्याच व्यक्ती हे प्रकार करीत असल्याचे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे ते सांगत. संपूर्ण आयुष्य त्यांनी माणसांच्या मनातला विवेक जागा करण्यासाठी झोकून दिले. गेल्या पंचवीस वर्षांत एक तर उघडपणे चमत्काराचा दावा करणारे भोंदूबाबा, बुवा यांना थांबवण्यात ‘अंनिस’ला बऱ्यापैकी यश आले. त्याचप्रमाणे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार ही दुसरी बाजू ऐकून घेतली पाहिजे हे समाजमनापर्यंत पोहोचवण्यात चळवळ यशस्वी झाली. तिसरा मुद्दा म्हणजे, धर्म कालसुसंगत असला पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे, हा विचार या संघटनांनी पुढे रेटला.

या चळवळीत स्त्रियांचा सहभाग कधी किती, कसा राहिला आहे? या संदर्भात ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, ‘‘खरं सांगायचं म्हणजे अंधश्रद्धाच्या खऱ्या बळी आणि वाहक महिलाच आहेत आणि याची कारणं आपल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत दडली आहेत. सर्व धर्मीयांमध्ये, जातींमध्ये देवसंकल्पनेपासून सगळीकडे बाईलाच दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. खरं तर, आदिम काळापासून पुरुषांना बाईबद्दल कायम एक भय वाटत आलं आहे. दर महिन्याला पाळीतून ती ‘रक्त ओकते’ आणि नवा जीव जन्माला घालू शकते या तिच्या शक्तीमुळे ती आपलं काही तरी भलंबुरं करू शकते, पुरुषांना खाऊ  शकते अशा कल्पनांमधून तिचं दमन करणाऱ्या ‘डाकीण’सारख्या प्रथा पुढे आल्या. तिला स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, रूढी-परंपरा, व्रतवैकल्यं यांत अडकवून ठेवण्यात आलं. पुरुषांच्या संदर्भातच तिचं अस्तित्व हे तर आजही गेलेलं नाही. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वविकास आणि समाजपरिवर्तनाच्या कामात एकूणच स्त्रियांची संख्या कमी आहे.’’

‘‘हे लक्षात आल्यावर ‘अंनिस’ने स्त्रियांशी संवाद वाढवणारे उपक्रम घ्यायला सुरुवात केली. तिच्या भावविश्वाचा संदर्भ अंधश्रद्धा निर्मूलनाशी कसा आहे हे तपासायला सुरुवात केली.’’ पाटील म्हणाले, ‘‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न तिच्या शारीरिक,मानसिक वाढीशी, व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्याशी, माणूस म्हणून जगण्याच्या प्रश्नांशी कसे निगडित आहेत हे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. एखादी बाई सून असते, पण नंतर सासू झाल्यावर ती तशीच का वागते – असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून महिला बोलायला, विचार करायला, काही जणी कामात यायला लागल्या; पण एकूण त्यांचं चळ्वळीतलं प्रमाण कमीच आहे, पण ज्या येतात त्या हिरिरीने काम करतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केलं. सुरुवातीच्या काळात दाभोलकरांबरोबर

डॉ. रुपा कुलकर्णी, अंजली मुळे, अलका जोशी, शुभांगी देशपांडे इत्यादी कार्यकर्त्यां होत्या.

