अवनीसाठी दहावीचा क्लास कोणता निवडावा यावर अवनी आणि तिच्या आईचा बराच खल झाला. प्रकरण थोडं तापलंही. अवनीला मत्रिणींनी निवडलेल्या क्लासला जायचं होतं, तर आईच्या मनात दुसराच क्लास होता. आईनं शेवटी निर्वाणीचं सांगितलं, ‘तुझं तू ठरव कुठे जायचं आहे ते, मला विचारत नको बसूस!’
दुसऱ्या दिवशी अवनी म्हणाली, ‘तू सांगतेस तिथे जाते, कधी जाऊया अ‍ॅडमिशन घ्यायला?’
पालकांशी बोलताना अशा प्रकारचे किस्से अनेक वेळा ऐकायला मिळतात. मुलांना सांगितलं ‘तुझं तू ठरव, तरी मुलं तुम्ही सांगा’ असं आईबाबांना विचारत राहतात. का होत असावं असं?
काही शक्यता डोळ्यासमोर दिसतात. मुलांना निर्णय घेणं कठीण वाटत असणार, ही पटकन सुचणारी सर्वात स्वाभाविक शक्यता. अनेकदा ती खरीही असते. काही मोठे निर्णय घेणं मुलांना खूप गोंधळवून टाकणारं असतं. पण त्यात आणखी काही पदर असू शकतात. इथे अवनीच्या बाबतीत आई सांगते, ‘तुझा तू निर्णय घे, मला विचारत नको बसूस’, तेव्हा त्यात आईचा त्रागा होतो आहे, ती चिडली आहे आणि अवनीच्या निवडीवर नाखूश आहे, असा अर्थ ध्वनित होत असेल, तर अवनीला त्यात धोका दिसू शकतो. स्वत:च्या पसंतीने क्लास निवडला आणि अपेक्षित रिझल्ट्स नाही आले, तर सगळं खापर अवनीच्या क्लासच्या निवडीवर फुटू शकतं. त्याबद्दल वारंवार बोलायचा आईवडिलांचा पिड असला तर तेच ते पुन:पुन्हा ऐकावं लागू शकतं. त्यापेक्षा मग सरळ सरळ आईच्या मताप्रमाणेच करावं, असा शरणागतीचा मार्ग पत्करला जाऊ शकतो.
बऱ्याचदा मुलांच्या वयाला त्यांचा विचार करायचा आवाका बेताचा असतो. एकंदर तारतम्य भावाचाही अभाव असतो. या पाश्र्वभूमीवर पालकांनी अनेक बाजूंनी केलेल्या विचारांचंही मुलांवर वजन येऊ शकतं किंवा मग त्यांना तो कळतही नाही. कदाचित अवनीच्या आईने खूप साधकबाधक विचार करून एखादा क्लास मनात नक्की केलेला असेल. एकंदर सगळ्या घटकांचा विचार करता ती सर्वात योग्य निवड असेलही. आणि शेवटी अवनी तिकडेच जाणार असेल, तर ते चांगलंही आहे. पण हे सगळं अवनीपर्यंत ज्या प्रकाराने पोहोचतं, त्यातून ते तिच्यावर लादल्यासारखं होतं किंवा त्याला अवनीच्या शरणागतीचं स्वरूप येतं. अवनीला आईची निवडप्रक्रिया, विचार करण्याची पद्धत कळतच नाही हा यातला सर्वात मोठा धोका आहे. पुढच्या वेळीही त्या दोघींमध्ये असाच वाद झाला तर मागच्या वेळी पत्करलेल्या शरणागतीची त्याला पाश्र्वभूमी असते. आणि मग अनेकदा त्याचा शेवट उगाचंच दोघीही रक्तबंबाळ होण्यात होतो.
म्हणून मुलांची आणि आपली मतं वेगवेगळी असतात, तेव्हा आपले विचार, मुद्दे काय आहेत, यापेक्षा आपण ते कसे मांडतो, याला खूप महत्त्व आहे. तर्क आणि संवादात संवाद महत्त्वाचा. त्यात ऐकवणं, बजावणं, ठणकावून सांगणं असे सूर आले की त्याला कोणाचं खरं ठरलं, कोणाला नमतं घ्यावं लागलं, असे रंग येतात. मुलांची बाजू कितीही बालिश, पोरकट वाटली (जसं इथे अवनीला मत्रिणींची सोबत जास्त महत्त्वाची वाटते आहे) तरी आपण ती किती मोकळेपणाने आणि त्यावर शिक्के न मारता ऐकून घेतो, याने सगळ्या संभाषणाचा नूरच बदलतो. इथे केवळ क्लास किती चांगला आहे एवढय़ावरच दहावीतलं यशापयश अवलंबून नाही, अवनी स्वत: किती मेहनत घेते याला जास्त महत्त्व आहे. नाहीतर सर्वात चांगल्या क्लासमध्ये जाणाऱ्या सगळ्याच मुलांना उत्तम मार्क्‍स मिळाले असते. अशा वेळी अवनीला सांगता येईल, ‘मला हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, पण तुला मत्रिणींबरोबर असणं महत्त्वाचं वाटत असेल, तर आपण तसा विचार करू शकतो. आपण दोघीही विचार करू त्यावर. एकदोन दिवस घेऊया त्यासाठी,’ अशा प्रकारे संभाषणाचा सूर असेल तर अवनीने सगळ्याचा वेगळ्या प्रकाराने विचार करायची शक्यता अनेक पटीने वाढते. आणि तरीही तिला मत्रिणींचाच क्लास निवडायचा असेल तर तिला तसे करू देताही येईल. मात्र तो निर्णय आपल्या सगळ्यांचा असायला हवा. त्यानुसार काही गोष्टी जमत नाहीत असं लक्षात आलं, तर बदल करायची जबाबदारी सगळ्यांचीच हवी. लहान वयापासून छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये मुलांच्या मताचा आदर झाला तर त्यांची निर्णयक्षमता विकसित व्हायला त्याची खूप मदत होते.
‘मूल’ ते ‘सक्षम प्रौढ’ या प्रवासातला निर्णयक्षमता हा एक मलाचा दगड आहे. आपल्या मुलांचा हा प्रवास कसा होणार आहे, हे आपण आणि मुलं मिळूनच तर ठरवायचं आहे ना!
mithila.dalvi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा