बहुभाषिक असल्याने केवळ चारचौघांत तुम्ही उठून दिसता असे नव्हे तर करिअरच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत बहुराष्ट्रीय कंपन्यांना परदेशातील ग्राहक कंपन्यांशी अथवा आंतरराष्ट्रीय ग्राहकवर्गाशी व्यवहार करण्याकरता त्यांच्या भाषेत उत्तम संवाद साधू शकतील अशा बहुभाषिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक सहकाऱ्यांसोबत वावरण्यासाठीही अनेक क्षेत्रांत भाषाकौशल्य प्राप्त असणे आज गरजेचे ठरू लागले आहे.
भाषाशिक्षणाचे स्तर
’ नवी भाषा शिकताना विद्यापीठीय अथवा मान्यताप्राप्त संस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा.
’अशा अभ्यासक्रमांचे विविध स्तर (लेव्हल्स) असतात. जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर प्राथमिक पातळीवरील मूलभूत भाषाकौशल्य आणि संवादकौशल्य तुम्हाला शिकवले जाते.
’ जर तुमचा त्या भाषेशी काहीसा परिचय असेल तर तुमच्या व्यावसायिक गरजेनुसार क्रमिक अभ्यासक्रम निवडण्याचा विचार तुम्हाला करता येईल. उदा. अभियंत्यांसाठी वेगळ्या पद्धतीच्या फ्रेंच भाषा अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली असते. ज्यात त्यांना उपयुक्त ठरतील असे व्यावसायिक भाषा शिक्षण दिले जाते.
परदेशी भाषाशिक्षणासाठी आवश्यक अर्हता
’भाषाशिक्षणाचा अभ्यासक्रम निवडताना सर्वप्रथम
कोणत्या प्रकारची अर्हता तुम्हाला प्राप्त करायची आहे, हे लक्षात घ्या.
’भाषाशिक्षण देणाऱ्या काही संस्थांमध्ये अभ्यासक्रमाच्या अखेरीस उपस्थित राहिल्याचे प्रमाणपत्र दिले जाते तर काही ठिकाणी ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला त्याचा स्तर लक्षात घेत त्यातील तुमचे कौशल्य जोखणारी लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली जाते.
’भाषाशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था त्याच्या अभ्यासक्रमाचे स्तर कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स (सीईएफआर) नुसार निश्चित करतात आणि भाषेवरील प्रभुत्व मोजणीकरताही तेच निकष उपयोगात आणतात. जर तुम्हाला ती भाषा शिकण्याकरता विद्यापीठीय शिक्षण अथवा उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्या भाषेसंबंधातील तुमचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रमाणित प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. अनेक भाषाशिक्षण देणाऱ्या संस्था या परीक्षांच्या तयारीचे वर्गही आयोजित करतात. एका भाषेच्या अनेक परीक्षा असतात. तुमच्या भविष्यकालीन शिक्षण योजनेकरता त्यातील कुठली परीक्षा अधिक सुयोग्य ठरेल हे तुम्ही लक्षात घ्यावे.
विद्यापीठीय शिक्षणाकरता असणाऱ्या सर्वसामान्य परीक्षा पुढीलप्रमाणे-
’इंग्रजी भाषा –
आयईएलटीएस (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम) इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आर्यलड, न्यूझिलंड, कॅनडा आणि द. आफ्रिका तसेच अमेरिकेतील काही संस्थांमधील प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक ठरते.
टोफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज अ फॉरेन लँग्वेज)- अमेरिकेतील अभ्यासाकरता सहसा या परीक्षेतील गुण ग्राह्य़ मानले जातात.
इंग्रजी भाषेचे प्रभुत्व तपासणाऱ्या आणखी काही परीक्षांमध्ये केम्ब्रिज इंग्लिश, पीअरसन टेस्ट ऑफ इंग्लिश, ट्रिनिटी कॉलेज लंडन इंटिग्रेटेड स्किल्स इन इंग्लिश, एफसीई- फर्स्ट सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश यांचा समावेश होतो.
’फ्रेंच भाषा- डीईएलएफ (Diplôme d’études en langue française), डीएएलएफ (Diplôme approfondi de langue française), टीइएफ(Test d’évaluation du français), टीसीएफ ((Test de connaissance du français)
’जर्मन भाषा- टेस्टडाफ (TestDaF – Test Deutsch als Fremdsprache), डीएसएच (Deutsche Sprachprüfung für den Hochschulzugang)
’इटालियन भाषा- सीआयएलएस (Certificato di Italiano come Lingua Straniera), सीईएलआय (Certificato della Lingua Italiana)
’स्पॅनिश भाषा- डीईएलई (Diplomas de Español como Lengua Extranjera)
अंगभूत क्षमतेत वाढ होते..
’एखादी नवी देशी/परदेशी भाषा शिकल्याने केवळ तुमच्या रेझ्युमेमध्ये आणखी एका अर्हतेची भर पडते असे नव्हे तर त्याने तुमच्या गुणवत्तेत, भाषा कौशल्यात भर पडते. तुमच्या ज्ञानाचा परिघ विस्तारायला आणि परिचयाचे वर्तुळ वाढायला नव्या भाषेची नक्कीच मदत होते.
’परदेशी भाषेचे शिक्षण घेत असताना तुमचे इंग्रजी उत्तम व्हायलाही मदत होते.