या संदर्भात सोलापूरच्या शालिनीताई ओक यांनी विस्तृत माहिती दिली. त्या सहा र्वष राज्य कार्यकारिणीत सचिव होत्या. त्यांच्याच पुढाकाराने ‘अंनिस’चा महिला जाहीरनामा तयार झाला. त्या म्हणाल्या, ‘‘अंनिसमध्ये प्रत्येक शाखेत महिलांचा स्वतंत्र विभागच आहे. गेल्या वीसेक वर्षांपासून अनेक शिक्षिका, नोकरदार, व्यावसायिक महिला आपले काम, संसार सांभाळून ‘अंनिस’चे काम करीत आहेत. ३०-३५ जणांच्या राज्य कार्यकारिणीत १०-१२ महिला आहेत. सोलापूरमध्ये शालिनीताई ओक, उषा शहा, निशा भोसले, मधुर सानवारू, अंजली नानल या आघाडीवर आहेत, तर मुंबईत सुशीला मुंढे, तृप्ती पाटील, सुरेखा जाधव आहेत. ठाण्याच्या वंदना शिंदे, संगमनेरच्या रंजना गवांदे, बीडच्या सविता शेटे, पुण्याच्या नंदिनी जाधव, मनीषा महाजन, अनुराधा काळे आदी भक्कम फळी आहे. जातपंचायतीविरोधातील तक्रारींमध्ये, दारूबंदीसाठी स्त्रिया फार तडफेनं पुढे येतात. वनिता फाळके, तृप्ती पाटील, मनीषा महाजन या कायद्याच्या जाणकार असल्यानं ती बाजू सांभाळतात,’’ असे त्या म्हणाल्या.

या चळवळीत ‘अंनिस’ प्रामुख्याने असली तरी इतर संघटनांनाही, अंधश्रद्धा हा मुख्य प्रश्न घेतला नसला तरीही या प्रश्नाला सामोरे जावेच लागते. कम्युनिस्ट पक्षाच्या किरण मोघे म्हणाल्या, ‘‘या प्रश्नावर आम्ही त्रिपुरा, आसाम या भागांत काम केले आहे. विशेषत: आदिवासी भागात ‘डाकीण’सारख्या अघोरी प्रथा खूप आढळतात. बाईची जमीन इत्यादी हडप करण्यासाठी तिला डाकीण ठरवलं जातं.’’ या विषयावर संध्या नरे-पवार यांनी सामाजिक अंगाने ‘डाकीण’ नावाच्या पुस्तकातून, किती क्रूर पद्धतीने बाईला गावातून हाकललं जातं, ठेचून मारलं जातं यावर प्रकाश टाकलाय. किरण मोघे म्हणाल्या, ‘‘दुसरे म्हणजे पाळी, बाळंतपण, आरोग्य याबाबत महिलांमध्ये खूप गैरसमज आहेत.’’ त्यावर प्रबोधनाचं काम त्या करीत आहेत, तर पारगावला शेतकरी महिलांमध्ये काम करणाऱ्या वसुधा सरदार यांनी एक किस्सा सांगितला. ‘‘एकदा बैठकीमध्ये एका बाईने विचारले, ‘पाळी सुरू असताना बैठकीला आलं तर चालेल का?’ अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर पोचली आहेत हे यावरून लक्षात येतं. त्यावर काम करण्याला पर्यायच नसतो.’’ त्या म्हणाल्या. चंद्रपूर जिल्ह्य़ात डॉ. अभय बंग यांच्याप्रमाणे डॉ. राणी बंग आरोग्याबाबतच्या अंधश्रद्धावर मोठे काम करीत आहेत. बाळ आजारी पडले तर मांत्रिक-तांत्रिकाकडे न जाता डॉक्टरकडे जावे म्हणून स्थानिक स्त्रियांना प्रशिक्षण देण्याचे मोठे काम करून बालमृत्यूचा दर कमी करण्याचे काम करीत आहेत.

