एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.
* योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते.
* परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो.
* अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणं. लक्षात ठेवा, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात.
* एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो.
* आपल्याला हवं ते यश मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं.
* वेळ, पैसे खर्च न करताही अनेक गोष्टींचा सराव करता येईल. एकटय़ानं वा गटात स्मरणशक्तीचे खेळ खेळता येतील.
उदा. काही गोष्टी आठवण्याचा सराव करा-
उदा. शाळा ते घर या मार्गातील रस्ते, त्यावरच्या दुकानांच्या पाटय़ा, इमारतींचे आकार, विक्रेत्यांचे स्टॉल्स, त्यावरचं सामान, विक्रेत्यांचे आवाज, धावणारी वाहनं, येणारे आवाज, गंध इत्यादी. वाचलेलं पुस्तक, खेळलेला खेळ, ऐकलेलं भाषण, पाहिलेलं नाटक, चित्रपट, एखादं दृश्य. सहलीच्या वेळी वा सुट्टीत गावी अनुभवलेल्या गोष्टी अशी आठवता येण्याजोग्या गोष्टींची यादी बरीच लांबवता येईल.
* वर्गात दोन तासिकांच्या मधल्या वेळेत, प्रवासात किंवा रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नव्या शिकलेल्या गोष्टी, शिक्षकांनी विचारलेले प्रश्न, वर्गात झालेली चर्चा असे आठवून बघा.
* याच्याच जोडीला विविध खेळ खेळता येतील. विविध प्रकारच्या भेंडय़ा लावणं, गोष्ट सांगणं, कविता सादर करणं, विशिष्ट ढंगात विनोद सांगणं, प्रश्नमंजूषा, सुडोकू, शाब्दिक कोडी सोडवल्याने स्मरणशक्तीला चालना मिळते आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे, त्यावर आपोआप आपलं लक्ष एकाग्र करायचीही सवय जडते.
* आपलं लक्ष एकाग्र का होत नाही, लक्षात का राहात नाही, याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करावा.
goreanuradha49@yahoo.in