’बहुभाषिक व्यक्तींमध्ये मानसिक प्रक्रिया वेगाने आणि परिणामकारक होतात, असे याविषयीच्या अनेक अभ्यासपाहणींमध्ये नमूद करण्यात आले आहे. बहुभाषिक व्यक्ती एक भाषा येणाऱ्या व्यक्तीहून वेगळ्या पद्धतीने काम पूर्ण करते. नव्या भाषेचे शिक्षण थोडय़ा उशिरा सुरू केले तरी लहान वयात जितके कौशल्य प्राप्त करता येते, तितकेच भाषेवरील प्रभुत्व प्रौढ व्यक्तीलाही प्राप्त करता येते.
’विविध भाषाशिक्षणाच्या प्रणाली ध्यानात घेणे, त्यातील अर्थ समजून घेणे आणि संवाद साधणे यांमुळे परदेशी भाषा शिकताना तुमच्या मेंदूची कार्यपद्धती वधारते. यामुळे समस्या निवारणाचे काम करण्याची क्षमता अथवा कौशल्यही वाढते.
’नवी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह, वाचनक्षमता आणि गणिती क्षमता उत्तम असते.
’बहुभाषिक व्यक्तींचे प्रामुख्याने मुलांचे वक्तृत्व, लेखन आणि रचनाविषयक कौशल्य उत्तम असते.
’वेगळी भाषा शिकताना नवे शब्द, नवे नियम लक्षात ठेवावे लागतात, त्यामुळे बौद्धिक व्यायाम होऊन स्मरणशक्ती वाढायला मदत होते.
’भाषाशिक्षणाने आकलन वाढते. अशा व्यक्तींची निरीक्षणशक्ती चांगली असते आणि त्यांना आवश्यक त्या माहितीवर त्यांना लक्ष केंद्रित करता येते.
’नवी भाषा शिकताना शब्दांचा काळजीपूर्वक उपयोग करण्याची सवय जडते. संवादकौशल्य वाढवण्याकरता जपून शब्द वापरण्याचे कौशल्य उपयुक्त ठरते.
’नवी भाषा शिकणाऱ्या व्यक्तीत आत्मविश्वास अधिक असतो.
’नवी भाषा शिकताना भाषा यांत्रिकीकडे लक्ष पुरवावे लागते. भाषेचे व्याकरण, वाक्यरचना ध्यानात घ्यावी लागते. यामुळे भाषेचा उपयोग करताना तुम्ही अधिक सतर्क होता आणि ती अधिक संरचित होण्याकडे तुमचा कल वाढतो. त्यामुळे भाषेचा परिणामकारक वापर करण्याचे तुमचे कौशल्य वाढते. तुम्ही उत्तम लेखन, संपादन करू शकता. उत्तम भाषा बोलणाऱ्यांचे श्रवणकौशल्यही चांगले असते.
बहुभाषिकत्व आणि करिअर संधी
’स्पर्धात्मक बाजारपेठेत वावरताना आज उत्तम शैक्षणिक अर्हतेसोबतच बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक सहकाऱ्यांसोबत वावरण्यासाठी भाषाकौशल्य प्राप्त असणे आवश्यक असते.
’बहुभाषिक असल्याने तुम्हाला नोकरी-व्यवसायाच्या अथवा पदोन्नतीच्या संधी तुलनेने अधिक उपलब्ध होतात.
’ परदेशात नोकरीची संधी मिळू शकते.
’त्या भाषेतील ऑनलाइन स्वरूपाची कामे मिळू शकतात, ज्यात व्यावसायिक नेटवर्क तसेच सोशल मीडिया साइट्सचा समावेश असतो.
’ परदेशी भाषेत पदवी प्राप्त केलेल्यांना शाळा-महाविद्यालयात अध्यापन करता येऊ शकते.
’टूर गाइड म्हणून संधी प्राप्त होऊ शकते.
’नवी भाषा शिकल्याने सातासमुद्रापार असलेल्या कंपन्या अथवा ग्राहकवर्गाशी संवाद साधणे शक्य होते. आंतरराष्ट्रीय ग्राहकवर्ग असलेल्या हॉस्पिटॅलिटीसारख्या सेवा क्षेत्रात बहुभाषिक असल्याने तुम्हाला व्यावसायिक संधी अधिक उपलब्ध होऊ शकतात.
’भाषांतराची कामे – पुढील पाच वर्षांत भाषांतराचे क्षेत्र वेगाने वाढणार असून शाळा, रुग्णालये, न्यायालये, परिषद केंद्रे अशा ठिकाणी भाषांतरकारांना कामाच्या अधिकाधिक संधी प्राप्त होतील. घरबसल्या काम करण्याची संधीही या क्षेत्रात उपलब्ध असते. या क्षेत्रात करिअर करण्याची संधी तुम्हाला येत असणाऱ्या भाषेला किती मागणी आहे, यावर जशी अवलंबून आहे तशीच तुम्ही त्या भाषेत किती पारंगत आहात, यावरही अवलंबून असते. एखाद्या भाषेत जर भाषांतरकारांची चणचण असेल तर भाषांतरकाराला असलेली मागणी वाढते. उदा. स्पॅनिश भाषांतरकारांना अधिक मागणी आहे. त्या तुलनेत स्पॅनिश बोलणाऱ्या भाषांतरकारांची संख्याही अधिक आहे. चिनी बोलणाऱ्या भाषांतरकारांना तुलनेने कमी मागणी आहे. मात्र जर तुम्ही चिनी भाषेवर प्रभुत्व मिळवले तर तुम्हाला मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावे लागणार नाही, याचे कारण चीनी भाषा शिकणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. अनेक भाषांतरकार अथवा अनुवादक हे फ्रीलान्स धर्तीवर काम करतात. इंटरनेटमुळे आणि ऑनलाइन लोकलायझेशनमुळे अनुवादकांना नव्या संधी प्रापत होऊ लागल्या आहेत.