एक प्रसंग मलाही आठवतो. ८५ च्या सुमारास हडपसर इथे एक ‘अंतज्र्ञानी शेपटीवाला’ बाबा होता. मी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह गेले होते. नीलमताई म्हणाल्या, ‘‘तू त्या बाबाला विचार ‘माझं लग्न ठरत नाहीये काय करू’?’’ मी विचारलं तर त्या बाबाने पौर्णिमेला उपास करा, असे काही तरी सांगितले. मी म्हणाले, ‘‘तुम्हाला कळलं कसं नाही, माझं लग्न आधीच झालंय?’’ त्यावर तो चिडून शिव्याशाप देऊ  लागला. ठाणे जिल्ह्य़ात पर्यावरण दक्षता मंचाच्या सचिव संगीता जोशी पर्यावरणाच्या दृष्टीने शास्त्रीय दृष्टिकोन लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘लोकांच्या अंधश्रद्धांवर थेट घाला घालण्यापेक्षा त्यांना वैज्ञानिक सत्य समजावून सांगणे आणि शास्त्रशुद्ध विवेचनातून त्यांनाच निर्णय घ्यायला प्रवृत्त करणे ही संघाची शिकवण आहे, त्यानुसार आम्ही सण-समारंभांतील तसेच प्राणी, पाणी, वायू यांच्या प्रदूषणास कारणीभूत होणाऱ्या अंधश्रद्धा यांच्याबाबतीत प्रबोधन करून पर्याय सुचवितो.’’ त्याचप्रमाणे वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणाऱ्या रंजना करंदीकरदेखील ‘शबरी सेवा न्यासा’च्या माध्यमातून वनवासी लोकांमध्ये प्रबोधनाचे काम करत आहेत.

गणपती उत्सवात गणेश मूर्तीचे विसर्जन न करता दान करणे, निर्माल्यापासून खत निर्माण करणे, नागपंचमीच्या दिवशी दूध हे सापाचे अन्न नाही, तो दूध पीत नाही हे सांगणे, हरितालिकेच्या निमित्ताने व्रतवैकल्ये, उपासतापास, कर्मकांडं याबाबतची चर्चा घडवून आणणे आणि त्यांना पर्याय देणे अशा विविधस्वरूपी कार्यक्रमांत विविध संघटनांच्या महिला सहभागी होत आहेत. आजच्या काळातल्या आधुनिक बुवाबाजीला आता महिला विरोध करू लागल्या आहेत. अविनाश पाटील म्हणाले की, ‘‘जादूटोण्यासंदर्भातील ५० टक्के प्रकरणे महिला अत्याचाराच्या आहेत; म्हणून महिला अत्याचाराच्या विरोधातील लढय़ाचं अंधश्रद्धा निर्मूलन हे एक हत्यारच आहे, त्यात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढायला पाहिजे.’’

या वर्षांच्या सुरुवातीपासून तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले. १९९८ पासून ‘अंनिस’ने शनिशिंगणापूर, कोल्हापूरची अंबाबाई या संदर्भात पाठपुरावा केला आहे. त्याचे कारण, शनिशिंगणापूरच्या परिसरात चोऱ्या होत नाहीत, स्त्रीस्पर्शाने शनिदेव विटाळतो, अशा अंधश्रद्धेविरुद्ध त्यांना लढा द्यायचा होता. ११ जून २००० रोजी साने गुरुजींच्या स्मृतिदिनी केलेल्या आंदोलनात श्रीराम लागू, निळू फुले इत्यादींना अटक झाली होती. आतादेखील उच्च न्यायालयाच्या- कोणत्याही मंदिरात धर्म, जात, लिंग यावरून प्रवेशाबाबत भेद करता येत नाही- अशा एका निर्णयाच्या आधारे याचिका दाखल केली. या प्रश्नाच्या संदर्भात विद्या बाळ यांनीही मोठी भूमिका निभावली आहे.

आता प्रश्न असा आहे की, गेली अनेक र्वष या प्रश्नांवर काम सुरू आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या अशीच लढाई लढता लढता हत्या झाल्या. ज्या समाजाला, विशेषत: महिलांना या अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपल्या जिवाची बाजी लावली त्या महिलांना याविषयी काय वाटतंय? त्या स्वत:च्या मानसिकतेच्या सापळ्यातून केव्हा बाहेर पडणार आहेत? स्वत:साठी त्यांची काय भूमिका असणार आहे?

अंजली कुलकर्णी 

anjalikulkarni1810@gmail.com