प्रत्येक विद्यार्थ्यांला अवगत असायलाच हवं असं आणखी एक कौशल्य म्हणजे प्रश्न विचारण्याचं कौशल्य. योग्य प्रश्न विचारता येणं हे खरं तर सर्वात कठीण!
आपण सतत काही बघत असतो, ऐकत असतो, अनुभवत असतो. या गोष्टी करताना कधी औत्सुक्य निर्माण होतं, कधी अस्वस्थता येते. असं का, कसं, केव्हा, कोणी, कशाला, कोणाला असे अनेक प्रश्न डोक्यात पिंगा घालू लागतात. मात्र ते विचारण्याचं धाडस प्रत्येकात असतंच असं नाही. ज्यांच्यात हे धाडस असतं तो मग काही वेळा स्वत:च मनन-चिंतनात, प्रयोगात गुंतून जातो. कोणी जाणत्या- ज्ञानी माणसांना गाठतो, कोणी प्रयोगशाळांत धाव घेतो, कोणी अंतरिक्षाचा शोध घेतो, कोणी जगप्रवासाला निघतो.
सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरं हाती लागतात असं नाही. उत्तरं सोपी असतात असंही नाही. काही उत्तरांत नवे प्रश्न दडलेले असतात. कुणाला सर्वस्वी नवीन काही गवसतं तर कोणी आहेत त्याच गोष्टींची कार्यक्षमता, उत्पादकता वाढवतो, काटकसर सुचवतो, सुधारणा करतो. असा हा प्रगतीचा प्रवास सातत्यानं सुरू आहे आणि जगाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत सुरूच राहील.
खरंतर सर्वानाच प्रश्न पडतात. लहान वयात जास्त पडतात; कारण सारं भवतालच अनोळखी असतं. प्रथम त्या छोटय़ाला प्रश्न पडावेत असं वातावरण उपलब्ध असणं आणि मनात, डोक्यात पिंगा घालणारे प्रश्न विचारण्यासाठी त्याला मोठय़ांचे प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. काही वेळा मुलाला प्रत्यक्ष उत्तर सांगत तर कधी प्रश्नांचा उत्तरांच्या दिशेनं प्रवास कसा करावा हे दाखवत, मोठय़ांना लहानग्यांचं हे कुतूहल जिवंत ठेवावं लागतं.
जसजसा मानसशास्त्राचा अभ्यास होऊ लागला तसतसं पालकांचं काम सोपं होत गेलं. व्हाय, हाऊ, व्हॉट.. सारख्या पुस्तकांची मालिका आली. अनेक सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध झाली. अनेक कोडी, मार्ग शोधा, साम्य-फरक शोधा, ठिपके जोडा, खजिन्याचा शोध घ्या असे अनेक खेळ आले. शैक्षणिक माहिती देणारी असंख्य अॅप्सही उपलब्ध आहेत.
नव्या अभ्यासक्रमातही अगदी प्राथमिक शाळेपासून मुलांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावेत व त्यांनी ते विचारावेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत. तुम्ही काय कराल? तुम्हाला काय वाटतं? स्वत:ची प्रश्नपत्रिका बनवा, मुलाखत घ्या, प्रकल्प तयार करा इत्यादी प्रकारे स्व-अध्ययनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
प्रश्नाला जो प्रतिसाद मेंदूकरवी दिला जातो, त्याला आपण सामाजिक, भावनिक आणि मानसिक विकास म्हणतो. प्रश्नांमुळे आपल्यासमोर आव्हानं तयार होतात आणि त्याद्वारे आपण नव्या
गोष्टी शिकतो.
गोष्टी, घटना, परिस्थिती याबाबत पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रश्न पडायला हवेत. कारण त्याचे उत्तर शोधताना उपलब्ध माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता प्राप्त होते आणि विद्यार्थ्यांचा त्याविषयातील ज्ञानाचा परिघ आपोआप रुंदावतो. म्हणूनच मोठय़ांनी लहानग्यांच्या वाढीला वाव देणारी ही संभाव्यता जोपासायला हवी.
लहानपणी पडलेले प्रश्न मुलांचा मानसिक विकास घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलं प्रश्न विचारण्यातून त्यांच्या वर्तमान माहितीच्या पल्याड जाऊ पाहतात. मुलांना आपल्या माहितीतील त्रुटी डाचत असते, त्यांचा काही बाबतीत गोंधळ उडत असतो, असलेल्या माहितीत सातत्य नाही असं वाटत असतं.. अशा वेळी ते प्रश्न विचारून त्यांना जी नेमकी माहिती हवी आहे, ती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात. मुलं माहिती जमा करण्यासाठी प्रश्न विचारतात. मुलांच्या मानसिक विकासासाठी त्यांच्या प्रश्नांची योग्य माहितीपूर्ण उत्तरे त्यांना मिळायला हवी. केवळ पालकांचं किंवा शिक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी नव्हे तर त्यांना जी माहिती हवी आहे, ती विचारण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करायला हवे. मानसिक विकासासाठी मुलांनी संबंधित आणि ज्याचा संभाव्य उपयोग होऊ शकेल अशा प्रश्नांचा उपयोग होऊ शकतो. त्यांनी सकारण प्रश्न विचारला का, त्या माहितीचा उपयोग केला का आणि प्रश्नाचे उत्तर मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली का, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
कुतूहलापोटी विचारलेल्या प्रश्नांना मिळणारा प्रतिसाद जर नकारार्थी असेल तर मूल नाउमेद होतं. निरीक्षण करायचं थांबवतं. त्यांच्या विचारांना आणि कल्पनांना लगाम बसतो. विचारांना चालना देणाऱ्या प्रश्नांच्या वाटय़ालाही तो जात नाही. परीक्षेला घाबरू लागतो. रेडिमेड नोट्स मिळवतो. येनकेन प्रकारेण मार्क मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण अशामुळे मूलभूत स्वरूपाचं ज्ञान मात्र ती व्यक्ती कधीच मिळवू शकत नाही. म्हणूनच आज गरज आहे ती मुलांमधला प्रश्नकर्ता जागा करण्याची!
goreanuradha49@ yahoo.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी