आज वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग निर्मितीच्या व्यवसायाला बरकत प्राप्त होत आहे. हा व्यवसाय कुणालाही करता येण्याजोगा आहे. हे क्षेत्र असे आहे, जिथे मागणी ही सतत वाढतीच असते. शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग, प्रवासी अशा समाजातील वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगेची सतत आवश्यकता भासत असते. या बाबी लक्षात घेतल्या तर बॅग निर्मिती हा व्यवसाय निवडायला हरकत नाही.
बॅग निर्मिती हा अभ्यासक्रम सी. बी. कोरा ग्रामोद्योग या संस्थेने सुरू केला आहे. या संस्थेला केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. ही संस्था रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील, असे अल्प मुदतीचे बहुविध अभ्यासक्रम चालवते.
या बॅग निर्मिती अभ्यासक्रमात विविध प्रकारच्या पर्सेस, शाळेचे दप्तर, कार्यालयात टिफिन नेण्यासाठी उपयुक्त ठरणारी बॅग, छोटय़ा बाळाचे विविध साहित्य ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारी बेबी बॅग, कार्यालयीन फाइल वा लॅपटॉप नेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी ऑफिस बॅग, एकच कप्पा असणारी वन पीस बॅग, ब्लाऊज कव्हर बॅग, सामोसा बॅग, फोिल्डग बॅग, साइट बॅग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रत्यक्ष यंत्रसामग्रीचा आणि बॅग तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा यावर येथील प्रशिक्षणात भर दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी २५ दिवस असून प्रत्येक बॅचमध्ये ३० व्यक्तींना प्रवेश दिला जातो. इच्छुक व्यक्तींना या अभ्यासक्रमाला अथवा प्रशिक्षणाला प्रवेश घेता येईल.
पत्ता- सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान, िशपोली गाव, ग्रामदेवी मदानाजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०००९२.
बॅग निर्मितीचा असाच एक अभ्यासक्रम सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहकार्य लाभलेल्या नाशिकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या संस्थेने सुरू केला आहे. यामध्ये पेपर बॅग, लिफाफ्यांची निर्मिती आणि फायबर पर्सची निर्मिती या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. पेपर बॅग आणि लिफाफ्यांची निर्मिती या अभ्यासक्रमाला २० व्यक्तींना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन आठवडय़ांचा आहे. ‘फायबर पर्सची निर्मिती’ या अभ्यासक्रमाला १५ व्यक्तींना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक आठवडय़ाचा आहे. पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, खादी ग्रामोद्योग कमिशन, पोस्ट ऑफिस त्र्यंबक विद्यामंदिर, नाशिक – ४२२२१३.