एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केल्यानंतर त्या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी त्यासाठी स्वत:ला तयार करणं आवश्यक ठरतं. अगदी नोकरीसाठी मुलाखत देण्यापासून, आपल्यावर सोपवण्यात आलेले काम उत्तमरीत्या पार पडण्यासाठीजोमाने पूर्वतयारी करून स्वत:ला सिद्ध करा.
शिक्षण घेतानाच करिअरचा आराखडा सुस्पष्ट असल्यास संबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये शिकाऊ उमेदवार अथवा प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव घेतल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो.
आवडीच्या क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करताना केवळ सरधोपटपणे अर्ज करण्यापेक्षा तुम्ही या पदासाठी योग्य उमेदवार कसे आहात, याचे प्रतिबिंब तुमच्या अर्जात उमटायला हवे, तरच तुमचा अर्ज इतरांपेक्षा उजवा ठरेल.
प्रत्येकाला पहिल्याच प्रयत्नात हवी तशी नोकरी मिळतेच असे नाही. अमुक एका पदासाठी तुम्हाला निवडण्यात आले नाही, तर अशा नकाराने हताश वाटून घेऊ नका. कारण नाकारले गेलेले तुम्ही काही एकटेच नसता! आणि इतर अनेक संधी तुमच्या पुढय़ात तयार असतात..
– तुम्हाला मिळालेली पहिली नोकरी जर तुम्हाला हवी तशी नसली तर ती स्वीकारण्याची घाई करू नका. आत्मविश्वासपूर्वक, दूरदृष्टी दाखवत निर्णय घ्या. तुम्ही स्वीकारलेली नोकरी ही तुम्हाला तुम्ही करिअरच्या निश्चित केलेल्या दिशेकडे नेणारी आहे ना, याची खात्री करून घ्या.
पहिली नोकरी स्वीकारताना वेतन हा एकमेव निकष असू नये. पहिल्या नोकरीत मिळणारे वेतन हे बहुतेकदा तुलनेने कमी असले तरी त्यात मिळणारा अनुभव हा लाखमोलाचा असतो. त्यातूनच कामाच्या वेगवेगळ्या प्रकारांची आणि संधींची ओळख होत असते.
लेखन, अभिनय यांसारख्या सृजनशील क्षेत्रांमध्ये तुम्ही लगेचच स्थिरावू शकत नाही, हे मनाशी पक्कं ठाऊक असलं तर ‘स्ट्रगल’ करताना आत्मविश्वास डळमळीत होत नाही. योग्य नोकरीच्या प्रतीक्षेचा कालावधी हा अल्प अथवा खूप जास्तही असू शकतो. या स्ट्रगल पीरिअडला आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने सामोरे जायला हवे.
 पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही नोकरी मिळेपर्यंतच्या काळात आपली शैक्षणिक, तांत्रिक किंवा संगणकीय गुणवत्ता वाढवण्यासाठी अल्प मुदतीचे काही अभ्यासक्रम करून हा वेळ आपल्याला सत्कारणी लावता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा